Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधकल्पनाशक्ती, निर्धार व चातुर्याचा मिलाफ

कल्पनाशक्ती, निर्धार व चातुर्याचा मिलाफ

प्रसिद्ध चरित्र अभिनेता अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955 रोजी शिमला येथील काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्याचे वडील पुष्करनाथ खेर हे वनविभागाचे लिपीक होते आणि त्याची आई दुलारी खेर गृहिणी होती. त्याचे शिक्षण सिमला येथील डी. ए. व्ही. स्कूलमध्ये झाले. 1978 मध्ये खेर यांनी नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून पदवी प्राप्त केली.

त्याच्या सुरुवातीच्या काही भूमिका हिमाचल प्रदेश विद्यापीठात सादर केलेल्या नाटकांमधील होत्या. त्यांनी लखनऊमधील राज बिसारियाच्या भारतेन्दु नाट्य अकादमीमध्ये शीशे का घर या दिग्दर्शित चित्रपटातील छोट्या भागासाठी कलाकारांना अभिनय शिकविला. संघर्षमय दिवसांमध्ये मुंबईत असताना त्यांच्याजवळ पैसे नसल्याने त्यांचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक महिना मुक्काम होता.

- Advertisement -

1984 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी अनुपम खेर यांनी एका सेवानिवृत्त मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका बजावली. तो चित्रपट होता ‘सारांश’. या चित्रपटामध्ये त्यांनी आपला तरुण मुलगा गमावला, असे कथानक होते. अनुपम म्हणतात की, त्यांनी तरुण वयातच आपल्या डोक्याचे केस गमावले आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला तरुणपणी म्हणजे 29 व्या वर्षी 65 वर्षाच्या वृद्धाची भूमिका आली. त्यांनी छोट्या पडद्यावर ‘से ना समथिंग टू अनुपम अंकल’, ‘अविष्कार दस कोटी का’, ‘लीड इंडिया’, आणि ‘अनुपम खेर शो-कुछ भी हो सकता है’ यासारखे टीव्ही कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांना पक्षाघाताचा आजार झाल्यानंतरही ‘हम आपके है कौन’मध्ये दमदार अभिनय केला. अनुपम खेर यांनी बर्‍याच विनोदी भूमिका साकारल्या आहेत. चरित्र अभिनेत्यांच्या भूमिकेबरोबरच त्यांनी सकारलेल्या खलनायकी भूमिकाही गाजल्या.

अनुपम खेर यांनी शाहरुख खान समवेत डर, जमाना दीवाना व दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, चाहत, कुछ कुछ होता है, मोहब्बते अशा अनेक चित्रपटांत भूमिका केली आहेत. वीर-ज़ारा जब तक है जान असे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर गाजले. 2007 मध्ये अनुपम खेर आणि सतीश कौशिक या जोडगोळीने करोल बाग प्रॉडक्शन ही चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. सतीश कौशिक व अनुपम यांनी अभिनयाचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत एकत्र घेतले होत. त्यांचा पहिला चित्रपट ‘तेरे संग’ हा सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. अनुपम खेर यांनी ‘थोडा तुझा … थोडा माझा’, ‘कशाला उदयाची बात’ यासह काही पंजाबी चित्रपटांमध्येही अभिनय केला. 2014 मध्ये खेर यांनी ब्रिटिश चित्रपट ‘शॉनग्राम’मध्ये अभिनय केला होता. हा चित्रपट 1971 च्या बांग्लादेशच्या मुक्तिसंग्रामावर आधारीत होता.

2016 मध्ये अनुपम खेर यांनी वृत्तवाहिनीवर माहिती पटाची मालिका ‘भारतवर्ष’ सादर केली. या मालिकेत प्राचीन भारताच्या इतिहासाचा प्रवास दाखविला होता . 2019 मध्ये त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित चित्रपट ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये भूमिका केली. ऑक्टोबर 2003 ते ऑक्टोबर 2004 पर्यंत त्यांनी भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांना अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. राजकीय प्रवासात मोदी भक्त आणि भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या प्रयत्नाने व त्यांनी घेतलेल्या अपार कष्टाने जीवन समृद्ध केले. पैसे, मान-सन्मान प्राप्त केले. असे खुप थोडी उदाहरणे आहेत की, ज्यांनी भाग्य जबरदस्त महत्त्वाकांक्षेने बदलले. अभिनयाची आवड त्यांना राष्ट्रीय चित्रपट संस्थेत प्रवेश घेण्यापासून परावृत्त करू शकली नाही. सुरूवातीपासूनच डोक्यावरील टक्कल अस्तित्त्वात होते. परंतु गोरा रंग, सोनेरी दाढी त्यामुळे त्यांचे व्यतिमत्व चारचौघात उठून दिसायचे.

