Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधमाणुसकी हवी नैतिकता नको !

माणुसकी हवी नैतिकता नको !

लोकांमधली उपजत माणुसकी अनेक मार्गांनी दडपल्यामुळे आणि नष्ट केल्यामुळे नैतिकमूल्यांचा पर्याय तुमच्या आयुष्यात थोडी शिस्त राहावी म्हणून आणला गेला. आजच्या जगात जर नैतिकता काढून घेतली तर अनेक लोक जनावरांसारखे वागतील. हे असं घडलं कारण आपण आपल्यातली माणुसकी सतत जिवंत आणि जागृत राहावी यासाठी काहीच केलेलं नाही. माणुसकीला मारून टाकल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून नैतिकता आली, जेणेकरून तुमच्यात आणि तुमच्या सभोवताली शिस्त आणि शहाणपण टिकून राहावं. जर माणुसकी पूर्णशक्तीनिशी जिवंत असती तर तुम्हाला नैतिकतेची गरज पडली असती का? नक्कीच नाही.

हे तुमच्या लक्षात आलंय का, की एखादा जेवढा अधिक नैतिक असेल तेवढं तुम्हाला त्यांच्यापासून दूर जावंसं वाटतं. हे पाहिलंय का तुम्ही ? नैतिकता हे एक मूल्य आहे, ते आपण निर्माण केलंय तर माणुसकी ही माणसाच्या प्रकृतीतच आहे. तुम्ही माणूस आहात, ही काही कल्पना नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या हृदयातली माणुसकी जागृत करायची आहे, मग लोक आपोआप छान राहतील. आत्ता आपण माणुसकीला गोठवून ठेवलंय आणि आपण नैतिक माणूस असल्याचं सोंग करत आहोत. आपण चांगले होण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे फक्त ढोंगीपणा बळावत आहे. लोक अदभूत माणसं झालेली नाहीयेत.

- Advertisement -

योग याचा शब्दशः अर्थ ऐक्य किंवा मिलन असा आहे. म्हणजे तुमच्या अनुभवात सर्व काही एक झालेलं आहे. समजा आत्ता तुमच्या सभोवतालची माणसं ही तुमचाच एक भाग किंवा तुम्हीच आहात असा अनुभव जर तुम्हाला आला तर तुम्हाला कुणीच नैतिकता शिकवण्याची गरज पडणार नाही. असं झालं तर मग लोकांना इतरांशी चांगले वागा. इतरांना त्रास देऊ नका. चोरी, खून करू नका असं शिकवण्याची गरजच उरणार नाही. जर एका क्षणासाठी जरी तुम्ही असं अनुभवलंत की तुमच्या सभोवतालची प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू हा तुमचाच एक अविभाज्य भाग आहेत, तर त्यानंतर तुम्हाला नैतिकतेची गरज भासणार नाही. म्हणजे आपल्याला गरज आहे ती सक्रिय, जिवंत माणुसकीची, नैतिकतेची नव्हे.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सदगुरु हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या