वास्तूदोष निवारणाने भाग्य बदलते?

वास्तूदोष निवारणाने भाग्य बदलते?

प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या आयुष्यातील सुख दुःखे हे भिन्न असतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचे स्वतःचे नशीब असते. त्याला जीवन जगताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. समोर अनंत अडचणी असता, त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडला नाही. त्यामुळे व्यक्ति ज्योतिष्याकडे जाते. ज्योतिषी आपल्या कुवतीप्रमाणे समस्या निवारण कधी होईल, ते सांगतो, उपाय देतो. प्रत्येक ज्योतिष्याच्या ज्ञानाप्रमाणे किंवा त्याला येत असलेल्या गूढ अभ्यासाप्रमाणे तो उपाय देत असतो. समस्या सुटत नसल्याने परत परत ज्योतिषांचा सल्ला घेतला जातो. तरी समस्या आहे. तशी राहिली की, वास्तू दोषाकडे बोट दाखविले जाते. ज्योतिषी वास्तूतज्ज्ञ असेल तर तो वास्तू दोष निवारण करण्याचा सल्ला अगदी आग्रहपूर्वक देतो. वास्तूतज्ज्ञाने वास्तूचे परीक्षण केले कि तो त्यावर उपाय सांगतो.

आजकाल वास्तू दोष निवारण्यासाठी वेगवेगळे उपाय उपलब्ध आहेत. वास्तू उपायांसाठी मोठा खर्च असतो. वास्तूच्या अंतर्गत व बाह्य बदल हे बांधकाम तोडाफोडीचे असेल तर आणखी मोठा खर्च येतो. पिरॅमिड, लोलक, जमिनीत पुरायचे यंत्र, रत्न अशा अनेक वस्तुंनी वास्तूतज्ज्ञ वास्तू दोष घालविण्यासाठी उपाय करीत असतो. वास्तूतज्ञाची वास्तू दोष घालविण्यासाठीचे शुल्क तर भविष्यकारापेक्षा खूप मोठी असते व जातक ती द्यायला किंवा खर्च करायला तयार असते. त्याचे असे मत असते कि वास्तूत दोष नको. कायमस्वरूपी राहत्या घरात वास्तूदोषामुळे उत्कर्ष थांबायला नको. समस्या वाढायला नको किंवा आहे त्या समस्या लवकरात लवकर संपुष्ठात येण्याची मनोकामना असते.

जातकाचे प्रश्न काही...

घरामधील कलह का होतात? वास्तूमुळे अपत्य प्राप्ती होत नाही का ? सासू-सुनांचे पटते का? सासुरवास, अडचणी, आरोग्य, पैसा, नोकरी, लग्न, वाईट स्वप्ने, भीती तसेच घरातील मंडळी त्यांचे स्वभाव वैशिट्ये. रागीट, थंड, भावनिक, आक्रमक,आक्रस्ताळी, न ऐकणारे , हेकेखोर, खर्चिक, अतिव्यवहारी, स्वप्नाळू त्यामुळे घरात होणारे कलह या स्वभावामुळे होणारे घरातील कलह बाहेरची बाधा झालेले, बाधा कधी जाईल? लग्न कधी? संसारिक सुख किती? विवाह न जमणे, आपत्य न होणे, आर्थिक अडचणी, खर्च ,नुकसान, आरोग्याच्या तक्रारी, अचानक आलेले आजार, मानसिक अस्वाथ्य, इत्यादी अनेक समस्या व त्या अनुषंगाने जातकाचे अनेक प्रश्न निरुत्तरित असतात काहीच मार्ग न सापडत नसल्याने वास्तू ला दोष दिला जातो किंवा ज्योतिषी वास्तू दोष निवारण्याचा सल्ला देतो.

वास्तू दोष निवारण केल्याने भाग्य बदलते का? माझे स्वतःचे वयक्तिक ठाम मत आहे की वास्तू दोष निवारण केल्याने भाग्य बदलत नाही. वास्तू दोष निवारण झाल्यावर धनकी बरसात होत नाही. नोकरीत व व्यवसायात अचानक बदल होऊन, आर्थिक स्थिती सुधारत नाही. आरोग्याचे प्रश्न सुटत नाही, अडलेले विवाह होत नाहीत. आपत्य प्राप्ती होत नाही व वैवाहिक सौख्यात बदल होत नाहीत. कुटूंबातील कलह नष्ट होत नाहीत. वैवाहिक सौख्य हे नशिबातच असावे, त्याशिवाय ते प्राप्त होत नाही. थोडक्यात नशिबात सल्याशिवाय भाग्योदय होत नाही. वास्तू दोष निवारण केल्याने प्राप्त होणार्‍या बाबी मानसिक शांती, मनावरचे दडपण दूर होते. आता वास्तू दोष निवारण झाले आहे त्यामुळे सर्व कामे सुरळीत होतील, मार्गी लागतील या भावनेने व्यक्ती कामाला उत्साहाने लागते. एखादी भाग्यात असलेली किंवा नशिबाने होणारी भाग्यकारी घटना घडली तर तिचे श्रेय वास्तू दोष निवारणाला मिळते. थोडक्यात मानसशास्त्रीयदृष्टया विचार केला तर व्यक्तीच्या अंगी सकारात्मकता वाढीस लागते.

