अंगठ्यावरच्या ठशांचे मानवी व्यक्तिमत्त्वावरील परिणाम!

भविष्य आपल्या हाती
अंगठ्यावरच्या ठशांचे मानवी व्यक्तिमत्त्वावरील परिणाम!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

आतापर्यंत आपण चार बोटांवरील विविध ठशांचे मानवी मनावर व व्यक्तिमत्वावर human personality होणारे परिणाम पाहिले. आज आपण अंगठ्यावरील विविध ठशांचे व्यक्तिमत्वावर कायम स्वरूपी असणारे परिणाम पाहणार आहोत. हस्तसामुद्रिकशास्त्रात अंगठ्याच्या ठश्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. अंगठ्याच्या ठशावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, अंगभूत हुशारी, निर्णय क्षमता व एकंदरीतच आयुष्य कसे व्यतीत करेल याचा लेखाजोखा मिळतो. म्हणूनच हाताच्या दोनही अंगठ्यांवरील ठशांना महत्त्व आहे.

व्यक्तीच्या डाव्या हातावरील अंगठ्याचा छाप हा व्यक्ती स्वतंत्र आपल्या पायावर उभा राहेपर्यंत अथवा नोकरी-व्यवसायाला लागेपर्यंत, आत्मनिर्भर होईपर्यंत अत्यंत महत्वाचा असतो. तोपर्यंत ती व्यक्ती आईवडिलांच्या छत्र छायेखाली किंवा पालकांवर अवलंबून असते. त्यासाठी डाव्या हातावरील अंगठ्याचा ठसा व त्याचे परिणाम गृहीत धरले जातात. डाव्या हाताचा अंगठा जो व्यक्तीचा संचिताचा असतो. उजव्या हातावरील अंगठ्याच्या छापाचे महत्त्व व्यक्ती काम-धंद्याला लागल्यानंतर त्याच्या कर्मासाठी उपयोगाला येतो.

अंगठ्यावरील विविध ठशांचे परिणाम पाहण्याआधी हातावरील शंख व मयूर पंख यांच्या वळालेल्या रेषा किंवा रेषा समूह हा करंगळीकडे जाणारा हवा. शंख व मयूर पंख यांचे शेपूट किंवा रेषांचा ओघ हा जर अंगठ्याकडे वळत असेल तर त्या ठशांचे मानवी जीवनावर तर्‍हेवाईकपणासारखे परिणाम दिसून येतात. ज्या बोटांवर अंगठ्याकडे शंख व मयूर पंखाचे ओघ जात असेल त्या बोटाखालील ग्रहांवर व साहजिकच त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम दिसून येतात.

अशी व्यक्ती जगावेगळी वागते. तिच्या आवडी निवडी, देवावरची श्रद्धा, बाकीच्या लोंकांपेक्षा विरुद्ध विचाराच्या असतात. म्हणजेच शंख व मयूर पंख यांचा समाप्तीचा ओघ हा करंगळीकडे जाणारा हवा. शुक्ती, डबल लूप व चक्राला शेपूट किंवा एका बाजूला जाणार्‍या रेषा किंवा रेषा समूह असत नाही. वाचकांच्या लक्षात येण्यासाठी हाताच्या पंज्याचा फोटो दिला आहे. या फोटोत पहिल्या बोटांवरील शंख चिन्हाचा ओघ हा उलट दिशेला म्हणजे अंगठ्याकडे आहे. त्यामुळे गुरु ग्रहाच्या गुणात त्या व्यक्तीचा जगावेगळा स्वभाव व व्यक्तिमत्व, आवडी निवडी सामान्य व्यक्तींपेक्षा भिन्न आढळून येतात.

