सुख सोयींच्या पल्याड गुढत्वाचा शोध

सद्गुरुंचा संदेश
सुख सोयींच्या पल्याड गुढत्वाचा शोध

तर्काचे मुलभूत स्वरूपच असे आहे तो नेहेमी समान, समरूप गोष्टींशी बांधिलकी आणि संबंध जोडू पाहतो. विश्वातील गूढ परिमाणे उलगडण्यासाठी हा एक अडथळा आहे. सृष्टीच्या केवळ अगदी पृष्ठभागावर समरुपता आहे असे भासते. पण सृष्टीचे स्वरूप समानता, सारखेपणा किंवा परिचित पैलूंमध्ये आढळणार नाही.

सृष्टीतील कोणत्याही जर तुम्ही गोष्टींकडे सखोल, लक्ष देऊन पाहिले तर - तुमच्या बोटांच्या ठश्यांपासून तुमचा डोळा आणि तुमच्या केसांपर्यंत - सर्व काही अद्वितीय आहे. जर तुम्ही विश्वातुन प्रवास केला तर तुम्हाला एकही अशी गोष्ट सापडणार नाही जी अगदी तंतोतंत इतर दुसर्‍या सारखी आहे. दोन अणूही एक सारखे नाहीत. प्रत्येक अणूची रचना खास, अद्वितीय आहे.

परिचित गोष्टी तुमच्या मनाचा तार्किक पैलू बळकट करतात. तुमचा तर्क जितका मजबूत असेल तितके तुम्ही जीवनाच्या पृष्ठभागावर रहाल. लोक परिचित गोष्टींमध्ये अडकतात. दररोज त्यांना त्याच मार्गावरून चालायचे आहे.

जेंव्हा परिचिताचा शोध घेता तेंव्हा तुम्ही लंब वर्तुळाकार चक्रात फिरत राहता. प्रत्येक भौतिक गोष्ट चक्राकार स्थितीत आहे. जर तुम्ही या चक्रांमध्ये राहिलात, तर भौतिक गोष्टी तुम्हाला कधीच मुक्त होऊ देणार नाहीत. त्यांचे आपले स्वतःचे असे सामर्थ्य आहे.

सृष्टीच्या गूढ स्वरुपाच्या खोलीचा ठाव घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की ते परिचित गोष्टींचा शोध घ्यायचं सोडून देईल आणि जाणीवपूर्वक तुमच्या सोई- सुविधाजनक गोष्टींतून बाहेर येईल. हाच आहे संसार ते संन्यासा पर्यंतचा प्रवास.

संन्यास म्हणजे संन्यासी बनणे नव्हे - याचा अर्थ आहे भौतिकतेच्या चक्रांतून बाहेर पडणे. संसार म्हणजे कुटुंब नव्हे - संसार म्हणजे पुनरावृत्तीचे चक्र. जेव्हा तुम्ही परिचित गोष्टी शोधता तेव्हा तुम्ही नेहमी योगायोगशोधत असता.

दुर्दैवाने, भौतिक विज्ञानातही, आज लोक संबंध जोडण्यासाठी योगायोग शोधत आहेत. गोष्टींकडे पाहण्याचा हा एक मार्ग आहे, परंतु तो वरकरणी असेल. ते अस्तित्वाचे गूढ, सखोल परिमाण शोधू शकणार नाही. तुम्ही सभोवतालचं सर्व पहाल परंतु सृष्टीच्या स्रोताला मुकाल.

जागरूकतेने शोधण्यासाठी आणि अपरिचित प्रदेशात वाटचाल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उर्जेची संरचना मजबूत करणे आवश्यक आहे, तुम्हाला तुमचे शरीर आणि भावना स्थिर करणे आवश्यक आहे आणि अशा मनाची गरज आहे जे विविध प्रकारच्या भावना हाताळण्यास सक्षम असेल.

असे स्थैर्य नसेल तर जीवनातील अपरिचित पैलू शोधण्याची कोणाचीच हिम्मत होणार नाही. तुम्ही अपरिचित आयामांचा शोध घेत नाही आहात तर तुमच्या आयुष्यात सोयी-सुविधा असतील, पण वैतागाने एक दिवस तुम्ही मरून जाल.

जर तुम्ही उत्साहाने मेलात तर ते ठीक आहे. पण अशा भव्य, अदभूत सृष्टीत, जर तुम्ही वैतागाने मेलात तर, हा एक घोर अपराध आहे.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com