आयुष्य रेषा खणखणीत तर आरोग्य ठणठणीत !

आयुष्य रेषा निर्दोष असता,उत्तम प्रतिकार शक्ती लाभते
आयुष्य रेषा खणखणीत तर आरोग्य ठणठणीत !

भविष्य आपल्या हाती

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

हस्त सामुद्रिक शास्त्रात आयुष्य रेषा निर्दोष पूर्ण लांबीची अंगठ्याच्या आतून उगम पाऊन शुक्र ग्रहाला वळसा घालून मणिबंधापर्यंत जाते. आयुष्य रेषा डाव्या व उजव्या हातावर एक तंतोतंत एकसारखी असत नाही. डाव्या हातावरील आयुष्य रेषा जन्मतःच संचिताची असते, तिच्यात सहसा बदल होत नाहीत, व्यक्ती डावखुरी असेल तर उजव्या हातावरील आयुष्य रेषा संचिताची असते. आयुष्य रेषा थोडीशी खोल हाताच्या रंगापेक्षा थोडीशी गडद व संपूर्ण एकसारखी असता ती शुभकारक असते आरोग्य व प्रतिकारशक्ती प्रदान करते. दोषपूर्ण आयुष्यरेषा-तुटलेली, कमीजास्त जाडीची, साखळीयुक्त, आडव्या रेषांनी छेदलेली, रेषा रेषांनी तयार झालेली प्रतिकार शक्ती प्रदान करीत नाही,अश्या वेळेस दोष पूर्ण आयुष्य रेषा रोगांचा मुकाबला करण्यास समर्थ असत नाहीत, यांची प्रतिकार शक्ती क्षीण असते.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि हल्लीच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने लाखो उपाय सुचविले जातात, परंतु मनुष्याला त्याच्या वाडवडिलांकडून जन्मजातच प्रतिकार शक्ती लाभलेली असते व ही आयुष्य रेषा व्यक्ती किती निरोगी आहे याचे प्रतिनिधित्व करते. मानवाने आरोग्यशास्त्रात खूप प्रगती केली आहे, मानवाला होणारे आजार व त्यावरील उपचार - शस्रक्रिया ह्या मानवाला वरदान आहेत. मानवाच्या वेदना कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व त्याला त्याच्या व्याधीमध्ये आराम मिळावा, जगणे सुखकर व्हावे म्हणून मानवाची प्रगती प्रचंड आहे, परंतु संपूर्ण निरोगी शारीरिक क्षमता आयुष्यभरासाठी बहाल करण्यासाठीची मानवी प्रगती नाही. मनुष्याने प्रयत्न केल्याने काही महिन्यात विविध उपचाराने, व्यायामाने प्रतिकार शक्ती काही प्रमाणात वाढत असेल तरी त्याला मर्यादा आहेत, कारण परमेश्वराने बहाल केलेली जन्मजात प्रतिकार अथवा निरोगी शरीर राहण्याच्या दृष्टीने बहाल केलेली शक्ती ही जन्मजात असते व ती नशिबानेच प्राप्त होते आयुष्य रेषा निर्दोष का दोषपूर्ण हे मानवाच्या हातात नाही कारण परमेश्वराने प्रदान केलेल्या रेषेत आपण ढवळाढवळ करू शकत नाही.

हातावरील सर्व रेषा बालक आईच्या गर्भात 4 ते 5 महिन्याचा असताना जेव्हा गर्भाला त्वचा लाभते त्या वेळेसच हातावरील रेषा व बोटांवरील छाप निर्माण होतात. हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. आयुष्य रेषा मानवाला त्याच्या आयुष्यातील त्या त्या वय वर्षात होणारे गंभीर आजार दर्शविते, कुठल्या वय, वर्षात नाजूक प्रकृती किंवा गंडांतर योग असेल तर ते दाखविते. येथे एक लक्षात घ्यायला हवे कि डाव्या किंवा उजव्या कुठल्याही हातावर आयुष्य रेषेत दोष सापडला तर त्या वय वर्षात आजारपणाच्या दृष्टीने अशुभ योग हे निश्चितच येणारे असतात, या अशुभ योगाला टाळण्यासाठी किंवा गंडांतर योग नष्ट होण्यासाठी भगवंताची कृपाच असावी लागते.

आयुष्य रेषा मणिबंधापर्यंत असेल तर ती 100 वर्षांपर्यंत मोजली जाते सोबत आयुष्य रेषेचेे मापन दिले आहे ही रेषा अंगठ्याच्या आतून मणिबंधाकडे जाते व त्या प्रमाणे ती मोजली जाते. वाचकांसाठी आयुष्य रेषेचा प्रवास दाखविला आहे या प्रवासात ज्या वय वर्षात आयुष्य रेषेत दोष असेल, तिच्यात खण्ड पडत असेल तेंव्हा गंडांतर योग होऊ शकतो. कोविड साथीच्या रोगात आपला सखा सोयरा, मित्र यांची आयुष्य रेषा जर निर्दोष व खणखणीत असेल तर तर त्यांनी कोविड झाला तरी भिण्याचे कारण नाही, मात्र मी दिलेले आयुष्याचे कालमापन काढून तुम्हाला प्रतिकार शक्तीचा निर्णय करता येईल.