अंगठ्यावरील विविध ठसे

चक्र

अंगठ्यावर चक्र चिन्ह/ठसा असता अश्या व्यक्ती भाग्यवान व विद्वान असतात. डाव्या हातावर असता आई वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम असते. उजव्या हातावर चक्र ठसा असता व्यक्ति गृहस्थाश्रमात, किंवा स्वतःच्या कमाईने कुटुंबाचा सांभाळ करीत असतांना त्या व्यक्तीला आर्थिक विवंचना आल्या तरी त्याचे निराकारण होत असते. परमेश्वराने दिलेल्या नशिबात आर्थिक क्षमता उत्तम राहते. दोन्ही हाताच्या अंगठ्यावर चक्र ठसा असता अश्या व्यक्ति कर्जबाजारी होत नाहीत. कर्ज झाले तरी ते फिटले जाते. स्वतःची कमाई कमी असेल तरी बाकी कुटुंबातून येणार्‍या उत्पन्नामुळे आर्थिक वणवण राहत नाही. असे लोक भाग्यवंत असतात. चक्र ठश्याबरोबरच अंगठ्याच्या पहिल्या पेर्‍यावर यव आकाराचे चिन्ह झालेले असल्यास आर्थिक चणचण बिलकुल असत नाही.

शंख

अंगठ्यावर शंख चिन्ह/ठसा असता असे लोक मेहनती असतात. कष्ट करण्याशिवाय यांना पर्याय नसतो. अत्यंत हुशार असतात. परिस्थितीशी मिळते जुळते घेतात. सामाजिक असतात. यांच्या वाट्याला चक्र ठश्यापेक्षा आर्थिक क्षमता कमी येते. सहजी कामे होत नाही, झगडावे लागते. यांच्या कष्ट व परिश्रमाला त्यांच्या नशिबाप्रमाणे फळ मिळत असते. हे लोक कष्टाळू, सतत व निरंतर कार्यरत राहिल्यास जीवनात यशस्वी होतात.

शुक्ति

अंगठ्यावर शुक्ति चिन्ह/ठसा असता असे लोक एककल्ली व त्या त्या वय वर्षात त्यांना आवडेल त्याप्रमाणे विविध उद्योगात कार्य मग्न असतात. लहान असता घरबशे असतात. सामाजिक नसतात. अभ्यासात लक्ष नसते. आपले म्हणणे नीट पणे मांडू शकत नाहीत. आज्ञा पालन करण्यात ढिम्म असतात. त्यांच्या आवडीच्या विषयात उत्साहाने सहभागी होतात. अंगी हुशारी असते परंतू तिचा पूर्ण उपयोग करून घेता येत नाही. शुक्तिचा ठसा अंगठ्यावर असता यांना कामात अथवा जीवनात बदल नको असतो. शिकवलेले व दिलेले काम उत्तम करतात. यांच्यात कल्पना शक्तीचा अभाव असतो. यांना योजना बनविता येत नाहीत. संशोधक प्रवृत्ती नसते. त्यामुळे साहित्य, कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेत उत्तूंग यश मिळविता येत नाही.

अंगठ्यावर डबल लूप चिन्ह/ठसा असता असे लोक एककल्ली असतात. विचित्र संशोधनात मग्न असतात. जगापेक्षा भिन्न आवडी निवडी असतात. हुशार असतात, मात्र आपल्या कार्यात, अभ्यासात, संशोधनात, व्यवहारात कायम द्विधा मनःस्थितीत असतात. एखाद्या कृती करण्याच्या मागे लागले कि तहान भूक विसरून काम करतात. मात्र यातही धरसोड वृत्ती असते. स्वतःची हुशारी असते. परंतू यांना यांच्या कामात, संशोधनात उपलब्ध माहितीचा, विज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. निरंतर विविध क्षेत्रातील ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यात मग्न राहतात. नव निर्मितीचा प्रयत्न करतात. जे आधी शोध लागले त्यात विविध प्रयोग करतात. त्यात यश मिळाले कि खुश होतात. यांची रुची बदलत राहते. गूढ अभ्यासात मग्न राहतात. मात्र तोही विषय अर्धवट सोडून देतात. आपल्या चुकीच्या मतावर ठाम असतात. ते कसे बरोबर आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. डबल लूप असलेल्या व्यक्ती किचकट विषयात अभ्यास करीत असेल अथवा संशोधनात गुंतलेले असेल तरी नवीन निर्मितीचे यांचे हातून संशोधन होत नाही. तितकी यांची क्षमता नसते. डबल लूप असणार्‍या व्यक्तींनी ज्या क्षेत्रात निर्णय क्षमता आहे, अशा क्षेत्रात चुकून जाऊ नये.

