गुरुच्या प्रभावातील नम्र सुपरस्टार

भविष्य आपल्या हाती
गुरुच्या प्रभावातील नम्र सुपरस्टार

शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी झाला. त्यांची आई गृहिणी तर वडील रामोजीराव गायकवाड हे पोलीस हवालदार होते. त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील मावडी कडेपठार येथील होते. रजनीकांत यांनी चित्रपट क्षेत्रात अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून चौफेर यश मिळविले. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 160 चित्रपट केले. ज्यात तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. चित्रपटांमधील त्यांची अनोखी अभिनय आणि संवादशैलीचा जगभर चाहतावर्ग आहे. भारत सरकारने त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मभूषण, पद्मविभूषण हे सर्वोच्च नागरी सन्मान आणि 2019 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

1978 ते 1982 पर्यंत रजनीकांत यांनी चार वर्षांच्या कालावधीत 50 चित्रपटांमध्ये आणि चार विविध भाषांमध्ये काम केले होते. या काळात प्रदर्शित झालेले इतर काही लोकप्रिय चित्रपट म्हणजे निनाथले इनिक्कम, तामिळ-कन्नड द्विभाषिक प्रिया, तेलुगू चित्रपट अम्मा इवरिकैना अम्मा आणि मेलोड्रामा आरिलिरुंथु अरुबाथु वराई. सुजाता यांच्या गुप्तहेर कादंबरीवर आधारित प्रिया त्यांचा पहिला चित्रपट. रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांच्या अकरा तमिळ रिमेकमध्ये भूमिका केल्या व ते चित्रपट गाजले. त्यांना दक्षिणेचा अमिताभ बच्चन म्हणूनही ओळखले जाते.

हातावरील गुरु ग्रहाचा प्रभाव

उजवा हात - गुरु ग्रह पहिल्या बोटाखाली तिसर्‍या पेर्‍यापासून हृदय रेषा व मस्तक रेषेपर्यन्त विस्तारित असतो. गुरु ग्रहावर आडव्या रेषेचे किंवा गोलाई घेतलेलं वलय असता त्यास गुरु वलय म्हणून ओळखले जाते. हे गुरु वलय व्यक्तीस बंधुभाव, सहिष्णुता, धार्मिकता व शुद्ध आचरण प्रदान करते. गुरु ग्रहावर प्रभाव टाकणारे हातावरचे पहिले बोट सरळ स्वतंत्र व त्यावरील पेरे यांची लांबी समान असता गुरु ग्रहाचे बळ आणखी वृद्धिंगत होते. गुरु ग्रहाच्या मध्यावर येऊन पोहोचणारी हृदय रेषा अथवा पहिल्या बोटाच्या तिसर्‍या पेर्‍यात येऊन पोहोचणारी हृदय रेषा गुरु ग्रहाच्या सात्विकतेत आणखी भर घालते.

गुरु ग्रहाच्या पेर्‍यात जर हृदय रेषा जाऊन थांबत असेल तर अशा व्यक्ती आदर्शवत असतात. सचोटी व निष्ठा असते. आयुष्य रेषेतून गुरु ग्रहावर येणार्‍या रेषा त्या व्यक्तीस आयुष्याच्या सरते शेवटी उत्कर्ष, यश व समाधान देतात. रजनीकांत यांचं गुरुचे बोट सरळ व त्यावरील पेरे समान उंचीचे व त्यावर गुरु वलय आहे. हृदय रेषा गुरु बोटाच्या पहिल्या पेर्‍यात गेलेली, आयुष्य रेषेतून दोन उत्कर्ष रेषा गुरु ग्रहावर गेल्या आहेत. हातावर दोन हृदय रेषा आहेत. मुख्य हृदय रेषा गुरु ग्रहावर पहिल्या बोटाच्या तिसर्‍या पेर्‍यात गेली आहे. तसेच मुख्य हृदय रेषेच्या वर रवी ग्रहावरून म्हणजेच तिसर्‍या बोटाखाली उगम पावलेली आणखी एक बारीक व पातळ हृदय रेषा असून तिचा शेवट सुद्धा गुरु बोटाच्या पेर्‍यामध्ये झाला आहे. दोन नंबरची हृदय रेषा रजनीकांत यांना भावनिकदृष्ट्या अतिसंवेदनशील केले आहे. गुरु ग्रहाने राजकारणात येऊ दिले नाही

राजनीकांत यांनी राजकारणात येण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यात यशस्वी झाले नाही. याला कारण रजनीकांत यांच्या हातावरील गुरु ग्रहाचाच प्रभाव आहे होय. गुरु ग्रह सहिष्णुता, बंधुभाव, प्रेम व उच्च प्रतीची नीतिमत्ता बहाल करत असल्याने राजकारण्यांच्या बाजारात आपला टिकाव शक्य नाही हे त्यांना लक्षात आल्याने विविध आघाड्यांवर सर्व प्रयोग झाल्यावर त्यांनी राजकारणापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळेच हे घडले. हातावरील पहिले बोट मधल्या बोटापेक्षा उंचीला थोडे लहान, जाड व हातावर स्वतंत्र उघडणारे असेल तर अशा व्यक्ति प्रभावी नेतृत्व करून राजकारणात, समाजकारणात व धर्मकारणात येतात व यशस्वी होतात.

