जन्मतारखेनुसार भविष्य..

8 ते 14 जुलै या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून : सौ. वंदना अनिल दिवाणे

8 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमचा स्वभाव आणि जीवन या दोन्ही गोष्टीत बराच विरोधाभास राहिल. त्यामुळे इतरांना तुमची वागणूक म्हणजे एक कोडे वाटेल. तुम्ही लोकांचे चांगले करण्याचा बराच प्रयत्न कराल. मात्र त्याचा योग्य प्र्रतिसाद मिळणे तर बाजुलाच, तेच लोक तुमच्याविरुद्ध जाऊन तुमच्यावर टीका करतील. तुमची महत्वकांक्षा दांडगी असली तरी ती इतरांच्या योजनात चपखल बसणारी नसणार. तुमची इच्छाशक्ती दांडगी असल्यामुळे इतरांचा ‘तुम्ही फार हट्टी आहात’, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. महत्वाकांक्षा पूर्ण करायला कोणत्याही प्रकारची भागीदारी तुमच्यासाठी चांगली नाही. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत दुसर्‍यावर विश्वास नसल्यामुळे तुम्ही फार सतर्क राहाल. हाताखालचे लोक व नोकर यांच्याकडून तुमची फसवणूक होण्याचा संभव आहे.

9 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. स्वतःवर दडपण आणल्यास तुम्ही बंड करुन उठाल. दुसर्‍याशी वागताना सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न करावा. स्वतंत्र बाणा व निडर आहात. उत्तरायुष्यात पुढे जाण्यासाठी त्या शक्तीचा वापर कराल. नवनवीन योजनांमध्ये धाडसी वृत्तीमुळे सर्वात प्रथम भाग घ्याल. आयुष्यात अनेक वेळा निवासस्थान बदलावे लागेल. नातेवाईकांशी पटणार नाही. लवकर विवाह करणे तुमच्यासाठी चांगले नाही. एक तर तुम्ही फार श्रीमंत व्हाल किंवा कदाचित त्याच्या उलट होईल. मधली स्थिती राहणार नाही. नवनवीन योजनांमुळे बहुधा तुम्ही फार श्रीमंत होणार आहात.

10 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. अनेक ग्रहांच्या प्रभावामुळे करिअरमध्ये अनेक वेळा बदल करण्याची शक्यता आहे. धाडसी कामे व त्यातून निरनिराळ्या प्रकारचेे अनुभव घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. आपले कुटुंब व घर यावर तुमचे फार प्रेम राहिल. जीवनभर तुमची प्रगतीकडे वेगवान घोडदौड चालू राहिल. तुमचा स्वभाव अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे बोलणे कमी राहिल. तुमची इच्छा असा अथवा नसो तुम्ही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहाल. तुम्हाला धनाविषयी प्रेम वाटले नाही तरी संरक्षण म्हणून धनसंग्रह हवा-हवासा वाटेल. आपले कुटुंब आणि घर सांभाळीत एके ठिकाणी राहिल्यास आर्थिक स्थिती उत्तम राहिल.

11 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमची कल्पनाशक्ती अतिशय प्रबळ आहे. तुम्हाला अनेक स्वप्ने पाहण्याची सवय आहे. आणि ते तुम्ही खरे करुन दाखविण्याची फार शक्यता आहे. तुमचा उत्साह दांडगा आहे. हाताखालच्या लोकांकडून लष्करी वृत्तीने तुम्ही कामे करुन घ्याल. तुमच्या जीवनात अनेक नाट्यमय प्रसंग येतील आणि त्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. कलाक्षेत्रावर तुमचे फार प्रेम राहिल. तुमचा स्वभाव रोमॅन्टीक आणि संवेदनशील आहे. काव्य, साहित्य, संगीत, टी. व्ही. सिनेमा या क्षेत्राची तुम्हाला फार आवड राहिल. आर्थिक बाबतीत तुम्ही फार सावधानता बाळगली पाहिजे सट्टा, लॉटरीसारख्या व्यवहारात भाग घेऊ नये. शेअर्सचा व्यवहार जपून करावा.

12 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. तुम्ही फार स्वतंत्र बाण्याचे आहात. निडर, धाडसी, उदार, परोपकारी व सर्वांविषयी सहानुभूती असा तुमचा स्वभाव आहे. तुमच्या वरिष्ठात आणि हाताखालच्या लोकात तुम्ही फार लोकप्रिय होणार. तुमची बौद्धीक पातळी उच्च दर्जाची आहे. त्यामुळे सरकारी नोकरी, नगरपालिकामध्ये अधिकारी म्हणून उत्तम प्रकारे काम करु शकाल. घर आणि स्वदेश या विषयी मनात विशेष प्रेम राहिल. तरी पण निरनिराळे प्रदेश पाहण्याच्या दृष्टीने परदेशगमन करणे तुम्हाला फार आवडेल. मोठ-मोठ्या कंपन्या स्थापित करण्यामध्ये व्यापारीदृष्टीने तुम्हाला उत्तम यश मिळेल. राजकारणातही तुम्ही पुढे येऊ शकाल. 30 ते 35 वयाच्या दरम्यान तुमचा भाग्योदय होईल.

13 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमचे व्यक्तीमत्व इतरांपेक्षा फार वेगळे असेल. त्यामुळे कामाच्या निमित्ताने संपर्कात येणार्‍या लोकांशी तुमचे विचार आणि कलांना मौलिक आधार असेल. तुमचा स्वभाव फार भावनाप्रधान आहे. त्यामुळे लहान लहान गोष्टीही तुमच्या मनाला फार लवकर लागतील. तुमचे कुटुंबिय व नातेवाईक यांच्यापासून तुमच्या प्रगतीला अनेक अडथळे येतील. कारण नसताना कोर्टाच्या पायर्‍या तुम्हाला चढाव्या लागतील. व त्यातून आर्थिक नुकसान होईल. पार्टनर घेताना तुम्ही फार सावध राहणे आवश्यक आहे. तुम्हाला अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त असल्याने भावी घटना अगोदरच समजतील. आर्थिक बाबतीत तुमचे सर्व व्यवहार एकट्यानेच कराल.

14 जुलै -

तुमची सूर्य रास कर्क आहे. तुमच्या ग्रहांची चौकट अशी आहे की, भोवतालच्या परिस्थितीचा तुमच्या मनावर फार परिणाम होईल. कोणी थोडीशी स्तुती केली किंवा तुम्हाला शाबासकी दिली तर तुम्ही त्याच्या कामाला लगेच धावून जाल. आयुष्याच्या पूर्वार्धात तुम्हाला स्वतः विषयी व स्वतःच्या कामाविषयी म्हणावा असा आत्मविश्वास वाटणार नाही. परंतु उत्तरार्धात आत्मविश्वास प्राप्त झाल्यामुळे तुमच्या प्रगतीची घोडदौड वेगाने सुरु होईल. तुमची बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. बौद्धिकतेच्या बळावर तुम्ही सहकार्‍यांवर राज्य कराल. आर्थिक बाबतीत जीवनात तुम्हाला भरभरुन यश मिळेल. मात्र त्यासाठी तुम्ही स्वतः घेतलेले निर्णय कृतीत आणायला हवेत. अनेक प्रकारच्या कामातून तुम्हाला धनप्राप्ती होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com