अंगठ्यावर मयूर पंखी चिन्ह/ठसा खूपच कमी पाहावयास मिळतो. हें चिन्ह विद्वता, हुशारी, नेतृत्व व संपन्नतेचे प्रतीक आहे. डाव्या हातावर म्हणजे संचिताचा हातावर असले तरी लहान वयातच पुढारपण नेतृत्व करण्याची यांची खुम खुमी असते. यांना नेटनेटके व आकर्षक राहायला आवडते. यांचे कौतुक झाले की हे लोक खुश होतात. त्यावेळेस उदार मनाचे असतात. समोरचा मागेल ते देण्याची यांची प्रवृत्ती असते. मात्र इतर वेळी कंजूष असतात. व्यवसायात यश मिळवितात. तेथेही नेतृत्व करण्याचे सोडत नाही. नोकरीत असता स्वतःला मी किती साहेबाच्या जवळचा हे मिरवितात. खरोखरच साहेबाचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होतात. कानामागून आला आणि तिखट झाला अशी यांची नोकरीतील निंदा बाकीचे सहकारी करतात. मयूर पंख अंगठ्यावर असता हे लोक जन्मतः संपन्न असतात. नेतृत्वाचा वारसा यांच्याकडे येत असतो. हाताच्या दोनही अंगठ्यावर मयूर पंखी चिन्ह असता हे लोक निश्चितच राजकारणात मोठं पद भूषवितात. हे लोक भाग्य घेऊनच जन्माला आलेले असतात. रवी व बुध ग्रहाची कृपा असल्यास मोठं मोठ्या सभा गाजवितात. मान सन्मान मिळवितात.

अंगठा

अंगठ्याचे सामर्थ्य त्याच्या मजबुतीमध्ये - हस्तसामुद्रिकदृष्टया अंगठा मजबूत व बलवान असता असे लोक दुसर्‍यावर अधिकार गाजवितात. यांच्यात निर्णय क्षमता असते. स्वतःच्या मताशी ठाम असतात. अंगठा छोटा, शक्तीहीन लेचापेचा असता दुसर्‍याच्या अधिपत्याखाली काम करतात. निर्णय क्षमता नसते. यांचे हातावर शंख आणि शुक्ती हे ठसे मोठ्या प्रमाणावर सापडतात. ज्यांचे हातावर चक्र व मयूर पंखाचे ठसे सापडतात त्यांचे अंगठे सहसा शक्तीहीन सापडत नाहीत. अगदीच मतिमंद मुलांच्या हातावर चक्र ठसा असला तरी त्याला आयुष्यात आर्थिक अडचण नसते. मात्र अंगठा शक्तीहीन असल्याने संभ्रमावस्था असते व निर्णय क्षमता अजिबात नसते. अंगठा मोठा व मजबूत दोन्ही पेरे प्रमाणात असता, असे लोक विचारी असतात व यांच्यात कृती व निर्णय क्षमता असते त्यामुळे त्यांचा अंगठ्यावर असलेल्या ठशांचा मोठा विपरीत गुणांचा परिणाम हा कमी होतो. विपरीत परिणाम झाला तरी त्यावर मात करण्याची त्यांची क्षमता असते व असे लोक जीवनात यशस्वी होतात. म्हणून अंगठ्याच्या ठश्यांबरोबर अंगठ्याच्या मजबुतीला खूप महत्व आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com