Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधपती पत्नीतील 36 चा आकडा!

पती पत्नीतील 36 चा आकडा!

हस्तसामुद्रिकशास्त्रात बालकाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला आयुष्यभर वैवाहिक सौख्य किती व केव्हापासून मिळेल याचे उत्तर मिळते. वैवाहिक सौख्यात पती-पत्नीच्या नात्यातील सौख्य किती असेल किंवा किती राहील, त्याचे उत्तर विवाह रेषेवरून मिळते. विवाह रेषा डाव्या व उजव्या दोन्ही हातावर असते. अर्थात हातावरील सर्व रेषा दोनही हातावर मुख्य व गौण रेषा स्वतंत्रपणे असतात.

वैवाहिक सौख्य पाहायचे असेल तर डाव्या आणि उजव्या हाताबाबत विचार केला तर जोडीदार कसा मिळेल किती सौख्य राहील संचिताचा डावा हात सांगतो, उजव्या हातावरील विवाह रेषा कर्माप्रमाणे सौख्य किती ते दाखवितो. ज्या व्यक्ती डावखुर्‍या आहेत त्यांच्यासाठी संचिताचा हात हा उजवा व कर्माचा डावा असतो. डाव्या व उजव्या हातावर विवाह रेषा एक दोन किंवा तीनच्या संख्येने असू शकतात. विवाह कधी होईल याचे गणित आपण मागील लेखात पहिले आहे. तरी परत एकदा उजळणी ाठी स्पष्ट करतो कि करंगळीच्या खाली हृदयात रेषा व करंगळीच्या पेर्‍याच्या मधल्या भागावर बुध ग्रह असतो. या बुध ग्रहावर हाताच्या मागच्या बाजूने एक आडवी रेषा एक ते दीड सेंटिमीटरची असते त्यातली मध्यभागी असलेली विवाहाचे वय 25 दाखविते. हृदय रेषेकडे खाली अनुक्रमे कमी वय मोजावे व करंगळीच्या पेर्‍याकडे 25 च्या पुढचे वय सरासरी मोजावे. एकूण पन्नास वर्षाचे वय संपूर्ण बुध ग्रहावर मध्यापासून वर 25 च्या पुढे व मध्यापासून खाली 25 चे खाली वय मोजावे. विवाह रेषा जी स्पष्ठ सरळ व चमकदार असेल ती वैवाहिक सौख्य उत्तम दाखविते, अस्पष्ठ वाकडी जाड पसरट, गडद व छोटीशी वैवाहिक रेषा सौख्यात त्रुटी दाखवते.

बालकाच्या हातावर बाणाने विवाह रेषा दाखविली आहे.

- Advertisement -

– नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या हातावर मूठ उघडली कि सर्व रेषा दिसून येतात. त्याचप्रमाणे विवाह रेषा सुद्धा हातावर असते. विवाह रेषेच्या कारकत्वानुसार विवाहसौख्य लाभत असते. आणखी एक महत्वाचे म्हणजे विवाह रेषा डाव्या व उजव्या हातावरची कधीही बदलत नाही. विवाह जमविताना कितीही कुंडल्या जुळविल्या तरी विवाह सौख्यात बदल होत नाही. त्यासाठी नेहमी म्हणतो की, वैवाहिक सौख्यात सुख हवे असेल तर तडजोड करावी लागते. पती पत्नीने एकमेकांच्या स्वभावानुसार नमते किंवा जुळवून घेतले की,वाद कमी होतात व वैवाहिक सुख प्राप्त होते. कारण वैवाहिक सौख्य नशिबातच असावे लागते. ते जन्मकुंडली जुळवून प्राप्त होत नाही. वैवाहिक सुख प्राप्त करून घेताना तडजोड महत्वाची आहे. कारण भिन्न स्वभाव व आवडी निवडी, दिनचर्या व वेगवेगळ्या व्यक्तीच्या अंगवळणी पडलेल्या सवयी. नव्या नवरीला किंवा सुनेला नवर्‍याच्या घरातील चालीरीती, स्वयंपाक बनविण्याच्या पद्धती, पेहेराव इत्यादी अनेक बाबी नवीन असतात. सासरी आल्यावर नव्या सुनेला सासरच्या सर्व गोष्टींशी तडजोड करावी लागते किंवा त्याप्रमाणे वळण लावून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यात ज्या यशस्वी होतात त्यांच्या पदरात सुख लवकर प्राप्त होत. ज्यांना तडजोड करणे जड जाते, ज्यांना टोमणे मारले कि अतीव दुःख होते. छोट्या छोट्या गोष्टीत वाईट वाटते किंवा ज्या हळव्या मनाच्या आहेत त्यांना सासरी नवर्‍यासकट सर्वांकडून भावना दुखविल्या जातात व त्या सुखी होऊ शकत नाहीत.

