गुढी उभारली, चैतन्य पसरले घरोघरी

गुढी उभारली, चैतन्य पसरले घरोघरी

थंडी संपून ,उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. होळीच्या सणाला सर्व अमंगल, अशुभ ,पापी गोष्टींचे दहन झाले आहे. रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगावून, असे जणू सगळ्यांना सांगत असते. रंगात रंगून घ्या आनंदात भिजून घ्या, कारण आता आपले नविन वर्ष येत आहे. जणु नवीन वर्षाच्या स्वागताला, सृष्टीच साक्ष देते आणि सप्त रंग उधळत रंगपंचमी, आपल्या गुढीपाडव्याच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेली असते आणि सांगते जय्यत तयारी करा, मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे ,त्याच्या पाऊलखुणा उठवण्यासाठी त्यानेच सुवर्ण किरणांच्या पायघड्या अंथरल्या आहेत. निसर्ग सांगतो आहे, जुने टाकून,नवे हिरवे शालू नेसून घ्या नवी कोवळी पालवी फुटली आहे.आंबा मोहरलेला आहे. आणि म्हणूनच की काय वृक्ष वेली, जुनी पाने झटकून टाकून पुनर्जन्म भेटतो तसे पुनर्जीवित होतात.

गुढी पाडवा या सणाने मराठी संस्कृतीचा नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीसाठी बांधला जाणारा बांबू जसा उंच असतो. त्याप्रमाणे या घरातील प्रत्येक व्यक्ती अशीच उतुंग भरारी घेऊन, आरोग्य लाभो,सुखात आनंदात राहो! त्यांच्या पंखात एवढं बळ असो की ,आकाशात गवसणी घालावेी घरात सुख समृद्धी, शांतता असो ही प्रार्थना करतात. या बांबूला नवीन साडी,तांबडा कलश ,आंब्याची डहाळी,साखरेची गाठी, कडूलिंबाची छोटी फांदी, हार असा श्रृंगार या गुढीचा केला जातो.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते. हा सण आनंद ,मांगल्य,यांचे प्रतीक असतो,एकुणात या सगळ्याला गुढी म्हणतात. या दिवशी सवर्र् कुटुंबिय नवीन कपडे घालून गुढीची पूजा करतात. या दिवशी बर्‍याच ठिकाणी विशेेष प्रसाद देतात. यात लिंबाचा मोहोर,चिंच गूळ,खोबरे, हिंग घालून चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना वाटली जाते. यातील खासियत ही होती त्यातील प्रत्येक घटक हा आयुर्वेदाच्या गुणांनी बनलेला असतो. जसे की चिंच रक्त शुद्ध करण्यासाठी, कडू लिंब उष्णता कमी करण्यासाठी असतो, खोबरे शरीरातील थंडपणा वाढवते. त्याचबरोबर शेतकर्‍याच्या वर्षाची राशी म्हणजेच ज्वारी, गहू घरी आणलेलं असते आणि कणग्यात भरले जाते.

या रूपाने घरात लक्ष्मीचे आगमन झालेले असते या कारणाने शेतकरीही खुष असतो. धार्मिकतेनुसार बोलायचं झालं तर, याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी,रावणाचा वध केला आणि धर्माचा विजय करून अयोध्येला आले आणि हा दिवस म्हणजे चैत्र महिन्याच पहिला दिवस होता, म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो, आणि याच दिवशी शिव पार्वतीचा विवाह निश्चित झाला, आणि तृतीयेला संपन्न झाला, त्याचबरोबर कुंभाराचा मुलगा शालिवाहन यांनी मातीचे सैन्य करून त्यांच्यावर चैतन्याचा मंत्र टाकून जिवंत केेले व हुमनासारख्या शत्रूचा पराजय केला.अशी अतुलनीय पराक्रम आणि सोहळे याच दिवशी झाले म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो.आणि आपल्या संस्कृतीचा महत्वाचा सण म्हणून साजरा होऊ लागला. साडे तीन महुर्तापैकी, गुढी पाडव्याचा हा एक महूर्त मानला जातो,आणि याच दिवशी आपले भारतीय पंचांग बनवले जाते. त्याची पूजा करूनच त्याच्यातील नक्षत्र आणि ग्रह यांचा अभ्यास केला जातो.या दिवशी नियोजित सर्व कार्य आणि नवे उद्योग,व्यवसाय, सुरू करतात तसेच , वास्तू प्रवेश, व्यवहार, महत्त्वाची खरेदी आणि सोन्याच्या खरेदीसारखे व्यवहार केले जातात.

गुढी उतरायचं मुहूर्त पाहून त्यावेळी गुढीला श्रीफळ फोडले जात आणि त्याचबरोबर गाठीचा तुकडा प्रसाद म्हणून आणि आरोग्याचं प्रतीक वाटला जातो.असे आम्ही प्रत्येक घरी फिरायचो.आणि ज्याचे बताशे ज्यास्त असतील,त्याला तो आम्हाला ज्यादाचे देत नाही तोपर्यंत आम्ही त्याला गुढी पाडवा ,नीट बोल गाढवाअसे बोलायचो,अश्या प्रकारे गुढी साजरी होईची.अशा गोड आणि विनोदी आठवणींनी भरलेला आणि संस्कृतीचा वारसा घेऊन चालणारी गुढी पाडवा हा उत्सहाचा , संकल्पना च सण आहे.

भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.

जय नावाच्या 28 व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या 47 व्या संवत्सरापर्यंत 20 संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात. आणि 48 व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या 7 च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com