बोटांवरील शुक्ती, मयूरपंख व डबल लूप ठसे व त्यांचे परिणाम

भविष्य आपल्या हाती
बोटांवरील शुक्ती, मयूरपंख व डबल लूप ठसे व त्यांचे परिणाम

प्रफुुुल्ल कुलकर्णी

मागच्या भविष्यवेध अंकात आपण शंख व चक्र ठश्यांचे शुभ अशुभ पाहिले पहिले, आज आपण बोटांवरील उर्वरित ठसे, शुक्ती, मयूरपंख व डबल लूप यांचे शुभ - अशुभ पाहणार आहोत. शुक्ति च्या आकाराचा ठसा शंख ठश्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर बोटांवर आढळतो, आज आपण परत एकदा शुक्ती, मयूरपंख व डबल लूप ठशांचे उपजत गुणधर्म आधी पाहणार आहोत.

शुक्ती, मयूरपंख व डबल लूप ठशांचे उपजत गुणात ते ठसे ज्या बोटावर असतील त्या बोटांवरील ग्रहांच्या कारकत्वात बदल होत असतो. पहिल्या बोटावर- गुरु, दुसर्‍यावर - शनि, तिसर्‍यावर- रवि व चौथ्या करंगळीच्या बोटांवर बुध ग्रहाला स्थान दिलेले आहे. बहुतेक हस्तरेखा तज्ज्ञांना बोटांवरील ठश्यांचे महत्व माहित नाही, ते त्यांच्या भविष्य कथनात बोटांवरील ठशांचा अंतर्भाव करीत नाहीत. परंतु, विज्ञानाने हे सिद्ध केले आहे कि, बोटांच्या ठश्यांचा व मनुष्याच्या मेंदूचा थेट संबंध प्रस्थापित असतो. माणसाची हुशारी मेंदूच्या कामगिरीवर अवलंबून असते, बोटांवरील विविध ठशांचा मानवी बुद्धिमत्तेवर कसा प्रभाव असतो हे संशोधनाअंती सिद्ध आले. बोटांवरील ठश्यावरून डी एम आय टी संगणकीय सॉफ्टवेअर प्रणाली ही व्यक्तीचे अंगभूत कौशल्य ओळखण्याचे काम करते व तेही व्यक्तीच्या दहाही बोटांच्या ठश्यावरून त्या व्यक्तीमध्ये अंगभूत कौशल्य विकास कोणत्या क्षेत्रात आहे याचे निदान करते.

हस्त सामुद्रिक शास्त्रात अंगठ्याच्या ठश्याला अनन्यसाधारण महत्व आहे, अंगठ्याच्या ठशावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व,अंगभूत हुशारी, निर्णय क्षमता व एकंदरीतच आयुष्य कसे व्यतीत करेल याचा लेखा जोखा मिळतो. म्हणूनच हाताच्या दोन्ही आंठ्यावरील ठशांना महत्व आहे, व्यक्तीच्या डाव्या हातावरील अंगठ्याचा छाप हा व्यक्ती स्वतंत्र आपल्या पायावर उभी राहोपर्यंत अथवा नोकरी धंद्याला लागेपर्यंत, स्वतः आत्मनिर्भर होई पर्यंत अत्यंत महत्वाचा असतो, तोपर्यंत ती व्यक्ती आई वडिलांच्या छत्र छायेखाली किंवा अवलंबून असते तो डाव्या हाताचा अंगठा व त्यावरील छापाचे कारकत्व संचिताचे समजला जातो. उजव्या हातावरील अंगठ्याच्या छापाचे महत्व व्यक्ती काम-धंद्याला लागल्यानंतर त्याच्या कर्मासाठी उपयोगाला येतो.

