हरतालिका तृतीया
भविष्यवेध

हरतालिका तृतीया

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवर्याच्या दिघार्युष्यासाठी करतात आणि या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती आणि कहाणी करतात. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत हरतालिका तृतीय या नावाने प्रसिद्ध आहे तर दक्षिण भारतीय भागात याला गौरी हब्बा असे म्हणतात. हे व्रत विवाहित आणि अविवाहित स्त्रिया देखील करू शकतात. विवाहित स्त्रिया आपल्या साथीदाराच्या दिर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली योग्य आणि मनोइच्छित वर मिळावा या इच्छेने हे व्रत करतात.

हे व्रत पहिल्यांदा देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केले होते. पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी अन्न, पाणी सर्व त्याग केले होते. त्यांचे वडील त्यांचा विवाह प्रभू विष्णूसोबत लावू इच्छित होते परंतू मनात महादेवाला पती मानून चुकल्या देवी पार्वतीने आपल्या सखीसोबत अरण्यात जाऊन वाळूच्या शिवलिंग स्थापित करून कठोर तप आणि व्रत केले. या दरम्यान देवींनी काहीही ग्रहण केले नाही. पार्वतीची कठोर तपस्या बघून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवींना पत्नी रूपात स्वीकार केले. यामुळे अनेक स्त्रिया हे व्रत निर्जल करतात. रात्री जागरण करून व्रत पूर्ण करतात.

या दिवशी वाळूने महादेवाची पिंडी, पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते. हरतालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आव्हान केले जातात. विड्यांच्या पानावर खारीक, बदाम,नाणे ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. गणपतीला अभिषेक करून, जानवं, शेंदूर, लाल फुलं, दूर्वा, नैवेद्य अर्पित केलं जातं. नंतर वाळू निर्मित प्रतिमेवर महादेवाला स्नान करवून त्यांना बेलपत्र, शमीपत्र आणि फुलं अर्पित केलं जातात. महादेवाला विविध पत्री अर्पित करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. महादेवांची विधीपूर्वक पूजन केल्यानंतर देवी पार्वती आणि सखीची पूजा केली जाते. त्यांना शृंगारांच्या वस्तू अर्पित केल्या जातात. नंतर नैवेद्य दाखवून आरती आणि कहाणी केली जाते. या दिवशी रात्री देखील आरती करून जागरण करतात. दुसर्‍या दिवशी दही-कान्हवलेचे नैवेद्य दाखवून व्रताचे समापन केलं जातं.

या व्रताचे काही नियम - हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणी ग्रहण करत नाही. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. या दिवशी घर स्वच्छ असावं. घरातील कचरा बाहेर करावा. रात्री जागरण करुन भजन-कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहे.

क्रोध करणे टाळावे - हरतालिका तृतीया व्रत दरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर रहावे. या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेंदी लावण्यात येते.

अपमान करु नये - तसं तर वयस्कर लोकांचा कधीच अपमान करु नये परंतू या दिवशी चुकुन देखील वडिलधार्यांना अपशब्द बोलू नये. त्यांचे मन दुखावेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये.

झोपू नये - व्रत दरम्यान झोपणे योग्य नाही. दिवसा तर झोपू नाहीच परंतू रात्री देखील जागरण करावं. हे व्रत करणार्यांनी रात्री जागरण करुन भजन- कीर्तन करावं.

खाणे-पिणे टाळावे - हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे. कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतू शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी, गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करु शकतात. तरी या दिवशी दूधाचे सेवन करणे टाळावे. तसेच अन्न घेणे देखील टाळावे. व्रत करण्याच्या एक दिवसापूर्वीपासून तामसिक भोजन टाळावे.

प्रेमाने वागावं - नवर्‍याच्या दिर्घायुष्यासाठी करत असलेल्या व्रतादरम्यान नवर्‍याशी भांडण, वाद करणे टाळावे. नवर्‍याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण तरी कसं होणार.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com