पंचेंद्रियांच्या पल्याड

पंचेंद्रियांच्या पल्याड

प्रश्न : आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आत्मज्ञानी होणे शक्य आहे की आपल्या पलीकडे असणार्‍या शक्तीने ते दिले गेले पाहिजे ?

सद्गुरु : निसर्ग वगळता स्वतःच्या पलीकडची कोणतीच शक्ती तुम्ही अनुभवली नाही. तुमच्यामुळे वारा वाहत नाही. हे तुम्हाला अगदी स्पष्ट कळतं. वारा प्रचंड शक्तीने वाहतो परंतु तुम्ही हा वारा सुरू केला नाही. आणि स्वत: ला सुद्धा तुम्ही निर्माण केले नाही. तुम्ही सहज इथे अस्तित्वात आलात. म्हणजे त्या वैश्विक उर्जेशिवाय किंवा तुमच्या पलीकडे असलेली त्या तत्वाशिवाय काहीही घडू शकत नाही. कशाने तरी तुम्हाला घडवलं असलं पाहिजे.

आता तुम्हाला हे ठाऊक नाही की तुम्हाला कुणी घडवलं, तर लगेच तुम्ही म्हणाल की मला देवाने घडवले असले पाहिजे. आणि तुम्ही एक माणूस असल्याने, तुम्हाला वाटतं की देव एक मोठा माणूस आहे.

जर तुम्ही म्हैस असता तर तुम्हाला वाटलं असतं की देव म्हणजे एक मोठी म्हैस आहे. देवाबद्दलची तुमची जी काही कल्पना आहे, हे आत्ता तुम्ही जे कोण आणि जे काही आहात याच्या मर्यादित अनुभवावरून आलेले आहे.

ते कोणत्याच सत्याच्या अनुभवातून आलेले नाही. तुम्ही ज्या शक्तींचा विचार करत आहात, त्या तुम्ही पाहिल्या नाहीत. तुम्ही खरोखर फक्त तीच गोष्ट अनुभवू शकता जी तुमच्या ‘आत’ आहे. पण खरोखर तुमच्या आत जे आहे त्याकडे तुम्ही सखोलतेने लक्ष देऊन पाहिलेच नाही.

आत्तापर्यंत तुम्हाला जे काही माहित आहे, तो तुमचा अनुभव केवळ तुमच्या पाच ज्ञानेंद्रियांपुरता मर्यादित आहे. तुम्हाला जे काही माहित आहे, जगाबद्दल किंवा स्वतःबद्दल, ते केवळ पाहून, ऐकून, गंधाने, स्पर्श करून आणि चाखून तुम्ही जाणले आणि अनुभवले आहे.

जर ही पाच इंद्रिये झोपी गेली तर तुम्ही जगाला आणि स्वतःला जाणू शकत नाही. या इंद्रियांना मर्यादित जाण आहे. त्यांना फक्त दुसर्‍या कशाच्या तरी तुलनेत सर्वकाही जाणवते. उदाहरणार्थ, जर मी स्टीलच्या दांड्याला स्पर्श केला तर माझ्या शरीराचे तापमान एका विशिष्ट स्तरावर असल्याने हे मला थंड वाटते. समजा माझ्या शरीराचे तापमान कमी झाले आणि मी त्याला स्पर्श केला तर ते मला उबदार वाटेल. हा खरा, सत्य अनुभव नाही.

हा अनुभव केवळ भौतिक जगात टिकून राहण्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही जगण्यापलीकडे काहीतरी शोधत असाल तर,पंचेंद्रिये पुरेशी नाहीत. सर्व योगाभ्यासाचा सराव हा मूलभूतपणे तुम्हाला आकलनाच्या पाच इंद्रियांपलीकडचा अनुभव देण्याच्या उद्देशाने आहे. तुम्ही या पाच इंद्रियांच्या पलीकडे जे काही अनुभवता ते भौतिक वास्तविकतेच्या दृष्टीने नाही. हे वेगळ्या आयामात आहे. तुम्ही त्या पैलूला काय हवं ते म्हणु शकता - देव, शक्ती किंवा ’मी’ स्वतः. पण त्याला तुम्ही जे काही नाव द्याल त्याने नेहमीच लोकांचा गैरसमज होतो.

जर तुम्हाला या सगळ्यांच्या पलीकडे जायचे आहे तरच, जर खरोखर तुमची तशी इच्छा असेल तरच ते शक्य आहे. अन्यथा पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील कुठलीच शक्ती तुम्हाला हलवू शकत नाही. याचा अर्थ असा आहे का, की इथे इतर कोणतीच शक्ती नाही? साहजिकच, या अस्तित्वात तुम्ही ज्याला मी म्हणता त्यापेक्षा अद्भूत विलक्षण असे इतर बरेच काही आहे. तुम्ही कोण आहात या ओळखीच्या जर तुम्ही पलीकडे गेलात तर तुम्ही काय आहात आणि तुम्ही ज्याला भौतिकतेच्या पलीकडची शक्ती म्हणता त्यात काहीच फरक उरत नाही.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com