व्यक्ती प्रयत्नवादी होते. मनावरची चिंता दूर होते. सर्व कामे होणार ही भावना वाढीस लागते व या सकारात्मकतेतुन व्यक्ती प्रयत्नवादी होते. व्यक्ती सकारात्मक भावनेने जोमाने कामाला लागते. मनावरचा ताण निघून गेला तिचा उत्साह वाढतो. या व्यक्तीच्या अंगी काही दिवस प्रसन्नता राहते. याचा त्या व्यक्तीला तिच्या नोकरी व्यवसायात निश्चितच लाभ होतो. परंतु या उलट वास्तू दोष निवारण केल्यानंतर आहे ती परिस्थितीत राहिली, समस्या सुटल्या नाहीत तर दोष वास्तू तज्ञाला व स्वतःच्या नशिबाला दिला जातो.

वास्तू दोष निवारण्यासाठी लागणार्‍या वस्तूंची भारतात अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे. त्यात पिरॅमिड, तांब्याच्या वस्तू, जमिनीत किंवा घरच्या अंगणात किंवा फॉउंडेशनच्या जागी भूमीत गाडून टाकण्याच्या वस्तूंमधे निरनिराळी दोष निवारक यंत्रे, रत्न इत्यादी साहित्य निर्मितीचे कारखाने आहेत. तांब्याच्या पत्र्यावरील यंत्राची किंमत मोठी आहे. खरी रत्ने खूप महाग आहेत. परंतु ते कोणी सहसा वापरात नाहीत.

खोट्या रंगीत रत्नांची रेल चेल आहे. ती किलोच्या भावाने मिळतात. खरी रत्ने जमिनीत अर्पण करायची असतील तर त्याला खूप मोठा खर्च लागतो. त्यामुळे सर्रास खोटी रत्ने उपयोगाला आणली जातात. विविध रंगांची स्फटिके (दगड) आढ्यावर किंवा छतावर चिकटवायचे रंगी बेरंगी चमकदार खडे. चायनीज फेंगशुईच्या मान्यतेप्रमाणे मिळणार्‍या वस्तूंची रेलचेल बाजारात पहावयास मिळते. या सर्व उपायांच्या वस्तूंचे परिमाण घरात राहणार्‍या व्यक्तींच्या भाग्यात नक्की किती बदल होतो हे मोजण्याचे कुठलेही साधन नाही. त्यावर संशोधन नाही, त्यामुळे हा भावनिक बाजार खूप मोठा आहे व फोफावला आहे. हस्तसामुद्रिकशास्त्र भूत, वर्तमान व भविष्यातील भाग्यकारक व अभाग्यकारक घटना, कधी झाल्या, सध्याची परिस्थिती काय आहे व भविष्यातले भाग्यकारक घटना कधी होणार, याचे अचूक भाकीत, कालनिर्णय देते. दहापैकी पाच व्यक्तींना धनाची चिंता असते व धन किंवा आर्थिक परिस्थिती कधी सुधरेल, कर्ज कधी जाईल, मनासारखा पैसा कधी मिळेल या चिंतेने ते ग्रासलेले असतात. व्यक्तीच्या अनंत गरजा आहेत, व त्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक आवक समाधानकारक लागते. व्यक्तीला कितीही पैसा मिळोत, तो कायम कमीच वाटतो. कारण ती नेहेमी अधिक पैसे वाल्यांशी तुलना होते. धनलक्ष्मी नशिबातच असावी लागते. नशिबात असेल तरच ती प्रसन्न असते. अन्यतः कितीही, शांत्या, पाठपूजा, होम हवन, उपास-तापास व्रत, वैकल्ये, दिव्य लक्ष्मी ज्योत , एकाक्ष नारळ, कुबेर यंत्र इत्यादी अनेक उपाय केले तरी धनलक्ष्मी ज्या कालखंडात किंवा वय वर्षात धन देणार आहे तेव्हाच ती प्रसन्न होत असते. धनलक्ष्मी धन प्रदान करताना त्या व्यक्तीचा व्यवसाय कुठला, नीती, अनीतीचा,धार्मिक का अधार्मिक का अधर्माचा हे बघत नाही. धन लक्ष्मीचा निवास जोपर्यंत भाग्यात आहे तोपर्यंत व्यक्तीला प्रसन्न असते.

