त्रैमासिक भविष्य - मीन Quarterly Future - Pisces

धनसंग्रह होईल
त्रैमासिक भविष्य - मीन Quarterly Future - Pisces

सौ. वंदना अनिल दिवाणे

मे - 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी रवि-हर्षल, तृतीयात बुध-राहू-शुक्र, चतुर्थात मंगळ, नवमात केतू, लाभात शनी-प्लुटो, व्ययात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास -राशीची आद्याक्षरे दी, दू, आ, ज्ञा, धा, दे, दो, चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरूद्ध तोंड केलेल्या माशांची जोडी आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व- जल, राशी द्विस्वभावी असल्याने निर्णयाच्या बाबतीत तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा तुमच्यासाठी फायद्याची आहे. लिंग स्त्री, सत्वगुणी, वर्ण ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती राशीचा अंमल पावलांवर आहे. पायांच्या दुखापतीविषयी सावध रहावे. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस-गुरुवार, देवता- विष्णु, मित्रराशी- कर्क, वृश्चिक, शत्रुराशी-मेष, सिंह, धनु. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनशील, विनम्र, कल्पनाप्रिय, हयगयी वृत्ती, अनिश्चितता, स्वप्रयत्नाने प्रगती होईल.

द्वितीयातील हर्षल कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास तसा त्रास होणार नाही. मोठ-मोठया योजना आखण्याचे काम तूर्त थांबवा. अंथरूण पाहून पाय पसरा. अन्यथा मोठ्या योजना अर्धवट राहतील.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. ललीत कलांमध्ये प्रगती होईल.नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी - माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा -1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 31

जून - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी हर्षल, तृतीया रवि-बुध-राहू . चतुर्थात शुक्र, पंचमात मंगळ, नवमात केतू लाभात शनी-प्लुटो, व्ययात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात मंगळ आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मित्रसुख कमी. पुत्राविषयी काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खाची संगत टाळावी. ऐशोरामाकडे वृत्ती राहील. सट्ट्यासारख्या व्यवहारापासून दूर रहा. जवळपास प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रिडा क्षेत्राची आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमीकल्स, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, वैद्यकीय या शास्त्रीय विषयाशी संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

लाभात असलेला शनि भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने याची प्रचिती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारे शत्रु एक तर नष्ट होतील किंवा सुतासारखे सरळ वागू लागतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. संततीच्या बाबतीत काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या स्वास्थाकडे विशेष लक्ष द्यावे. नातेवाईक अथवा लबाड मित्रांपासून फसवणूकीची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी -महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. मात्र हे धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी गुरू हर्षल, तृतीयात बुध-राहू, चतुर्थात रवि, पंचमात मंगळ-शुक्र, नवमात केतू , लाभात शनी-प्लूटो, व्ययात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात राहू आहे. आतापर्यंत भांबावून टाकणार्‍या समस्यांना उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती समस्या हा तुमच्या यशाचा बायप्रॉडक्ट आहे. ते सर्व नष्ट होतील. शास्त्रसंशोधनात तत्संबंधित लोकांना यश मिळेल. सौख्य व विलास उपभोगावयास मिळेल. मोठ मोठ्या उलाढालींमुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कृषी व पशूपालनापासून लाभ होईल. राहूच्या समोर असणारा केतू भाग्यस्थानी विराजमान आहे. राहू-केतू विराजमान असतांना न दिसणार्‍या हवेप्रमाणे मानवी जीवनावर बरे- वाईट परिणाम करतात.

भाग्यातील केतू तळागाळातील लोकांच्या सहकार्याने जीवनाच्या नावेची प्रगतीपथाकडे गतीत वृद्धी करील. मात्र त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे लागेल. अन्यथा नौका वादळात सापडेल.

व्ययात नेपच्यून आहे. संधोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्‍यांना आरोपी पकडण्यात यश मिळेल.

स्त्रियांसाठी - व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. त्यामुळे अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com