अनुपम खेर हे साधारण आर्थिक परिस्थितील कुटूंबात जन्माला आले. मुंबईला कामाच्या शोधात आले. खिशात दमडी नसतानाही रेल्वे स्टेशनवर महिनाभर मुक्कामाला राहिले. आयुष्यात मोठे व्हायचे स्वप्न होते. कुठलेही फिल्मी घराणे नसताना बॉलिवूडमध्ये बस्तान बसवणे हे सोपे काम नाही. त्यासाठी जिद्द, मेहनत व हार न मानण्याची वृत्ती लागते. ती अनुपम यांच्यात आहे. म्हणून ते आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभिनेते आहेत.

आतापर्यंत आपण भाग्यवंत व्यक्तींचे हात पाहिले, अभ्यासले, त्यांचे परीक्षण केले. आज असाही हात तुमच्यासमोर आहे, ज्याने जिद्दीने व न हारता संकटाशी सामना करून दैदिप्यमान यश अर्जित केले. यामध्ये त्यांना परमेश्वराकडून लाभलेली प्रगल्भ बुद्धिमत्ता वाक्चातुर्य, निश्चय हे गुण कामास आले. त्यासाठी मजबूत हात व हाताचा आकार, मजबूत मोठा अंगठा व मस्तक रेषा हातावर पूर्ण आडवी गेलेली लांब व ती जास्त चंद्र ग्रहाकडे न झुकता वरच्या मंगल उंचवट्याकडे गेलेली असल्याने सातत्याने ते प्रयत्नवादी राहिले.

फुटकळ स्वप्नरंजनात न राहता सत्य स्विकारले. चरित्र भुमिका स्वीकरल्या. सुरूवातीला वयाच्या 29 व्या वर्षी 65 वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारावी लागली. परंतु त्यात जिवंतपणा आणत ‘सारांश’ चित्रपटामधील असहाय्य पित्याची भूमिका अजरामर केली.

भाग्य रेषा वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत अत्यंत रुंद व जाड आहे. नंतर मात्र भाग्य रेषेने आपले ठिकाण बदलून ती बारीक चमकदार झाली. त्यामुळे आर्थिक उन्नतीला सुरवात झाली. हातावर गुरु उंचवटा मोठा असल्याने त्यांंनी स्वत:ला धार्मिक, सामाजिक, राजकीय व स्वतःला अभिनयात एका अति उच्च उंचीवर नेऊन ठेवले.

आयुष्यात यश मिळाले ते आयुष्य रेषेतून गुरु उंचवट्यावर गेलेल्या स्वतंत्र रेषेने. हृदय रेषेचा एक फाटा गुरु व शनीच्या बोटाच्या पेरामध्ये गेल्याने अशा व्यक्ती व्यवहारी असतात. त्याचा फायदा त्यांना त्यांच्या जीवनात यश मिळण्यासाठी निश्चित होतो. मस्तक रेषा व आयुष्य रेषेत अंतर आहे. त्यामुळे कोणाकडून कसे काम करून घ्यायचे, याचे जन्मतःच गुण प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे अवतीभवतीच्या लोकांना सांभाळण्यात त्यांचा हातखंडा असतो.

भाग्य रेषेतून बुध रेषेचा उगम होत असल्याने व्यवस्थापनात हुशार, स्वतःला प्रकाशझोतात कसे ठेवायचे याची उपजत जाण व असलेल्या हुशारीचा मिलाफ झाल्याने आपल्या व्यवसायात मोठे होण्याची गुरुकिल्ली परमेश्वराने प्रदान केली आहे. त्यामुळे जीवनात ते यशस्वी होऊ शकले. बुध रेषा भाग्य रेषेच्या आधाराने उगम पावल्यामुळे बुध रेषेत अधिक शुभत्व आले आहे. ही बुध रेषा तीन ग्रहांवरून जाते ते अनुक्रमे चंद्र, वरचा मंगळ व बुध ग्रहाला जाऊन मिळाल्याने तिच्यात या तीन ग्रहांचे शुभ गुण समाविष्ट झाले आहे. त्या गुणात चंद्राची कल्पना शक्ती, मंगळाचा-निर्धार व बुध ग्रहाचे-चातुर्य यांचा मिलाफ झाला आहे.

अनुपम खेर यांच्या हातावरील रेषा ह्या अतिभाग्यकारी नसल्या तरी त्या त्यांच्या जीवनात प्रेरणा देणार्‍या व सहजासहजी नसेल तरी प्रयत्नाने यश देणार्‍या आहेत. गुरुचे पहिले बोट मधल्या शनीच्या बोटाकडे ओढले गेलेले आहे. त्यामुळे शनी ग्रहाची कायम अस्वस्थता, उद्याची काळजी, असुरक्षित भावना राहते. त्यांच्या या भावनेमुळेच खेर हे कायम स्वतःला कामात गुंतवून ठेऊ लागल्याने काम करीत गेले. आयुष्यात काम करण्याचे त्यांनी थांबविले नाही. ते अजूनही कामात सक्रिय आहेत. अनुपम खेर एक मनस्वी, धुरंधर अभिनेते आहेत व जीवनात प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी यश पदरात पाडून घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या