स्वतःबद्दलच्या शंका आणि वाढत्या वयातील भीतीचा सामना

jalgaon-digital
3 Min Read

प्रश्न – मोठे होत असताना माझ्या स्वत:च्या आणि माझ्या क्षमतांच्या बाबतीत माझ्या मनात बरेच प्रश्न होते. स्वतःबद्दलच्या शंका निश्चितपणे एक मुद्दा आहे ज्याचा मला आणि बर्‍याच मुलांना सामना करावा लागतो आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे. विशेषत: एक तरुण म्हणून स्वतःबद्दलच्या शंका कशा हाताळाव्यात?

सद्गुरु – स्वतःवर शंका घेणे चांगले आहे. मला माहित आहे प्रत्येकजण म्हणतो, स्वतःवर विश्वास ठेवा! मी म्हणेन, कृपया स्वतःवर शंका घ्या. जर काही बरोबर किंवा चुकीचं घडत असेल तर नेहमी प्रथम पहा, कदाचित तुम्हीच हे घडवून आणलेलं असेल. जर तसं नसेल तर मग इतरांकडे पहा. तथाकथित आत्मविश्वासी मूर्ख माणसं कशाची पर्वा न करता सर्वकाही पायदळी तुडवत चालत आहेत. शंका तुमच्यात शहाणपण आणेल. तुम्ही या धरतीवर संवेदनशील होऊन हळूवारपणे चालाल.

वाढीच्या वेदना!

आणि जेव्हा आपण मोठं होणे म्हणतो तेव्हा एका मनुष्यात अनेक पैलू असतात – शारीरिक, मानसिक, भावनिक आणि वाढीचे इतर पैलू असतात. बर्‍याच वेळा, आपण शारीरिक विकासाचे मोजमाप करतो आणि त्यापुढील शक्यता मानसिकदृष्ट्या असते. जेव्हा आयुष्यातील परिस्थिती आपल्यासमोर आव्हानं उभी करतात तेव्हाच आपल्याला आपले इतर आयाम गवसतात. आपली भावनात्मक आणि उर्जेच्यापातळीवरील वाढ, तसेच आपल्या अस्तित्वाची वाढ ही आपल्यापैकी बहुतेकांना तेव्हाच दिसून येते जेव्हा आयुष्य आपल्याला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत टाकतं.बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्याच्या परिस्थितींवरच्या त्यांच्या प्रतिक्रियांचे आश्चर्य वाटेल.

शारीरिक आणि मानसिक वाढीसंदर्भात, शरीर एक अतिशय मूर्त घटक आहे, म्हणून ते एका विशिष्ट वेगाने वाढते. पण तुमच्या अस्तित्वाचा मानसिक आयाम हि काही मूर्त प्रक्रिया नाही. ती अधिक लवचिक, प्रवाही आणि धूसर आहे. म्हणून तुमच्या शारीरिक प्रक्रियेच्या आधी मानसिक आयाम विकसित होण्यास सक्षम असला पाहिजे. जर लोकांना मोठ होताना त्रास होत असेल तर त्याचे मुख्य कारण असे की त्यांची मानसिक वाढ त्यांच्या शारीरिक वाढीच्या किमान एक पाऊल पुढे नाही.

जरी या गोष्टी पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांबरोबर याच गोष्टी कायमच घडत आल्या असल्या, तरीही असे दिसते की ते विश्वात पहिल्यांदाच घडत आहे. लोक आश्चर्यचकित आणि भयचकित आहेत. याचे कारण त्यांची मानसिक वाढ त्यांच्या शारीरिक वाढीच्या मागे आहे. समाजात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की आपण अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की प्रत्येक मूल मानसिकदृष्ट्या; शारीरिक वाढीपेक्षा कमीतकमी एक पाऊल पुढे असेल.

जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ही एक गोष्ट केली तर तुम्ही पहाल की पौगंडावस्था असो किंवा मध्यम वय किंवा म्हातारपण, कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला आश्चर्य किंवा भय वाटणार नाही – कारण तुम्ही त्याला कसे सामोरे जावे आणि ते कसे हाताळावे हे तुम्हाला माहित आहे. साध्या जीवन प्रक्रियांमुळे तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धक्के आणि उलथापालथ असणार नाही.

आज, लोकं अशा प्रकारे जगत आहेत की – लहान बालकांमध्ये डायपरची समस्या आहे, किशोरांना हार्मोन्सच्या समस्या आहेत, मध्यमवयीन लोकांना मिड-लाईफ-क्रायसिस सतावत आहेत आणि वृद्धवयात लोक नक्कीच पीडित आहेत. मला आयुष्याचा असा एक पैलू सांगा जो लोकं एक समस्या म्हणून पहात नाहीयेत! जीवन एक समस्या नाही. जीवन ही एक विशिष्ट प्रक्रिया आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही या प्रक्रियेसाठी स्वत: ला तयार केलं आहे की नाही?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *