घरात देवघर नेमके कुठे असावे ?

jalgaon-digital
3 Min Read

स्वयंपाकघरातील देवघर

घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपर्‍यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपर्‍यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते, असे सांगितले जाते. पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपर्‍यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपर्‍यात ठेवावे. पूजा घरात पांढर्‍या, पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर बसवावी.

देवघरातील मूर्ती

देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. देव्हार्‍याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य ठेवू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंच धातूची असावी. देव्हार्‍यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणार्‍या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल, अशा पद्धतीने मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे (शिवलिंगाचे) निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा.

देवघरात शिवलिंग ठेवावे का ?

देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे, असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. अन्य देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे, असे सांगितले जाते.

देवघरात काय करू नये ?

देवघरात स्टोअरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे. शिवाय हात पुसायला रुमाल लागतात. देवाचे वस्त्र असतात. ताम्हण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचे सामानपण तिथेच राहील, याची काळजी घ्यावी. काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते. अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. योग्य प्रकाशव्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भर घालते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहाण्याचा विचारही महत्त्वाचा आहे, असे सांगितले जाते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *