किरोच्या नजरेतून

11 ते 17 नोव्हेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

त्रैमासिक भविष्य - वृषभ

स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू,षष्ठात रवि-मंगळ-बुध, सप्तमात केतू, अष्टमात शुक्र, नवमात गुरू-शनि-प्लुटो, लाभात नेपच्यून, व्ययात हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे इ, उ, ए, ओ, वा, वी,वू, वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. राशीस्वामी शुक्र, रास पृथ्वी तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली. राशी स्वरूप स्थिर. काहींसा आळशी व ऐशोराम आवड. दक्षिण दिशा फायद्याची आहे.स्त्री लिंग असल्याने स्वभाव लाघवी, रजोगुणी. वर्ण-वैश्य, राशीचा अंमल मुखावर आहे.वाचा स्पष्ट, शुद्ध, प्रभावी असल्याने अभ्यासाने वक्तृत्त्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न हिरा. शुभ रंग- पांढरा व हिरवा. देवता- लक्ष्मी व संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ ता. 6/15/24. मित्र राशी- मकर व कुंभ. शत्रु राशी- सिंह, धनु व मीन. चिकाटी व निश्चयी, कष्टाळू, स्वभाव तेजस्वी. बुद्धिमान.

षष्ठात मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य आहे. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कुटुंबात निष्कपटपणे वागल्यामुळे कौटुंबिक वातावरण शांत राहील. पंडित जनांशी मैत्री राहील. वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल.

स्त्रियांसाठी -व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी - माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि-केतू-बुेध, अष्टमात शुक्र, नवमात शनि-प्लुटो, दशमात गुरू- नेपच्यून, व्ययात हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा त्यात यश मिळेल. स्त्री वर्गाशी विशेष चांगले संबंध रहातील. स्थावर इस्टेटीतून उपजिवीका होण्याइतके उत्पन्न काहींना मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. रागावणे चांगले नाही. नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरूजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्तीमुळे संकटात माघार घ्यावी लागणार नाही. जनसेवेची हौस वाटेल. व्यापार, वैद्यकीय, राजकीय सेवा यातून अर्थप्राप्ती होईल.

अष्टमात शुक्र आहे. पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा. धनप्राप्ती स्वकष्टावर आधारित असावी. कमी श्रमात अधिक धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासमान वाटला तरी त्याचा परिणाम विषासारखा भयंकर असतो.

स्त्रियांसाठी - महिलांचा स्वभाव प्रेमळ राहीला. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे आहे. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21, 24, 25, 27, 28

जानेवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू , सप्तमात मंगळ-केतू, अष्टमात रवि-शुक्र, नवमात बुध-शनी-प्लुटो,दशमात गुरू-नेपच्यून, व्ययात हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमस्थानी असलेल्या रविमुळे नवविवाहीतांना लाभ होतील. विवाहानंतर भाग्योदय झाल्याची प्रचिती येईल. विवाहानंतर लहान लहान गोष्टीवरून वाद होतील. सास भी कभी बहू थी यासारखी परिस्थिती निर्माण होईल.

नवमात बुध आहे. पुत्रसूख उत्तम मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील ती ही सरळ मार्गाने असेल. सत्संग व सत्पुरूषांच्या सेवेपासून लाभ होतील. परदेशगमनाची संधी मिळेल. जुन्या वळणाची धार्मिक मते असूनही नवीन विचारप्रवाहाचे स्वागत कराल.

नवमात प्लुटो आहे. परदेगमनाच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. विश्वबंधुत्वाची भावना राहील. व्यवहार चातुर्यामुळे सांसरारिक स्थिती उत्तम राहील.

लग्नी राहू आहे. नातेवाईकांशी फारसे पटणार नाही.

स्त्रियांसाठी - अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29

जन्मतारखेनुसार भविष्य..