रजनीकांत यांचे हातावरील पहिले बोट लांबीला-उंचीला फार मोठे नाही व जाडही नाही. त्यामुळे अंगात नेतृत्व करण्याची खुमखुमी नाही. रजनीकांत यांच्या हातावरील गुरु ग्रह शुभत्व घेऊन आलेला आहे. गुरु ग्रहावर गुरु वलय आहे. गुरु ग्रहावरील गुरु वलय असता व्यक्तीत धार्मिकता, सात्विकता, न्याय बुद्धी, शुद्ध आचरण व नेकीने व्यवसाय, नोकरी करणारे होतात व असतात. गुरु ग्रहावरील गुरु वलय असता ती व्यक्ती व्यावसायिक होत नाही किंवा नफेखोर असत नाही. सर्वसाधारणपणे गुरु वलय गुरु ग्रहाच्या पहिल्या बोटाखाली संपूर्ण गुरु ग्रह अंकित करत असेल किंवा रेषेचा-वलयाचा वेढा पूर्ण करीत असेल तर अशी व्यक्ती अतिश्रीमंत असत नाही. परंतु रजनीकांत अपवाद आहेत. गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांच्या स्वभावात कायम नम्रता दिसून येते. तसेच दुसर्‍या व्यक्तींच्या समस्या व वेदना यांचा ते नेहमी विचार करतात व विचारात घेतात.

अभिनय शैली - रजनीकांत हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लोकप्रियतेचे श्रेय अनोखी शैलीतील संवाद आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामध्ये आहे. सामाजिक बांधिलकी कायम जपल्याने जनतेत आदराचे स्थान आहे. त्यांच्या लोकप्रियतेची अनेक कारणे देता येतील. दर्शकांमध्ये मनोरंजनाच्या भावनेतून संदेश देण्याचे ते काम करतात. रजनीकांत यांच्या अभिनयातील सामाजिक संदेशात सुद्धा गुरु ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. अभिनयाच्या खास शैलीचे वरदान चंद्र ग्रहाकडून तळहाताच्या मध्यभागी मणिबंधापासून उगम पावणारी एक स्वतंत्र रेषा मस्तक रेषेत जाऊन विलीन होते आहे. ही चंद्र प्रभावी रेषा आयुष्य रेषे इतकीच रुंद व ठळक आहे. तळहाताच्या मध्यभागी उगम पावत असल्याने शुक्र व चंद्र या दोनही ग्रहांचे गुणधर्म या प्रभाव रेषेस प्राप्त झाले आहेत. मस्तक रेषेत जाऊन मिळणारी ही प्रभाव रेषा हातावर सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे. मस्तक रेषेत चंद्र प्रभाव रेषा विलीन होताना मस्तक रेषेला दोन फाटे फुटले आहे. एक फाटा वरच्या मंगळ ग्रहावर गेला आहे व दुसरा चंद्र ग्रहावर उतरला आहे. चंद्र प्रभाव रेषा मस्तक रेषेत विलीन होता असताना प्रभाव रेषेपाशी असलेल्या शुक्र, चंद्र ग्रह व मस्तक रेषेस वरच्या मंगळ ग्रहाची चिकाटी हा गुणधर्म प्राप्त झाला आहे. शुक,चंद्र व वरचा मंगळ या तीन ग्रहांची शुभ फळ प्राप्त झाल्याने रजनीकांत यांच्यात खास अभिनयाची शैली विकसित करण्याची प्रेरणा व त्यावर मेहनत घेऊन अंमलबजावणी करण्याची मानसिकता प्राप्त झाली आहे. शुक्र,चंद्र व वरचा मंगळ व मस्तक रेषेच्या बुद्धी चातुर्याने एक संवाद आणि अभिनयातील विशेष शैली त्यांना प्राप्त आहे.

रजनीकांत यांच्या गुरु तत्वाची आणखी एक ओळख- बॉलिवूडमधील सुपरस्टार आपली तारुण्यातील रुबाबदार व्यक्तिमत्वाची ओळख कायम ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी चेहेर्‍यावर उपचार करून घेतात. विग वापरतात नानाविध प्रकाराने तरुण दिसण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. रजनीकांत मात्र सार्वजनिक जीवनात, मीडियात आपले वय लपवीत नाहीत. मोठे टक्कल पडलेले असूनही कोणत्याही प्रकारचे केसांचे विग घालीत नाहीत. आहे तसे ते जनते समोर येतात. ही त्यांची गुरु तत्वाच्या उच्च विचारांची परिणीती होय. तस पहिले तर रजनीकांत यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेसाठी, निरनिराळी रूपे व पेहेराव धारण केला आहे. परंतू सार्वजनिक जीवनात त्यांचा पेहेराव त्यांनी सामान्य ठेवला आहे.

रजनीकांत यांच्या हातावर गुरु ग्रहाखाली आयुष्य रेषेतून उगम पावलेली व करंगळीपर्यंत जाताना हृदय रेषेला छेद देणारी रेषा आहे. तसेच करंगळीच्या खाली बुध ग्रहावर दोन विवाह रेषा आहेत. या विवाह रेषा जाड व पसरट आहेत. हृदय रेषेला छेदणारी रेषा आपल्या कुटुंबियांकडून वेदना देतात. तसेच विवाह रेषा जाड पसरट असल्याने पती, पत्नीचे विचार व आवडी निवडी भिन्न असतात. यामुळेच रजनीकांत यांना वैवाहिक व कौटुंबिक सौख्यात निश्चितच कमतरता लाभली असणार आहे. आयुष्य रेषसोबत रजनीकांत यांच्या हातावरील मंगळ रेषा अखंड आहे. त्यामुळे त्यांना अधिकची ऊर्जा व उत्साह प्रदान आहे. आयुष्य रेषेतून वय वर्ष 28, 32, 40, 50, 61 व 68 वयात उत्कर्ष रेषा अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे रजनीकांत यांचा उत्कर्षाचा आलेख तरुणपणापासून वार्धक्यापर्यंत आहे.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com