प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

निर्मला सीतारमण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1959 साली झाला. त्या अर्थमंत्री व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. 2014 पासून त्या राज्यसभा सदस्या आहेत. सीतारमण यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्या भारताच्या दुसर्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसर्या महिला अर्थमंत्री होत. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे.

निर्मला सीतारमण यांचा जन्म तामिळनाडूच्या मदुराई येथील एका तमिळ कुटुंबात झाला. सावित्री आणि नारायणन सीतारमण यांच्या त्या कन्या. शालेय शिक्षण मद्रास व तिरुचिराप्पल्ली येथून झाले.

1980 मध्ये तिरुचिरापल्ली सीथलक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स पदवी आणि एम.फिल. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून 1984 मध्ये प्राप्त केली.

निर्मला सीतारमण यांनी लंडनच्या रिजंट स्ट्रीटमधील होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्सपर्सन म्हणून काम केले. त्यावेळी त्या अर्थशास्त्र विषय घेऊन पी. एच.डी. परीक्षेचा अभ्यास करीत होत्या. त्यांनी इंग्लंडमधील कृषी अभियंता संघटनेत अर्थशास्त्र सहाय्यक म्हणून काम पाहिले. इंग्लंडमध्ये वास्तव्याच्या वेळी, त्यांनी पीडब्ल्यूसीसाठी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. बीबीसी वर्ल्ड या टी.व्ही.वाहिनीवरही काम केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

राजकीय कारकीर्द

2006 मध्ये सीतारमण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2010 मध्ये त्यांची पक्ष प्रवक्त्या म्हणून नेमणूक झाली. 2014 मध्ये त्यांना नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले.

जून 2014 मध्ये त्या आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर पोहचल्या. पुढे 2016 मध्ये त्यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर निवड झाली. फोर्ब्स या अांतरराष्ट्रीय प्रतिष्ठित मासिकाच्या 2020 या वर्षाच्या जगातील 100 सामर्थ्यवान महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला. यादीत त्यांचा 41 वा क्रमांक होता.

भाग्यवंत असल्याशिवाय महान होता येत नाही हेही तितकेच खरे आहे. निर्मला सीतारामन ह्या असामान्य महिला नेत्या आहेत. असामान्य बुद्धिमत्ता व बुद्धिमत्तेच्या जोडीला अथक प्रयत्न, निरंतर ध्यास या सर्व मानवाच्या प्रयत्नवादा बरोबरच, ग्रह रेषांची साथ असेल तर काय घडते याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल.

फोर्ब्स या जागतिक प्रतिष्ठित मासिकाच्या आंतरराष्ट्रीय पॉवरफुल महिलांच्या यादीत स्थान मिळवले, हा त्यांच्या यशाचा, मानाचा व त्यांनी भूषविलेल्या पदांचा परिमाण होय.

हस्तसामुद्रिक शास्रातील काही प्रमुख बाबींपैकी हातावरील ग्रह स्थिती व त्या त्या ग्रहावरून उगम पावलेल्या हातावरील रेषा यांना खूप महत्व आहे. ग्रह व हातावरील रेषा व चिन्हे हे एकत्रित काम करीत असतात. या बरोबरच हात, हाताचा आकार व बोटे बोटांचा आकार यामध्ये प्रमुख असलेला अंगठा यांचे एकत्रित परीक्षण करावे लागते. त्यानुसारच त्या व्यक्तीच्या भाग्याची कल्पना येते. हस्तसामुद्रिकशास्रातील हातावरील आयुष्य रेषा ही सर्वात मह्त्वाची रेषा आहे. या आयुष्य रेषेवरून शारीरिक स्थिती किती सुदृढ आहे, एकंदरीत आरोग्य कसे आहे व कसे राहील याचे प्रतिनिधित्व ही आयुष्य रेषा करते. आयुष्य रेषेवरून त्या व्यक्तीचा शारीरिक प्रकृतीचा आयुष्यभरातील कालखंड कसा राहील हे सांगता येते. व्यक्ती जेंव्हा निरोगी असते तेंव्हा ती झपाटून काम करू शकते. ज्यावेळेस मनुष्याच्या हाताने काम होते किंवा तो त्या त्या क्षेत्रात अविरत काम करीत राहिला की, त्याच्यामागे यश आपोआपच येते. किती यश मिळणार हे भाग्य ठरविते. यामध्ये रवी ग्रह व रवी रेषा हातावर किती उत्कृष्ट आहे, यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील यश अपयश यांचा आलेख अवलंबून असतो. हातावरील आयुष्य रेषा ही शारीरिक प्रकृतीची दिशादर्शक आहे तसेच ही रेषा हातावरील प्रमुख रेषेंचें उगम स्थान असेल तर ‘सोनेपे सुहागा’ म्हणूनच असतो.

-आयुष्य रेषेतून बोटांकडे जाणार्या छोट्या छोट्या बारीक रेषा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रगतीचा कालखंड दाखवितो.

-आयुष्य रेषेतून भाग्य रेषा उगम पावत असेल व ती शनी ग्रहाच्या मध्यावर गेलीली असेल तर असे लोक भाग्यवंत असतात. त्यांना आयुष्यात आर्थिक चणचण भासत नाही सर्व कामे सहजसहजी होतात. भाग्य नेहमी साथ देत असते.

