तुम्ही देवाशिवाय आयुष्य जगू शकता का ?

तुम्ही देवाशिवाय आयुष्य जगू शकता का ?

मी जेव्हा आठ किंवा नऊ वर्षांचा होतो, तेंव्हा जी लोकं देवाला भेटायला मंदीरात जातात त्यांचे काय होते हे पाहण्याचे मोठे कुतूहल माझ्या मनात असे. म्हणून मग मी एका प्रमुख मंदीरासमोर जाऊन ठाण मांडून बसलो आणि मंदिरात जाणार्या आणि बाहेर येणार्या प्रत्येक व्यक्तीचे बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली.

मला येवढेच समजले की जेव्हा ते बाहेर येत, तेंव्हा देवळात दिसलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या विषयावर ते रसभरीत गप्पा मारत असत - त्यांनी कोणते कपडे घातले होते आणि ते काय करत होते अशा विषयांवर. भारतीय मंदिरांमध्ये, कधी कधी एखाद्या व्यक्तीची पादत्राणे दुसर्याच एखाद्या व्यक्तीबरोबर निघून जातात. आणि जेव्हा त्यांची पादत्राणे गायब आहे असे त्यांच्या लक्षात येत असे, तेव्हा ते या पृथ्वीच्या निर्मात्याला आणि निर्मितीलाच शिवीगाळ करीत.

मला असे कायमच दिसून आले आहे की हॉटेलमधून बाहेर येणार्या लोकांच्या चेहेर्यावर; मंदिर किंवा चर्चमधून बाहेर पडणार्‍या लोकांपेक्षा अधिक आनंद दिसून येतो. या व्यक्ती आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊन येतात आणि त्यांच्या चेहेर्यावर कोणत्याही प्रकारचा आनंद दिसून येत नाही. काही व्यक्ती मात्र डोसा किंवा इडली फस्त करून अधिक समाधानाने बाहेर पडतात! हा विरोधाभास, नाही का? यामागचे कारण असे आहे की देवळातील देव प्रत्यक्ष अनुभवता येत नाही, ती तर केवळ एक धारणा, एक समजूत असते; आणि तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता ती केवळ एक सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्ट आहे. पण तुम्ही देवाशिवाय अधिक चांगले आयुष्य जगू शकता का? अशी काही शक्यता आहे यावर माझाविश्वास नाही. तुम्ही ज्याला देव असे संबोधता ते काय आहे? निर्मितीचा जो काही स्रोत आहे, तोच ईश्वर आहे.

तुम्ही निर्मितीच्या स्रोताशिवाय जगू शकता का? निर्मितीचा स्त्रोत आहे म्हणून निर्मिती आहे. तुम्ही निर्मितीच्या स्त्रोताशिवाय जगू शकता का? हे अशक्य आहे. तुम्ही निर्मितीच्या स्रोताबद्दल जागरूक न राहता जगू शकता का? हो, पण फारसे चांगले नाही. परंतु तुम्ही जर सजग, सचेत आणि निर्मितीच्या स्त्रोताच्या प्रत्यक्ष संपर्कात असाल, तर तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे जीवन जगाल. 22व्या शतकात, वैज्ञानिकांच्या एका गटाने देवाला जाऊन भेटायचे ठरविले. ते तेथे गेले आणि म्हणाले, अरे वृद्ध माणसा, तू तर अतिशय चांगली निर्मिती केली आहेस. त्यासाठी आम्ही तुझे अतिशय आभारी आहोत, पण आता तू करत असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकतो. तुझी आता निवृत्तीची वेळ आली आहे असे आम्हाला वाटते. देव म्हणाला, हो का? तुम्ही काय काय करू शकता? आम्ही सृष्टीची निर्मिती करू शकतो. देव म्हणाला, मला दाखवा बरे. म्हणून मग त्यांनी थोडीशी माती उचलली आणि तिच्यापासून एक लहान मूल बनवले; आणि ते जिवंत झाले. देव म्हणाला, ठीक आहे, हे खूपच चांगले आहे, पण सर्वप्रथम तुम्ही स्वतः निर्माण केलेली माती घेऊन या.

तुम्ही कोणतीही गोष्ट निर्माण करत असलात, तरीही ती अगोदरच अस्तीत्वात असणार्या स्त्रोतापासूनच निर्माण करता. त्याशिवाय, तुम्ही एखादी गोष्ट कशी निर्माण कराल? त्याशिवाय काहीही शक्य नाही. एकतर तुमचा देवाशी संपर्क असतो, किंवा नसतो. तुम्ही त्याच्या संपर्काशिवाय जगलात, तर तुमच्याकडे थोडीफार क्षमता असू शकेल, पण त्याचबरोबर आयुष्यात मोठा संघर्षदेखील करावा लागेल. आज अनेक लोकांसोबत अगदी असेच घडते आहे. तुमचा जर देवाशी संपर्क असेल, तर तुम्ही अतिशय आनंदात आणि संपूर्ण क्षमतेने जीवन जगाल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com