निब्बर मनाच्या, व्यवहारी, कुचके टोमण्यांना भीक न घालणार्‍या कमी बोलणार्‍या, समजावून घेणार्‍या, योग्य ते ऐकणार्‍या सुना सुख प्राप्त करून घेतात. ज्या सुना छोट्या छोट्या गोष्टींकडे कानाडोळा करतात किंवा त्रास करून घेत नाहीत त्यांना शांतता व सुख दोन्ही प्राप्त होते. छोट्या छोट्या बाबीत मतभेत असतात परंतु त्या मनाला लावून न घेता वाद विकोपाला जात असेल तर त्या सोडून दिलेल्या बर्‍या. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा मतभेदाच्या वेळी संपूर्ण आयुष्य पणाला लावणे योग्य नव्हे, संपूर्ण आयुष्याचा विचार केला तर ते निरर्थक ठरते. आततापर्यंत आपण वैवाहिक सौख्यात मतभेदासाठी सुनेने नमते जुळते घ्यावे याचा विचार केला. परंतु तमाम नवरे मंडळींनी आपल्या सहचरणीच्या मनाचा, तिला होणार्‍या वेदनांचा, इच्छा आकांक्षाचा विचार करावा. तिची बाजू घ्यावी कारण ती घरात नवर्‍याशिवाय कोणालाही सहसा आपल्या वेदना सांगत नाही आणि नवराच तिचा नाही, ही भावना नव्या नवरीला आत्यंतिक वेदना देऊन जाते. वेदनेवर फुंकर घालण्याचे काम पतीने केले तरच वैवाहिक सुखात गोडी निर्माण होईल.

वर नमूद केल्याप्रमाणे विवाह रेषा हि पती पत्नीचे सौख्य किती असेल किंवा राहणार आहे हे दाखविते. पती-पत्नीतील मतभेदांची टक्केवारी सोबत सर्व फोटोत दिली आहे. त्यामध्ये विवाह रेषा हृदय रेषेकडे थोडी वक्र झालेली असेल तर 15 टक्के मतभेद. त्यापेक्षा जास्त वक्र होत जाऊन हृदय रेषेकडे वळत असेल तर अनुक्रमे तीस टक्के, पंचेचाळीस टक्के, सत्तर टक्के व शंभर टक्के 36 आकडा पती पत्नीमध्ये असतो.

विवाह रेषा हृदय रेषेला वक्र होऊन जर स्पर्श करीत असेल तर मतभेद हे टोकाचे असतात, दोघांचे स्वभाव व आवडीनिवडी भिन्न असतात त्यामुळे त्यांच्या उभ्या आयुष्यात बिलकुल पटत नाही. परंतु वयाच्या 48 वयानंतर अर्धा संसार झाल्यावर प्रत्यक्ष असलेल्या मतभेदाची दरी जसे वय वाढेल त्याप्रमाणे कमी होत जाते. कारण पती पत्नी दोघेही एकमेकांचे स्वभाव ओळखू लागतात. असे असंख्य जोडपे आहेत की,त्यांनी मतभेद असूनसुद्धा वाद विकोपाला नेला नाही. एकमेकांनी नमते घेऊन आलीया भोगासी म्हणून संसाराचा गाडा रेटून नेला ते आज नातवंड-पतवंडात रमून गेलेले आहेत. हे फार कडक शिस्तीचे होते, ही फार चिडखोर होती असं म्हणत संसारात गोडी कायम ठेऊन आहेत. काहींचे वाद विवाद दिवसा होतात रात्रीतून ते शमून जातात. एकमेकांचे कधीही पटले नाही तरी त्यांनी त्यांचा संसार मोडला नाही. कर्तव्याचे पालन केले. कुटुंब तर संभाळलेच शिवाय मुलाबाळांना मोठे केले आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे कि 10 पैकी 9 जोडीदारांना लग्न झाल्यावर व नंतर असे वाटतं असते कि आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला नाही. काही अपवादत्मक अश्या जोड्या आहेत त्या एकमेकांस अनुरूप आहेत व आपल्या जोडीदाराबाबत समाधानी आहेत.

माझ्याकडे हजारो हातांचे जातकाचे फोटो आहेत. आजही त्यातून शुभत्व असलेले विवाह रेषा शेकडो हातावरून शोधावी लागते. म्हणजेच वैवाहिक सुखाची सुखदायी रेषा किती दुर्मिळ आहे याचा प्रत्यंतर येतो. जीवनाचे हेच सत्य आहे की वैवाहिक सुख नशिबातच असावे ते जन्म कुंडलीतील गुण जुळवून मिळत नाही तर ते सौख्य फक्त तडजोडीनेच प्राप्त होते. अन्यथा नाही!

- Advertisment -

ताज्या बातम्या