Saturday, April 27, 2024

दसरा

दसरा म्हणजेच विजयादशमी दशहरा असेही एक नाव ह्या दिवसाला आहे. या सणाला विजयादशमी असे म्हणतात. त्याचबरोबर दसरा शब्दाचा अर्थ आहे रावण. म्हणजेच दस + रा = 10 तोंडे असलेला रावण असा हा दसरा शब्द तयार झालेला आहे . तसेच खरा शब्द हा दसहरा असा आहे.

विजया दशमी म्हणजे वाईट वृत्तीवर चांगल्या वृत्तीचा विजय होय. आता वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे रावणाच्या गर्वावर जसा प्रभू श्रीरामांनी विजय मिळवला. विजया दशमी साजरी करण्यामागे रामाचा रावणावर विजय मिळवणे फक्त एवढेच कारण नसून त्यामागे अजून बर्‍याच पौराणिक कथा आहेत. त्यातील एक आहे ती म्हणजे दुर्गा देवीची. महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून विजय मिळवला. ज्याप्रमाणे देवीने राक्षसी प्रवृत्तीचा विनाश केला. दुर्गा देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाशी पूर्ण नऊ दिवस वेगवेगळी नऊ रूपे धारण करून वध केला म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर हे देवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून दशमीला दसरा सण साजरा केला जातो.

- Advertisement -

त्याचप्रमाणे स्वतःच्या मनातील वाईट गोष्टीचा, राक्षसी वृत्तीचा, वाईट विचार धारणेचा, क्रोधाचा आणि दूषित मन ह्या सगळ्या गोष्टींना हरवून चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा विनाश करायचा असतो. आपले वाईट विचार जाळायचे असतात म्हणजेच मनातून काढून टाकायचे असतात आणि नवीन चांगल्या विचाराने आयुष्याला पुन्हा सुरुवात करायची असते. रावणाला 10 डोक्याची प्रचंड बुध्दिमत्ता होती म्हणजेच तो खूप ज्ञानी होता . त्याला 10 शक्ती प्राप्त होत्या. त्या शक्ती पुढीलप्रमाणे आहेत . रावणाचे 10 डोकी म्हणजेच त्याच्या गुणांचे प्रतिनिधीत्व करतात . 1) काम म्हणजे वासना, 2) क्रोध, 3) मोह, 4) भ्रम, 5) लोभ, 6) माद म्हणजे अभिमान, 7) मातस्य म्हणजे हेवा, 8) बुद्धी, 9) वाईट चित्त, वाईट इच्छा, 10) अहंकार , गर्व अशी ही रावणात असलेली 10 प्रकारची शक्ती.

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे.

पराक्रमाचा आणि पौरूषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेले दिसतात. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रुवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी! देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युध्द करून संपविले ते याच दिवशी! आणि त्यामुळेच तिला महिषासूरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपुत आणि मराठा योध्दे आपल्या युध्द मोहिमांचा आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असत. अज्ञानावर ज्ञानाने. वैर्‍यावर प्रेमाने आणि शत्रुवर पराक्रम गाजवित विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा हा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याकरिता अत्यंत शुभ समजला जातो. कित्येक लोक नव्या प्रतिष्ठानांची सुरूवात दसर्‍यापासून करतात. नवे वाहन यादिवशी घेतले जाते. वाहनाची पूजा केली जाते. शस्त्रांची पूजा करण्याचा देखील प्रघात आहे. सरस्वती पूजन या शुभमुहुर्तावर करतात. आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याची पानं दिली जातात. या दिवशी सिमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमीपूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजिता पूजन देखील केले जाते. तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची.

विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने का देतात यामागे एक कथा सांगितली जाते ती अशी. फार पूर्वी ज्यावेळी गुरूशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतू नावाच्या गुरू-शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत. कौत्स नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्याकरिता राहत असे. ज्यावेळी विद्याभ्यास पूर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरूजींना गुरूदक्षिणेबद्दल विचारले त्यावेळी वरतंतू ऋषी म्हणाले, वत्सा विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरीता असते. त्याचा मोलभाव करायचा नसतो. त्यामुळे मला गुरूदक्षिणा नको परंतु कौत्स ऐकेचना त्यामुळे गुरूजी म्हणाले ,‘मी तुला चौदा विद्यांचे ज्ञान दिले म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा द्यावयास हे ऐकून कौत्स या सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरिता निघाला परंतु त्या जमविणे तेवढे सोपे काम नव्हते. कौत्स रघुराजाकडे गेला आणि चौदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली परंतु काही वेळापुर्वीच रघुराजाने आपली संपूर्ण संपत्ती ब्राम्हणांना दान केली होती पण तरी देखील राजाला कौत्साला विन्मुख जाऊ द्यायचे नव्हते म्हणून रघुराजाने कौत्साला तीन दिवस थांबण्यास सांगितले आणि त्याला स्वतःजवळच ठेऊन घेतले. रघुराजाने इंद्रदेवाला आपली उर्वरीत रक्कम देण्यास फर्मावले अन्यथा युध्दास तयार हो म्हणून सुनावले.

इंद्रदेवाने त्वरीत रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेराकरवी आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवीला. रघुराजाने कौत्सास हव्या तेवढ्या सुवर्ण मुद्रा घेऊन जाण्यास सांगितले परंतु कौत्साने केवळ चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि त्या वरतंतू ऋषींना घेण्याची विनंती केली. उर्वरीत सुवर्ण मुद्रांचे कौत्साने आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ढिग रचले आणि सामान्य नगरवासीयांना हव्या तेवढ्या मुद्रा घेऊन जाण्याची विनंती केली. तो दिवस विजयादशमीचा होता.अचानक श्रीमंत होण्याची संधी चालून आल्याने नगरवासीयांनी आपट्याच्या आणि शमीच्या झाडाची पूजा केली आणि तेव्हापासून सुवर्णमुद्रांऐवजी आपट्याच्या पानांची देवाणघेवाण या दिवशी सुरू झाली.

आपट्याच्या झाडाला अश्मंतक आणि वनराज देखील म्हणतात. कफ व पित्त दोषांवर ही पानं गुणकारी समजली जातात. शमीचे झाड – पांडव ज्यावेळी अज्ञातवासात निघून गेले त्यावेळी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रं शमीच्या झाडामध्ये लपवीली होती. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीची देखील पूजा केली जाते. एकमेकांमधले परस्परांमधले प्रेम व्यक्त करण्याचा हा शुभदिन दसरा अत्यंत सुंदर असा सण आहे.

वर्षातील हाच एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी आपण आवर्जून एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संत तुकाराम महाराजांनी कितीतरी पुर्वीच या सणाचे महत्त्व आपल्या काव्यातून अधोरेखीत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या