जन्मतारखेनुसार भविष्य..Future by date of birth

22 ते 28 जुलै या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future by date of birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून : सौ. वंदना अनिल दिवाणे

22 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमचे व्यक्तिमत्त्च इतरांपेक्षा वेगळे असल्याने कामानिमित्त संपर्कात येणार्‍या व्यक्तीशी जमवून घेणे जड जाईल. तुमचे विचार आणि कल्पना मौलिक असतील. त्यामुळे त्या इतरांना पटतीलच असे नाही.

स्वभाव भावनाप्रधान आणि संवेदनशील असल्याने लहान लहान घटनांचा व इतरांच्या एखाद्या शब्दाचा मनावर खोल परिणाम होईल. काही कारण नसताना व संबंध नसताना कोर्टात हेलपाटे घालावे लागतील. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत कुणाशी पटणार नाही. म्हणून आर्थिक बाबतीत तुम्ही स्वतःचे स्वतंत्रपणे निर्णय घेतल्यास आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

23 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास सिंह आहे. बुध, रवि, नेपच्यून या ग्रहांचे विशेष परिणाम जीवनावर होणार आहेत. स्वभाव अतिशय संवेदनशील असल्यामुळे भोवतालच्या परिस्थितीचा आणि लोकांचा फार परिणाम होणार आहे.

अतिशय कोमल मन आणि दयाळू स्वभाव यामुळे इतरांच्या मदतीला तुम्ही धावून जाल. इतरांनी थोडी स्तुती केली तरी आवड असल्यामुळे त्यांना मदत कराल. काही लबाड लोकांच्या हे लक्षात आल्यास ते गैरफायदा घेतील. स्वतःच्या कल्पना आर्थिक उलाढालीत कार्यान्वित केल्यास मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल.

24 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र,रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. तुमचे जीवन बर्‍याच प्रमाणात वेगळे आहे. कारण तुमचे व्यक्तिमत्त्व संमोहनयुक्त आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी असल्यामुळे व कष्टाची तयारी असल्याने बरोबरीच्या लोकांना मागे टाकून बरेच पुढे निघून जाल.

स्वभाव उदार, दयाळू, व आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी फार उपयोग होईल. आर्थिक स्थिती भाग्यवान असल्याने चांगली राहील.

25 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, नेपच्यून, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. मानसिक शक्ती व इच्छाबल प्राप्त केले तर वरील ग्रहांची चौकट भाग्याची ठरेल. स्वभाव भावनाप्रधान आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर कलाक्षेत्रात उत्तम प्रगती करू शकाल.

जन्मतः प्रतिभेची देणगी लाभलेली आहे. त्याला प्रयत्न व कष्ट यांची जोड दिल्यास आपल्या क्षेत्रात उच्च पद प्राप्त करू शकाल. पैशाविषयी विशेष आकर्षण नसल्यामुळे तुमच्या कामाला उत्तम प्रतिसाद मिळाला तरी धनप्राप्ती होईलच असे नाही.

आर्थिक बाबतीत आयुष्य वेगळे आहे. एखादी अनोळखी व्यक्ती अचानक तुमच्या जीवनात आल्याने प्रथम उत्तम आर्थिक प्रगती व नंतर त्याउलट होण्याची शक्यता आहे.

26 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, शनी, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. जीवनाच्या सुरूवातीला अंगावर मोठी जबाबदारी पडल्यामुळे समोर अनेक अडचणी निर्माण होतील. पण सबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्या अडचणीवर मात करून उत्तरार्धात चांगली प्रगती करू शकाल. 26 तारखेचा जन्म असल्यामुळे शनीची मोठी कृपा असेल.

शनिकृपेने कितीही कष्ट केले तरी थकल्यासारखे न वाटता उत्साह वाढतच राहील. कामातील चिकाटीमुळे व कष्ट करण्याच्या तयारीमुळे पूर्वार्धात आर्थिक स्थिती जेमतेम असली तरी उत्तरार्धात चांगली होईल.

27 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, दबाव आणलेला तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे तुम्ही बंड करू उठाल. दुसर्‍याशी बोलताना शांततेने व सबुरीने घेण्याची कला अवगत करा.

इच्छाशक्ती मजबूत असल्याने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण काल यात शंका नाही. स्वभाव निडर असून स्वतंत्र बाण्याचे आहात. जीवनाच्या पूर्वार्धात क्रोधाच्या अतिरेकामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक कामात आपली सर्व शक्ती पणास लावून कराल व धाडसी स्वभावामुळे नवनवीन कल्पना कार्यान्वित कराल. आर्थिक बाबतीत एक तर मोठ्या प्रमाणात यश मिळेल किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे.

28 जुलै

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांच्या विशिष्ट चौकटीमुळे करिअर आणि दर्जामध्ये नेहमी अनेक बदल होत राहतील. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव राहील.

अनेक धाडसी प्रसंगांना सामोरे जाल. घर व कुटुंब याविषयी प्रेम वाटेल. स्वभाव अतिशय शांत व संवेदनशील राहील. आपल्या व्यवसायात सारखे बदल करीत राहिल्यास आर्थिक स्थिती बिघडून जाईल. त्यासाठी व्यवसायात बदल करू नका.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com