Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधश्री गणेश चतुर्थी

श्री गणेश चतुर्थी

महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे.

कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण .शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात. त्यापैकी एक घरी आणली जाते. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात. गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात. नंतर गणपती आणणार्‍या व्यक्तिच्या पायावर गरम पाणी घालतात.

- Advertisement -

गणपतीला व गणपती आणणार्‍या व्यक्तिला कुंकू लावतात, पाच सवाष्णीं गणपतीला औक्षण करतात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात. गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करतात. यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवितात. रोज सकाळी व सायंकाळी पूजा-आरती करून, खिरापत आरतीचे वेळी वाटतात. गणपतीच्या पूजेकरिता नारळ, एकवीस मण्यांचे वस्त्र, फुले-पत्री, शमी, दुर्वा, जानवे, गूळ-खोब-याचा नैवेद्य, केवडयाचे कणीस इ. साहित्य लागते. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते.

गणेश पूजेत वापरत असलेल्या वस्तूंचे महत्त्व – गणेश पूजनात दुर्वा विशेष महत्त्वाच्या आहेत. दू + अवा दू म्हणजे दूर असलेले व अवा म्हणजे जवळ आणते ते दूर असलेले गणेश पवित्रकांना जवळ आणतात.

दुर्वा कोवळ्या असाव्यात. दुर्वाना 3, 5, 7 अशा विषम संख्यांच्या पात्या असाव्यात. चेहरा सोडून सर्व गणपती दुर्वानी मढवावे. दुर्वाचा वास महत्त्वाचा आहे म्हणून दुर्वा दिवसातून दोन ते तीन वेळा बदलाव्या.

शमी पत्री शमीमध्ये अग्नीचा वास आहे. पांडवांनी आपली शस्त्रे तेजस्वी राहावी म्हणून शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली. शमीत अनेक देवतांचा वास असल्याचे मानले गेले आहे. शमी अर्पित केल्याने वास्तू दोष देखील दूर होतात.

मंदाराची पत्री मंदराची फळे पांढरी असतात औषधात पारा जसे रसायन तसे मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

लाल वस्तू – गणपती वर्ण लाल. म्हणून लाल फुलं, तांबडे वस्त्र, रक्तचंदन वापरतात. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करावे.

मोदक – 21 दुर्वाप्रमाणे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोदक म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो. हातात मोदक म्हणजे आनंद प्राप्त करण्याची शक्ती. म्हणून याला ज्ञानमोदक देखील म्हणतात.

गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातांत गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करातात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहीरीवर, तळयावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनाकरीता नेतात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिसर्‍या वेळी पाण्यात सोडतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या