दसरा

दसरा

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वण्ये एकत्र आलेले दिसतात. यादिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

दसरा हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्यावेळी विराटच्या घरी गेले, त्यावेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवेास संपल्यावर त्यांनी तेथील शास्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्लयावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसर्‍या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.

फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसर्‍याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

दसरा सणामधून मिळणारी शिकवण -

1) स्वतः समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण दसरा - विजायदशमी हा देवीचा सण आहे आणि देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करुन रामनवमीप्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वती स्वरूपी भगवतीचे पूजन नवमीच्या दिवशी शस्त्र देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. गावाबाहेरही शांतता राखुन जिकडे तिकडे सुख समृद्धी यावी असा यामागचा उद्देश आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्राचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटायचे असते.

2) तमोगुण आणी वाईट शक्ती यांचा नाश होणे आणि परस्परांप्रती प्रीती जागृत होणे - देवी तत्त्व कार्यरत असल्यास सगुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते अन केवळ विष्णु तत्त्व कार्यरत असल्यास निर्गुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नासाचे कार्य होत असते असे शास्त्र आहे. दसर्‍याच्या दिवशी ताराक देवितत्त्व विष्णु तत्त्वाच्या समवेत एकत्रपणे कार्यरत होते. या दोन भिन्न तत्त्वाने संयुक्तपणे कार्य केल्यामुळे तमागुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य संपन्न होण्याबरोबर या दोन तत्त्वांमधील परस्परांविषयीची प्रीती जागृत होऊन त्यांच्यातील तत्त्वांकडून विनाशाचे कार्य करण्याबरोबरच सज्जनतेचे म्हणजे स्थिती संबंधीचे कार्य ही आपोआप होऊ लागते.

देवी आणि विष्णू यांच्या संयुक्त कार्यरत तत्त्वांकडून प्रक्षेपित होणार्‍या प्रीतीयुक्त कल्याणकारी स्थितीजन्य लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरतात. त्यामुळे सर्जकतेच्या कार्यास गती प्राप्त होते आणि त्यामुळे पीक चांगले होणे भरभराट होणे यासारखे परिणाम दिसून येतात. स्थितीजन्य कार्य करण्यासाठी श्रीविष्णूची सहयोगी म्हणून श्रीलक्ष्मी त्यांच्या बरोबर प्रत्येक अवतारामध्ये श्रीलक्ष्मीही सहभागी असते आणी दोघेही मानवदेह धारण करुन पृथ्वीतलावर एकाच वेळी अवतार घेतात.

3) श्री राम आणि हनुमान तत्त्वे अन्न छात्रवृत्ती जागृत करणारा दसरा सण - दसर्‍याच्या दिवशी ब्राह्मंडात श्रीराम तत्त्वाच्या तारक, तर हनुमान तत्त्वाच्या मारक लहरीचे एकत्रिकरण झालेले असते. दसरा या तिथिला जिवाचा छात्र भाव जागृत होतो. आणि छात्रभावातूनच जिवावर छात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. दस़र्‍याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जीवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्वे मिळण्यास साह्य होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल आणि तांबूस रंगांच्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास साह्य होऊन जीवांच्या मारक भावाबरोबरच नेतृत्व गुणांमध्येही वाढ होते.

Related Stories

No stories found.