वरील फोटोतील आयुष्य रेषा अति शुभ व सर्वोत्तम प्रकारातील आयुष्य रेषा आहे. या रेषेतून वर जाणारे फाटे हे त्या व्यक्तीच्या जीवनातील त्या त्या वय वर्षातील उत्कर्षाचा काळ दाखवितात.

वरील फोटोतील बाणाने दाखविलेली आयुष्य रेषा साखळी युक्त आहे, अशी आयुष्य रेषा असता प्रतिकार शक्ती असत नाही.

आयुष्यरेषा गुरू उंचवट्यावरून खालच्या मंगळ-शुक्र उंचवटा यांना वळसा घालून मणिबंधापर्यंत जाऊन समाप्त होते. अयुष्यरेषा त्या व्यक्तीच्या जीवनातील विविध कालखंडातील आरोग्य दाखविते. आयुष्यातील अनेक तपशीलवार घटनांची नोंद या रेषेवर होते. व्यक्तीच्या उत्कर्षाचा कालखंड आयुष्याचा शेवट किंवा जीवन समाप्ती आजारात होईल की किंवा कसे हे दाखविते. आयुष्य रेषा ही मानवाच्या नैसर्गिक जीवनाचा आलेख आहे. या रेषेवरून त्या व्यक्तीचे शारिरीक सामर्थ्य आरोग्याची स्थिती ही माहिती मिळते. हातावर आयुष्यरेषा अजिबात नसणार्‍या व्यक्ती मला आजपर्यंत आढळल्या नाहीत. आयुष्यरेषेची लांबी छोटी किंवा मोठी असू शकते. क्षीण, दुर्बल असू शकेल पण तिची अनुपस्थिती जाणवणार नाही. क्षीण व दुर्बल रेषा असणार्‍या व्यक्तीच्या अंगी शारिरीक ताकद, उत्साह यांची कमतरता दिसून येते. त्यांची प्रकृती धडधाकट नसते. दोन्ही हातांवरील आयुष्यरेषा क्षीण व दुर्बल असल्यास नैसर्गिक आयुष्य तिच्या समाप्तीच्या पुढे चालू रहात नाही.

सर्वसाधारण असा नियम आहे की, आयुष्यरेषा जेवढी मोठी तेवढी व्यक्ती दिर्षायुषी असते. आखूड किंवा कमी लांबीची रेषा आयुष्य कमी दाखविते. हा सिद्धांत मोठ्या प्रमाणात खरा ठरला असला तरी प्रत्येक अकाली मृत्यूशी संबंधित आयुष्य रेषा आखूड हेच एकमेव कारण होऊ शकत नाही. कारण व्यक्ती हृदयविकार, कॅन्सर, अर्धांगवायू अथवा इतर आजारांनी मृत झाल्यास हातावरील आयुष्य रेषा ही मोठी असली तरी तिचा मृत्यू झालेला असतो. अशा मृत्यूची चिन्हे इतरत्र सापडतात, आयुष्य रेषेवर नव्हे. आयुष्य रेषेची तपासणी करतांना दोन्ही हातावरील रेषा व तिची स्थिती यांचा विचार करावा लागतो. उजव्या हातावरील आयुष्यरेषा दोषपूर्ण, खराब झाली असेल व डाव्या हातावरील रेषा उत्तम असेल तर त्या व्यक्तीची जन्मजात प्रकृती उत्तम असते. पण व्यक्ती जशी मोठी होत जाते यशाची उच्च शिखरे गाठते तशी तिच्या उजव्या हातावरील आयुष्य रेषा खराब आरोग्य दाखविते. त्या आरोग्याची हेळसांड त्याक्तीच्या हाताने झालेली असते. त्याला ती व्यक्ती तिला लाभलेले वातावरण, व्यसनू, संकटे, आजार इ. अनेक गोष्टी कारणीभूत होतात. लांब व उत्तम आयुष्यरेषा असणार्‍या व्यक्तीचे आरोग्य व जोम चांगला असतो. रेषा बारीक खोल व गुलाबी रंगावर, मोठ्या लांबीची, सुस्पष्ट असेल तर व्यक्ती सुदृढ, उत्साही व जोमदार असते. रोगप्रतिकार क्षमता मोठी असते. नाजूक व दुबळेपणा नसतो. श्रम करण्याची कुवत असते. हातावरील रेषा रुंद, उथळ, साखळीयुक्त असेल तर अशा व्यक्तीमध्ये जोम व उत्सहाचा अभाव दिसून येतो. शारिरीक कमकुवतपणा असतो.

आत्मविश्वास रहात नाही. मात्र हातावर आयुष्यरेषा खोल असेल तर भरपूर उत्साह, उर्जा, आत्मविश्वास, दणकट प्रकृती, उत्तम आरोग्याचा लाभ होतो. तसेच रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त असते क्षीण आयुष्यरेषा असणार्‍या व्यक्तीची प्रकृती कधीच धडधाकट असू शकत नाही. काही आयुष्य रेषा अतिशय रुंद व उथळ असतात त्यामुळे आयुष्यरेषेतून वहाणार्‍या प्रवाहाला प्रभावीपणे पुढे नेऊ शकत नाही. यासाठी रेषांची ताकद व दुबळेपणा बारकाईने तपासावा लागतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com