शुक्ती Shukti

शुक्ती चा Shukti ठसा हा सामान्य बुद्धिमत्तेचा समजला जातो यांचे कडे तल्लख बुद्धी व नवीन अविष्कार बनविण्याची क्षमता नसते, यांना तंत्र व सरावाद्वारे शिकवून दिलेले काम नीटनेटके करता येते, त्यात थोडा बदल झाला तरी हे गोंधळून जातात, यांचे त्यांच्या कुटुंबावर अपार प्रेम असते. यांनी एखादी गोष्ट किंवा स्किल आत्मसात केले कि ते बिनचूक काम करतात, हातांच्या बोटांवर जास्त शुक्ती असल्यास हे लोक अभ्यासात व शिक्षणात जेमतेमयश मिळवतात. शुक्ती जर पहिल्या बोटावर असेल तर- धार्मिक भावना असते व घरच्यांच्या संस्काराबाहेर ते जात नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टीत आज्ञा पालन सहसा करीत नाही, अभ्यासात लक्ष नसते, बाहेर लोकांत मिसळायला आवडत नाही, हुशारी व एकाग्रता नसते, शिक्षणात यश मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. दुसर्‍या बोटांवरील शुक्तीचा ठसा - त्या व्यक्तीला आणखी आळशी बनवितो, अंगची हुशारी असेल तर संशोधनात रुची असते, परंतु त्यात धरसोड असते, एकटेपणा आवडतो, तेलकट चमचमीत पदार्थांची आवड असते. कुठल्याही कृतीला हे विलंब लावतात. कोणाचे ऐकून घेत नाही. तिसर्‍या बोटांवर शुक्ती असेल तर कला प्रेमी असतात परंन्तु उच्च दर्जाची कला आत्मसात करता येत नाही, मान सन्मान त्या व्यक्तीच्या ओळखीच्या ठिकाणी मिळतो, परंतु सर्वदूर प्रसिद्धी कीर्ती मिळविण्यासाठी भाग्याची मदत लागते. नीटनेटके राहायला आवडते उंची वस्तूंची अभिलाषा असते. एका रात्रीत श्रीमंत होण्याचे हे लोक स्वप्न पाहतात. चौथ्या बोटांवरील शुक्ति ठसा हा त्या व्यक्तीला व्यापारात हुशारी प्रदान करीत नाही, नवीन योजना, कल्पना नोकरी धंद्यात राबवू शकत नाहीत, आहे ती नोकरी - धंद्यात पाट्या टाकण्याचे काम मात्र उत्तम बजावतात. वक्तृत्वाची कमी असते,आपले म्हणणे मांडण्यात यांना परिश्रम पडतात.

मोर पंखाच्या आकाराचा ठसा Peacock feather shaped impression

हा ठसा मोर पंखाच्या आकाराचा आहे, असे लोक पुढारी होतात व नेतृत्व करतात, यांना स्वतःला पुढारपण करायला आवडते, हे लोंकाना एकत्र आणू शकतात यांची छाप जनतेवर पडते. काही वेळेस स्वतःला ग्रेट सामाजिक कार्यकर्ता मिरविताना हे स्वतःची राहणी व रुबाब दाखवितात व जनता यांचेकडे कशी आकृष्ट होईल याचे ते प्रयोग करीत असतात. नेतृत्व करण्यात हे सफल होतात, मोठे राजकारणी होण्यासाठी यांचे मोर पिसासारखे दिखाऊ चिन्ह यांच्या व्यक्तिमत्वाला चपखल बसते. यांच्यात हुशारी व व्यावहारिकता असते. पहिल्या बोटावर मोर पंखाच्या आकाराचा ठसा असता यांना नेतृत्वाची आवड असते, दिखाऊपणा असतो, धार्मिकता,नैक्तिकता,आचरण यांच्यात सुद्धा दिखाऊपणा जास्त असतो. हे लोक अत्यंत हुशार व चालाख असतात, धार्मिक सामाजिक कार्यात भाग घेतात, संधीचे सोने करतात. दुसर्‍या बोटावर मोर पंखाच्या आकाराचा ठसा असता असे लोक हुशार असतात परंतु खूप हुशार असल्याचा आव आणतात, शनि ग्रहाच्या अधिपत्यात असले तरी नीटनेटके व स्वच्छ राहतात, विनोद करण्याचा प्रयत्न करतात, स्वार्थ असेल तेथे प्रेमाने बोलतात. शनी ग्रहाच्या मूळ कारकत्वात खूप मोठे बदल दिसून येतात. पृथी तत्वाशी निगडित सर्व नोकरी/व्यवसायात यशस्वी होतात.

तिसर्‍या बोटांवरील मोर पंखाच्या आकाराचा ठसा हा आपण जगापेक्षा किती वेगळे आहोत हे दाखविण्याचा यांचा अट्टाहास असतो. रुबाबात राहतात निरनिराळा पोशाख करायला आवडते, कलेची आत्यंतिक अभिरुची व जाण असते अथवा एखादी कला अवगत पण असते परंतु तिचे प्रदर्शन अति असते. मान सन्मान मिळतो परंतु तो प्राप्त करण्याची यांची धडपड कायम चालू असते. कलेतील आत्यंतिक रुची, कला विकसित करण्याच्या कल्पना जबरदस्त असतात. हे लोक अभिनयात पारंगत असतात. चौथ्या बोटावर मोर पंखाच्या आकाराचा ठसा असता बोल बच्चन व व्यापारात हुशार असतात, आकर्षक योजना बनवितात राबवितात व बक्कळ पैसे कमवितात, मी किती चालाख याचे प्रदर्शन करतात.नोकरीतही हुशारी दाखवितात,सर्व जगाची अक्कल यांना आहे असे ते भासवितात परंतु जात्याच हे लोक हुशार असतात. कार्यालयात सत्ता गाजवितात, युनियेन लीडर होतात, अभिनय उत्तम करतात. व्यापार- व्यवसायात निश्चित प्रगती करतात.