-आयुष्य रेषा गुरु ग्रहावरून उगम पावली तर असे लोक असामान्य असतात त्यांचे हातून जनतेची सेवा होते. ते खूप मोठे यश मिळवितात. आयुष्य रेषेतून नुसता एक फाटा गुरु ग्रहावर गेला तरी ती व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी यशस्वी होते.

- आयुष्य रेषेतून उगम पाऊन ज्या रेषा बोटांकडे अखंड गेलेल्या असतात व त्या बोटाच्या खाली असलेल्या गुरु,शनी, रवी व बुध ग्रहाच्या जितक्या मध्यभागी जाऊन थांबतील तितक्या त्या शुभ व भाग्यकारक असतात.

- या आयुष्य रेषेतून उगम पावलेल्या व बोटा खालील ग्रहावर गेल्यावर त्या त्या ग्रहांचे अति शुभ कारकत्व त्यांना लाभते. त्या त्या ग्रहांच्या मिळणार्या शुभदायी कारकत्वाचा लाभ त्यांना त्यांच्या नशिबानेच मिळालेला असतो.

-बुध ग्रह हुशारी देतो व व्यापार-नोकरीत यशस्वी करतो. उत्तम संभाषण कला लाभते. रवी ग्रह मान सन्मान कीर्ती देतो. कलेची देणगी देतो सरस्वती प्रसन्न असते, शनी ग्रह आर्थिक लाभ देतो, गुरु ग्रह,अध्यात्म, नेतृत्व व न्यायी पणा, वैचारिक पातळी श्रेष्ठ ठेवतो तो मानवी मूल्यांची जपणूक करतो, धार्मिक असतो. या बोटां खालील ग्रहांचे अतिशय शुभ लाभ त्या व्यक्तीला प्रदान होतात जर आयुष्य रेषेतून एक रेषा एखाद्या बोटां खालील ग्रहांवर थेट निर्दोष गेलेली असेल तर ती व्यक्ती भाग्य शाली असते.

उजव्या हातावरील शुभ कारक रेषा व ग्रह

आयुष्य रेषेचा उगम गुरु ग्रहावरून झाला आहे आणि ती सुदृढ व अखंड आहे, अशी परिस्थिती असता निरोगी जीवन व गुरु ग्रहाचे सर्व शुभ लाभ त्या व्यक्तीला मिळतात व या व्यक्ती उच्चपदी पोहोचतात. आपला कर्तृत्वाचा ठसा जनमानसावर उमटवितात. आयुष्य रेषेतूनच मस्तक रेषेचा उगम, मस्तक रेषा सरळ तिरकी चंद्र ग्रहावर खाली हाताच्या मध्यभागापर्यन्त उतरलेली, मस्तक रेषेला अजून एक फाटा त्याचा उगम हाताच्या मध्यभागी भाग्य रेषे जवळून वरच्या मंगळ ग्रहाकडे गेलेला, मस्तक रेषा चंद्राकडे गेलेली तिरकी रेषा जी आयुष्य रेषेच्या बरोबरीने खाली हातावर उतरत आहे ती असामान्य बुद्धिमत्ता प्रदान करते. चंद्र ग्रहाच्या सानिध्यात कल्पना शक्ती, नियोजन व वेळोवेळी एक अलौकिक आत्मिक साक्षात्काराची साक्षात अनुभूती यांना मिळत राहते व तशी देणगी लाभलेली असते. मस्तक रेषेचा दुसरा फाटा जो वरच्या मंगळ ग्रहावर गेला आहे, तो निर्मला यांना नियोजनपूर्वक राजकीय समीकरणे यशस्वी करण्यात मदत करतो आहे. राजकारणाच्या पटलावर यांच्या चाली यशस्वी होतात. हृदय रेषा थेट अतिशय सुंदर वळण घेऊन गुरु ग्रहावर गेली आहे. ही हृदयरेषा प्रेम, वात्सल्य, करुणा, शुद्ध निष्पाप विचार प्रदान करते. हातावरील भाग्य रेषेचे तीन तुकडे आहेत. मस्तकरेषेपासून म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षापासून भाग्यरेषा शनी ग्रहाकडे सरळ झाली आहे. वयाच्या 50व्य वर्ष्यानंतर भाग्य रेषेत शुभकारक बदल होऊन शनी ग्रहाकडे माधोमध जाऊन थांबली आहे. ही रेषा आर्थिक उत्पन्न कायमस्वरूपी वाढविणारी आहे. निर्मला सीतारामण यांच्या हातावरील सर्वात भाग्यकारक रेषा म्हणजे रवीरेषा होय. या रवी रेषेचा उगम आयुष्य रेषेच्या मनगटाच्या जवळून होत असून हि रवी रेषा थेट रवी ग्रहावर गेली आहे. तिचा एक फाटा रवी-बुध बोटांच्या पेर्यात गेला आहे. हातावरील रवी रेषेची अशी स्थिती असल्याने थोड्याश्या प्रयत्नाने उत्तुंग यश, सन्मान, कीर्ती लाभलेली आहे. निर्मला सीताराम यांच्या हातावरील रवी रेषेचे स्थान हे करोडो लोकांत एखाद्या हातावर असेल त्याप्रमाणे आहे. मी आजपर्यंत अशा प्रकारची असामान्य शुभप्रद रवीरेषा कोणाच्याही हातावर पाहिलेली नाही.