11 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. घेतलेल्या निर्णयात वारंवार बदल केल्यास तोटा होण्याचा संभव आहे. एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करू नये. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे कलेच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकेल. नेहमी आपल्या नादात गुंग असता. आर्थिक बाबतीत विशेष सतर्क रहाणे आवश्यक आहे. विवाहाने अथवा वारसा हक्काने मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

12 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. गुरू व मंगळ यांच्या युती अतिशय सामर्थ्य देणारी आहे. मिचा योग्य उपयोग केल्यास जीवनात उत्तम यश मिळून समाजात महत्त्व निर्माण होईल. आत्मविश्वास दांडगा आहे. जबाबदारीचे कोणतेही काम चांगल्याप्रकारे पार पाडू शकाल. सुरूवातीला जीवनात अनेक अडथळे निर्माण होतील. त्यांना धैर्याने तोंड देऊन व पार करून आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी व्हाल यात शंका नाही. त्यामुळे अनुभव दांडगा राहील. कोणत्याही करिअरमध्ये उत्तम धनप्राप्ती होईल.

13 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. सूर्य व मंगळ हे सूर्य मालिकेतील अत्यंत विध्वंसक ग्रह आहेत. त्यांच्या एकत्रित येण्याने तुमचे जीवन निश्चीतपणे इतरांपेक्षा वेगळे असेल. इतरांनी चोखाळलेला मार्ग करिअरच्यादृष्टीने मुळीच आवडणार नाही. आपल्या सुपीक बुद्धीमत्तेद्वारा नवीन मार्ग शोधून त्यातून प्रचंड यश मिळवून समाजात धमाल उडवून द्याल. अभ्यासाचे विषय ही वेगळे असतील. दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वतःच्या विचाराने तयार केलेल्या योजनांतून चांगला पैसा मिळू शकेल.

14 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. बुधामुळे तुमच्या मंगळाचे सामर्थ्य बौद्धिक दृष्ट्या वाढलेले आहे. व्यवस्थापन कौशल्य तुमच्याकडे भरपूर आहे. इतरांपेक्षा वेेगळ्या वळणाने जाऊन व निरनिराळ्या क्लृप्त्या काढून विपूल प्रमाणात धनप्राप्ती करण्याची क्षमता तुमच्याजवळ आहे. धनप्राप्तीच्या बाबतीत जास्तच भाग्यवान आहात.

15 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य राशी वृश्चिक आहे. या दोन ग्रहांचे एकत्र होणे भाग्यकारक घटना आहे. मात्र कधी कधी याबाबतीत निराशा पदरात पडण्याची शक्यता आहे. नातेवाईकही मत्सराची भावना बाळगतील. त्यागी व परोपकारी वृत्तीमुळे आई-वडील जवळचे नातेवाईक तुमच्यावर प्रेम करतील. जीवनात अनेक अडथळे येतील. एकदा गाडी रूळावर आली की, धनप्राप्तीचा ओघ शेवटपर्यंत सातत्याने सुरू राहील.

16 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या नेपच्यून, चंद्र, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. व्यक्तीमत्वावर नेपच्यूनचा विशेष प्रभाव राहील. हा ग्रह बौद्धिक क्षमतेवर प्रभाव टाकतो. अंतर्मनसूचक स्वप्ने, साक्षात्कार, निरनिराळे भास यांसारख्या सूचना अगोदरच मिळत राहतील. धनप्राप्तीकडे लक्ष दिल्यास प्र्रचंड प्रमाणात पैसा मिळेल. मात्र त्यांचे मार्ग अलौकीक व इतरांच्या लक्षात न येणारे असतील.

17 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. एकमेकांचे शत्रु असलेल्या मंगळ व शनी ग्रहांचे एकत्रिकरण अनेक अडचणी व संंकटे निर्माण करण्याची शक्यता आहे. शनी न्यायाधीश असल्याने अवैध मार्गाला गेल्यास शिक्षा करेल. आयुष्याच्या पूर्वार्धात बराच संघर्ष करावा लागेल. स्वतःचा निर्णय दुसर्‍यावर लादण्याची सवय राहील. एकतर खूप श्रीमंत व्हाल किंवा भयंकर आर्थिक अडचणीत सापडाल. मधला मार्ग नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com