त्रैमासिक भविष्य - तूळ Quarterly Futures - Libra

भाग्योदय होईल
त्रैमासिक भविष्य - तूळ Quarterly Futures - Libra

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, चतुर्थात गुरू-शनि-प्लुटो, पंचमात नेपच्यून, षष्ठात रवि-बुध-शुक्र, सप्तमात-हर्षल अष्टमात मंगळ- राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे रा,री,रु,रे,ता,ती,तू अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी- शुक्र, तत्त्व-वायु, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांची वागणूक थाटाची असेल. रजोगुणी, स्वभाव क्रूर. त्रिदोष प्रकृती. शुभ रत्न हिरा, शुभ रंग पांढरा, शुभ दिवस शुक्रवार, देवता- लक्ष्मी, संतोषी माता. शुभ अंक- 6, शुभ तारखा- 6,15,24. मित्र राशी -मिथून, मकर, कुंभ, धनु. शत्रु राशी- सिंंह, संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक व प्रभावी. नकारात्मक गुणईर्षा. घमेंड, मानसिक संतुलन चांगले. विनोदीवृत्ती.

सप्तमात हर्षल आहे. विवाहोत्सुकांना चमत्कारीक अनुभव येतील. विवाह उशीरा होण्याची शक्यता. विवाहसंबंध अगदी ठरला असे वाटावे व ऐनवेळी विवाह दुसर्‍या स्थळी व्हावा असाही काहीं विवाहोत्सुकांना अनुभव येईल. विरोधकांवर नैतिक विजय मिळेल.

स्त्रियांसाठी - षष्ठातील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. घरात आनंदी वातावरण असेल. सहनशीलतेत वाढ होईल.

विद्यार्थ्यांसाठी -माता, पिता, गुरूंच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. विद्येची आवड असणार्‍या मित्रांची सोबत करा. अभ्यासात उत्तम प्रगती होईल.

शुभ तारखा - 4, 5, 7, 8, 13, 17, 18, 19, 21, 22, 24, 25

मे - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, चतुर्थात शनी-प्लुटो, पंचमात गुरू-नेपच्यून,सप्तमात हर्षल- रवि, अष्टमात राहू-शुक्र- बुध, नवमात मंगळ, अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याचे योग. काही अडचणी येण्याची शक्यता आहे. सन्माननीय व्यक्तींशी वादविवाद करतांना त्यांचा अपमान होऊ नये यावर लक्ष ठेवा. सभेत किंवा स्पर्धेत विजय मिळेल. राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होईल.

अष्टमात शुक्र आहे. धनप्राप्तीची शक्यता आहे. कमी भमात अधिक धनप्राप्तीसाठी अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारखा भयंकर होतो.

स्त्रियांसाठी- शुक्र अष्टमात आहे. अभिमानाची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी असे होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमात नेपच्यून आहे. विद्यार्थीदशा हा खर तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. तुम्ही नवीन शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर असाल तर नेपच्यून योग्य शाखेत प्रवेश करून देईल.

शुभ तारखा - 1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 21

जून - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, चतुर्थात शनी-प्लुटो, पंचमात नेपच्यून- गुरू, सप्तमात हर्षल, अष्टमात बुध-शुक्र-राहु, नवमात शुक्र दशमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे.तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकूल प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराच्या आवडीमुळे व्यवसायासंबंधीत आलेले पाहुणे खुष होऊन समाजातील छबी उजळेल.

पंचमात गुरु आहे. पंचमस्थानातील गुरु हा स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीेक सगळीकडे पसरेल. सत्पुत्र सुख प्राप्त होईल. वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास उत्तम लेखन कराल. लोक शिक्षणाचा भाग होण्याची संधी मिळेल. मोठ मोठ्या समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.

धनस्थानी केतू आहे. कर्ज घ्यायचे झाल्यास हप्ते वेळेवर भरा. इस्टेटीसंबंधी काही भानगडी होण्याची शक्यता आहे. व्यक्तीमत्वात वृद्धी होईल.

स्त्रियांसाठी - भाग्यात शुक्र आहे. व्यक्तीमत्वात सौंदर्याच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्रसुख उत्तम लाभेल. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी - पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याई व आर्शिवादाने अभ्यासात मन एकाग्र होईल.

शुभ तारखा - 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com