दिवाळी - दीपोत्सवाचा सण

 दिवाळी - दीपोत्सवाचा सण

दिवाळी हिंदू धर्मातील मोठा आवडीचा सण आहे. तसे तर हिंदू धर्मात बरेच सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दसर्‍याच्या 20 दिवसांनंतर दिवाळी येते. दसर्‍यानंतरच दिवाळीसाठीची घराघरांत जय्यत तयारी सुरू असते. घराची डागडुजी, स्वच्छता करणे, रंग करणे, नवे कपडे घेणे, घराघरांत नाना प्रकाराचे गोडधोड केले जातात. घराघरांत रांगोळ्या काढतात. आकाश कंदील लावतात.

दिवाळीचा सण हा 6 दिवसांचा सण आहे. हा सण वसुबारस पासून सुरू होऊन भाऊबीज पर्यंंत साजरा केला जातो. या सणामध्ये वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-पूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात. दिवाळीचा सण प्रामुख्याने उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते. त्यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचा वध केला. त्याच्या प्रीत्यर्थ हा विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. त्यावेळी लोकांनी आपल्या घरात दिवे लावून हा विजयोत्सव साजरा केला होता. त्यामुळे या दिवशी घराघरांत दिवे लावतात. या शिवाय दिवाळीबद्दल आणखी काही पौराणिक कथा आणि माहिती देखील आहे. चला जाणून घेऊयात...

प्रत्येक समाज किंवा धर्म आपल्या सणाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतात. हिंदूंचे मुख्य सण होळी, राखी, दसरा आणि दिवाळी आहे. दिवाळी सर्वात मोठा सण आहे. हा सण आश्विन अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशीची अमावस्या असंख्य दिव्यांची असते. सर्व दिशांना दिवे लखलखत असतात. अमावस्येच्या काळोखाची रात्र असंख्य दिव्यांनी झगमगते. सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते. लोक देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी घराला स्वच्छ करतात. दिवाळीच्या 6 दिवसांच्या सणांबद्दल माहिती

1 वसु बारस - दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस वसु -बारसेचा असतो. या दिवशी गाय आणि त्याचा वासराची पूजा केली जाते. बायका उपवास धरतात आणि संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करूनच उपवास सोडतात. गवारीची भाजी, बाजरीची भाकरी आणि गूळ असा नैवेद्य असतो. आपल्या मुलां-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि घरात सौख्य नांदावे यासाठी ही पूजा करतात. तसेच घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने देखील गाय वासराची पूजा करतात. घरात या दिवसापासून दिवे लावण्यास सुरुवात होते. दररोज सडा-रांगोळी करतात.

2 धनतेरस - दुसरा दिवस असतो धन तेरस किंवा धनत्रयोदशीच्या. कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस साजरा करतात. या दिवशी खरेदी करणं शुभ मानतात. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवसायाची नवी पुस्तके बनवतात आणि त्याची पूजा करतात. या दिवशी सोनं, चांदी, नवे कपडे, भांडे, धने, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, खेळणी, साळीच्या लाह्या-बत्ताशे इत्यादी विकत घेतात. या दिवशी लक्ष्मी, गणेश, कुबेर, धन्वंतरी आणि यमराजाची पूजा केली जाते. कोरडे धने आणि गुळाचा नैवेद्य असतो. यादिवशी यमाला दीपदान करतात.

3 नरक चतुर्दशी - आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी करतात. यादिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी सुवासिक तेल लावून उटण्याने स्नान करतात. या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करतात आणि घरातील पुरुष मंडळींना स्नान करताना दिवे ओवाळतात. यादिवशी श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याचा प्रीत्यर्थ नरकचतुर्दशी साजरी करतात. ेअसे म्हणतात की या दिवशी जो कोणी सूर्योदयाच्या पूर्वी उठून अभ्यंग स्नान घेत नाही त्याला नरकाच्या त्रास भोगावा लागतो. या दिवशी सकाळी दिवे लावतात जेणे करून वाईट आसुरी शक्तींचा नायनाट होवो. संध्याकाळी दुकानात घरात, कार्यालयात दिवे लावतात.

4 दिवाळी (लक्ष्मी-पूजन)- आश्विन अमावास्येला संध्याकाळी ही पूजा केली जाते. यादिवशी लक्ष्मी देवी भूतलावर संचार करते. स्वच्छ, योग्य असे स्थळ ती आपल्या वास्तव्यास शोधते. या दिवशी रात्री श्री गणेश, लक्ष्मी देवी आणि देवी सरस्वतीची पूजा करतात. अष्टदल कमळ किंवा स्वस्तिकावर लक्ष्मी स्थापित करून पूजा करतात. पंचामृत, साळीच्या लाह्या-बत्ताशे, धणे-गूळ, अनारसे, फळे यांचा नैवेद्य दाखवून सुवासिनी बायकांना हळदी-कुंकू देतात. यादिवशी नाणी, सोनं, चांदीची पूजा देखील करतात. रात्री फटाके उडवतात. व्यावसायिक किंवा व्यापारी वर्ग आपल्या दुकानाची पूजा करतात. घर लख्खं-लख्खं दिव्यांनी उजळून निघतं.

5 पाडवा- दिवाळीचा पुढचा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बली प्रतिपदा किंवा पाडवा असेही म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. यादिवशी व्यापारी वर्ग नवं वर्षाची सुरुवात करतात. बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्यांची पूजा करतात. नवीन कामाला सुरुवात करतात. याच दिवशी राजा बळीचे गर्वहरण श्री विष्णूनी वामनरूप धरुनी केले होते. या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या वडीलधारी करता पुरुषाला औक्षण करतात. स्त्रीे आपल्या नवर्‍याला वडिलांना, सासर्‍यांना औक्षण करते. नवरा, वडील, सासरे तिला काही भेट वस्तू देतात. तसेच मुली देखील आपल्या वडिलांचे औक्षण करतात.

6 भाऊबीज - दिवाळीची सांगता भाऊबीजेच्या सणानंतर होते. हा सण खास भाऊ -बहिणीचा आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला ज्याला यम द्वितीया असेही म्हणतात हा सण साजरा करतात. बहिणी यादिवशी भावाला बोलवून किंवा त्याचाकडे जाऊन गोडधोडाचे जेवण करतात. संध्याकाळी चंद्राची कोर बघून बहीण आधी चंद्राला नंतर भावाला ओवाळते. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. यामागील शास्त्र असे की भाऊ चिरंजीव व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी. भाऊ आपल्या बहिणीला यथाशक्ती भेटवस्तू देतो. ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या चंद्राला ओवाळतात. अशाप्रकारे हा दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com