डबल लूप ठसा Double loop

डबल लूप ठसा हा द्विधा मनस्थितीची आहे, असे लोक ठाम निर्णय घेऊ शकत नाही, यांच्या मनात कायम मी केले ते बरोबर का चूक, नक्की काय करायला पाहिजे याचा ठाम निर्णय यांचेकडून होत नाही. अंगठ्यावर जर हा डबल लूप चा ठसा असेल तर आयुष्यभर हे लोक द्विधा मनस्थितीत असतात व ऐन वेळी चुकीचा निर्णय घेतात. डबल लूप अंगठ्यावर असतात सी ए किंवा सर्जन होण्याच्या यांनी भानगडीत पडू नये हे लोक अश्या व्यवसायात यश मिळवू शकत नाहीत, ज्या व्यवसायात निर्णय क्षमता असते. डबल लूप ठसा हा दोन शंखाचे ठसे विरुद्ध बाजूस जाणार्‍या आकाराचा असतो. पहिल्या बोटावर डबल लूप असता या लोकांचा कोणावर विश्वास तर बसत नाही परंतु विश्वास देवावर ठेवताना सुद्धा हे लोक द्विधा मनस्थितीत असतात. यांचे आराध्य देवाची रूपे सुद्धा नेहमी बदलत असतात, यांच्या विचार निश्तित नसतात, मग हे विचार कुठल्याही बाबत असो त्यात कायम बदल असतात. दुसर्‍या बोटावर डबल लूप चा ठसा असता शनीच्या तत्व खालील विचारधारेत निश्चितपणा नसतो, यात कोणावर विश्वास ठेऊ का नको, कोणाशी बोलू का नको, कोणता अभ्यास करू, अभ्यास विषयात -संशोधनात, नित्य कर्मात सातत्य नसते, लवकर निर्णय होत नाही, झाला तरी त्यात शंका राहते. तिसर्‍या बोटावर डबल लूप चिन्ह असता हे विविध कलेची रुची दाखवितात परंतु निश्चित कला यांना अवगत होत नाही, येथे कला हा शब्द उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कला जसे संगणक, आय टी क्षेत्र, नेपथ्य, कला दिग्दर्शक, किंवा ज्या क्षेत्रात कौशल्य लागते त्या कौशल्याचा क्षेत्रात या लोंकाची धरसोड वृत्ती राहते हे निश्चित. एका क्षेत्रात थांबत नाहीत. परंतु हुशारी दाखविण्याची व मान सन्मान मिळविण्याची यांची धडपड कायम असते. चौथ्या बोटावर डबल लूप चिन्ह असता यांचे व्यवसाय / नोकरीत मन लागत नाही, त्यात धर सोड वृत्ती असते, समाधानी होत नाहीत. यांच्यात हुशारी असते परंतु मन द्विधा असल्याने निर्णय सारखे बदलतात, त्यामुळे हे लोक नोकर्‍या व व्यवसाय सारखे बदलतात, दैनंदिन कामात सुद्धा आपण केलेले काम नक्की बरोबर आहे का नाही याची त्यांना खात्री होत नाही, त्या मुळे जीवनात नोकरी - व्यवसायात उत्कर्ष करताना अडचणी येतात. डबल लूप बोटावर असणार्‍या व्यक्तिचे निर्णय चुकीचे ठरतात त्यामूळे हे लोक वयस्क झाले तरी दुसर्‍याच्या सल्ल्याने चालतात, मात्र यांच्यात अहं भाव असता दुसर्‍याचे ऐकत नाहीत यांच्या द्विधा निर्णयाचा यांच्या कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यातच डबल लूप अंगठ्यावर असता यांच्या चुकीच्या निर्णयाची फळे दुसर्यांना भोगावी लागतात. डबल लूप जास्त संखेने हातांच्या बोटांवर असता अश्या लोकांनी निश्चितच दुसर्‍याचा सल्ला घ्यावा, सल्ला मसलत करावी व नंतरच निर्णय घ्यावा, यांना यांच्या आयुष्यात सल्लागाराची गरज असते, कुटुंबात,समाजात, नोकरी व्यवसायात दैनंदिन कामकाजात असताना ह्यांच्या निर्णयावर अंकुश ठेवणारे किंवा योग्य सल्ला देणारे वडील धारी अथवा निर्णय क्षम हुशार मित्र असावे लागतात. प्रत्येक बोटावर व त्या ग्रहाच्या कारकत्वा नुसार डबल लूप ठसा असता यांच्या द्विधा मनस्थिती कल्पना येत व कोणत्या क्षेत्रात यांना अडचणींचा सामना करावा लागेल ते कळते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com