भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते.

भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपर्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात.

देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. गीतेतील शिकवण ही कालातीत असून, आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते, याची प्रचिती अनेकांना येत असते.

हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. आजच्या काळातही अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात. गीतेवर देशभरात अनेक अन्य ग्रंथ, टीका ग्रंथ रचण्यात आले. यावरूनही गीतेची थोरवी अधोरेखित होते, असे सांगितले जाते.

कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटलेय गीतेत? जाणून घेऊया...

कर्म हाच अधिकार

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

भावार्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.

याचा अर्थ असा की, मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते, असे सांगितले जाते.

कोणाचाही द्वेष करू नका

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।

शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥

भावार्थ : असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे.

याचा अर्थ असा की, एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदीत होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते.

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥

भावार्थ : निःसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे.

याचाच अर्थ असा की, पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते.

आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो, असे सांगितले जाते.

देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती? रामदास स्वामी म्हणतात...

संयम आणि नियंत्रण आवश्यक

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते॥

भावार्थ : मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र, मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्या विषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो.

याचा अर्थ असा की, दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खर्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खर्या, निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते, असे सांगितले जाते.

श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।

सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥

भावार्थ : जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरुपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही.

याचाच अर्थ असा आहे की, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, असे सांगितले जाते.