कुठलेही भवन, घर, सदनिका, बंगला किंवा कोणतेही निवासस्थान हे शंभर टक्के वास्तू शास्त्राप्रमाणे नसते. काही कदाचित अपवाद असतील परंतु दोष मुक्त वास्तू रचना असणे मुश्किल आहे. पूर्वीच्या काळी भवन निर्माण करताना वास्तू तज्ञाचा सल्ला घेतला जायचा. वास्तूशास्त्र पुरातनशास्त्र आहे. त्याकाळी वास्तू भक्कम असली पाहिजे त्यासाठी मातीचे परीक्षण होते. आता पाण्यात व वाळूवर इमारतीचे भक्कम बांधकाम होते. सूर्य प्रकाश, हवा, वायू विजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सांडपाण्याचे नियोजन, दिवसा घरात उजेड कायम राहाण्याची व्यवस्था, स्वयंपाक घर इत्यादी मूलभूत भवनाच्या गरजा विचारात घेऊन वास्तूशास्त्र जन्माला आले. आता सदनिका घेताना त्या काही दोषांसहित विकत घ्याव्या लागतात. मी वास्तूशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यात पुरातन वास्तूशास्त्रातील सांगितलेले पंच महाभूतांच्या कारकत्वाचे नियम कसोटीवर उतरतात. परंतु आजकाल उपाय केले जातात त्यासाठी जातकाकडून त्याच्या भावनेशी खेळून ज्या वस्तूंच्या उपायांचा आपल्या भारतीय वास्तू शास्त्रात कुठलाही उल्लेख नाही, अशा वस्तू दिल्या जातात किंवा घरात लावल्या जातात.

रत्ने खोटी वापरली जातात. जमिनीतील मानवी अस्ती शोधायचे यंत्र तर निव्वळ धूळफेकीचे यंत्र आहे. या यंत्राचा तर खूप वाईट अनुभव आहे. वास्तूशास्त्र व्यावसायिक झाले किंवा व्यावसाय म्हणून याकडे पाहत आहेत. कुंडलीशास्त्रात जशी पाप ग्रहांची भीती जातकाला दाखविली जाते, त्याचप्रामणे वास्तूतज्ञाने वास्तूत प्रवेश केला कि तो बेचैन होतो व अस्वस्थ होत असतो. जुळ्या मुलांची जन्मपत्रिका एकसारखी असते. त्यांच्या कुंडलीत फक्त कला-विकलांमधे फरक दिसून येतो. त्यांचे नशीब हे मात्र नेहमी भिन्न असते. हस्तसामुद्रिकदृष्टया विचार केला तर, हातावरील, रेषा, ग्रह, चिन्हे व बोटांची ठसे पूर्ण वेगळी असतात. त्यामुळे त्यांच्या अंगातील हुशारी, विद्वत्ता व एकंदरीतच त्यांच्या आयुष्यातील सुख दुःखे, वेदना हा एकसारख्या नसतात. माझा वर्ग मित्राला जुळी मुले झाली. त्यापैकी एक थोडा हुशारीच्या मंद, त्यांची पत्रिका विद्वान पंडितांना दाखविली. जन्मकुंडली सर्वोत्तम असल्याचे सांगितले. वास्तुदोष काढून घेण्याचा सल्ला दिला गेला. त्याप्रमाणे माझ्या मित्राने गावातील राहत्या घरातील वास्तुदोष निवारण्यासाठी वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने मोठा खर्च करून बदल करून घेतले. दोन वर्ष झाली तरी मुलाच्या हुशारीत फरक पडला नाही. माझ्या मित्राने आणखी प्रसिद्ध वास्तूतज्ञाला त्याची नूतनीकरण केली वास्तू दाखविली. त्याने तर वास्तूत राहूच नका म्हणून सल्ला दिला. मित्राने शहराबाहेर मोठा प्लॉट घेऊन त्यावर वास्तू तज्ञाच्या सल्ल्यानुसार बंगला बांधला.

वास्तूशांती केली.

दोन वर्ष कुंटुंबियांसहित तो त्याच्या नव्या वास्तूत वास्त्यव्याला होता. नवीन वास्तूत वास्तव्य करूनही त्याच्या मुलाच्या हुशारीत कुठलाही बदल झाला नाही. जुळ्या पैकी जोअत्यंत हुशार होता तो मुलगा वडिलांच्या व्यवसायात हुशारीने मदत करत होता. मंद मुलात हुशारी नसल्याने तो व्यापारात कच्चा राहिला. त्याच्याकडे व्यापार करतानाची चलाखी व हुशारी नव्हती. माझा मित्र बंगल्यात लांब रहायला गेल्याने त्याच्या गावातील आडत दुकानात जायला यायला उशीर होत होता. गावात रहात असताना त्याचे जुने घर त्याच्या पेढीजवळ होते. परंतु वास्तू तज्ञाच्या सल्ल्याने तो बंगल्यात वास्तव्यास गेला. त्यामुळे व्यवसायातील प्रत्यक्ष नियंत्रणात त्याला अडचणी यायला लागल्या. नुकसान होऊ लागले. मित्राने निर्णय घेतला कि वास्तू दोष घालवून माझ्या मुलात कुठलाही फरक झाला नाही.

वास्तूतज्ञाच्या सल्ल्याने सुमारे दोन कोटी घरावर व बंगल्यात खर्च केले. त्याचा त्याला मनःस्ताप होऊ लागला. शेवटी त्याने त्याचा नवीन बंगला विकला व त्याच्या गावातील जुन्या घरात परत वास्त्यव्यास आला. ज्योतिष व वास्तू शास्त्राबद्दल त्याला प्रचंड राग आहे. हे शास्त्रावर त्याचा ठाम अविेशास आहे. या त्याच्या मनस्तापाला जबाबदार कोण?

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com