दिवाळी पाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त

दिवाळी पाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त

आश्विन महिन्यातील अवसेला लक्ष्मी पूजन झाल्यावर पाडवा साजरा करतात. पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो. या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात.

या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणार्‍या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले.

या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. शेतकरी लोक सकाळीच शेतात जाऊन मडक्यात कणकेचा पेटलेला दिवा नेऊन शेताच्या बांधावर जाऊन मडके पुरून देतात आणि बळी राजाची पूजा करतात.

या दिवशी सकाळी माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची पद्धत आहे. या दिवशी घरोघरी वडीलधार्‍यांना आणि नवर्‍याला पाटावर बसवून त्यांच्या भोवती रांगोळी काढून औक्षण करतात. आपल्या वैवाहिक संसार उज्ज्वलं व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहो या साठी पत्नी पतीचे औक्षण करते. नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो.

या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी नव विवाहित जोडप्यांकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळसण करतात आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर देण्यात येतो.

बर्‍याच ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. विशेष करून उत्तर भारतात याचे महत्त्व आहे या दिवशी विष्णूची पूजा केली जाते त्यांना पंच पक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो. या सणाला अन्नकुट असेही म्हणतात.

व्यापारी वर्ग या दिवशी आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या काढल्या जातात. नवीन वह्यांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करतात. यादिवशी विक्रमी संवत सुरू होतं. या दिवसाला द्यूत प्रतिपदा देखील म्हणतात त्या मागील कारण असे की एका पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला द्यूत खेळात हरवले होते. इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी विनवणी बळीराजाकडे केली जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com