किरोच्या नजरेतून

21 ते 27 एप्रिल 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

21 एप्रिल - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे वाटत राहील. त्यामुळे महत्त्वाकांक्षा फार दांडगी असेल. तिच्या प्राप्तीसाठी जीवाचे रान कराल. इतरांवर हुकूमत चालवण्याची फार हौस वाटेल. तुमची मते फार पक्की असतील. व्यवस्थापनात चांगले यश मिळेल. कामात कडक शिस्तीचे आहात. मित्र सामर्थ्यवान असतील. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. धनसंग्रहात चांगले यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवहारात विपुल धनप्राप्ती.

22 एप्रिल - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट सामर्थ्यवान आणि परंतू विचित्र आहे. त्यामुळे जीवनात विचित्र घटनांना सामोर जावे लागेल. जीवन आंबट गोड अनुभवांनी भरलेले असेल. कामात सतत बदल करावा वाटेल. तसे न केल्यास उत्तम यश मिळणे अवघड आहे. आर्थिक बाबतीत इतरांबरोबर काम करणे अवघड जाईल. स्वतःच्या योजना कार्यान्वित केल्यास विपुल धनप्राप्ती होईल.

23 एप्रिल - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, यशाच्या उंचीवरही नेतील किंवा अपयशाच्या खोल दरीतही ढकलून देतील. भाग्याच्या बाबतीत स्थिती अशी राहील. विचार, कृती, बोलणे यांची गती फार जलद राहील. तर्कशक्ती उत्तम आहे. कोणत्याही विषयात प्राविण्य संपादन कराल. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. कल्पनेचा कामधेनू प्रसन्न असल्यास हवे तेवढा पैसा मिळेल.

24 एप्रिल -वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी असेल की, स्वभाव अतिशय उदार राहील. त्याला जोड म्हणून तुमची शारीरिक शक्ती व वैचारिक उंची चांगली राहील. उधळे लोक जसे पैसे खर्च करतात त्याच प्रमाणात पण त्याच्या उलट अर्थाचे स्त्रोत तुमच्याकडे धावून येतील. सढळ हस्ते दान करूनही धनसंग्रह प्रचंड राहील.

25 एप्रिल - वाढदिवस असलेल्या चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट विचीत्र असल्याने जीवनातही तसेच अनुभव येतील. गूढशास्त्रे, बांधकाम, गुप्त संस्था यांचे आकर्षण असून अभ्यास केल्यास उत्तम गती प्राप्त होईल. आर्थिक स्थिती फार वर खाली राहिल. मात्र मधून मधून मौलिक योजनांमधून मोठ मोठ्या रकमा मिळतील.

26 एप्रिल- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट फार चांगली आहे. जीवनात सावधानता व चातुर्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात आपले लक्ष्य पूरे करतांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल. त्याला कारण तुमचे घरातील लोक व नातेवाईक असतील. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागेल. त्याचे कारण तुमची उत्तम चिकाटी, हट्टी स्वभाव. यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवण्यास चांगले यश येईल.

27 एप्रिल - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. विचारातच नव्हे तर कृती करण्यातही तुमचा स्वतंत्र बाणा असल्याने असलेले बंधन झुगारून द्याल. स्पष्टवक्तेपणामुळे शत्रु निर्माण होतील. रागाने धावून जाण्याची वृत्ती संयमित करावी. क्रिडा क्षेत्रात भरपूर यश मिळेल. विविध प्रकारच्या उद्योगातून भरपूर पैसा मिळेल. इतरांना नोकरी देण्याची क्षमता असल्याने स्वतःबद्दल त्याबाबतीत काळजी करण्याचे कारण नाही.

Related Stories

No stories found.