मस्तक रेषेमुळे घडल्या खूबसूरत रेखा

भविष्य आपल्या हाती
मस्तक रेषेमुळे घडल्या खूबसूरत रेखा

प्रफुुुल्ल कुलकर्णी

भारतीय चित्रपटसृष्टीत पडद्यावर पहिली अँग्री यंग वुमन साकारणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आपल्या सर्वांगसुंदर अभिनयासह अस्सल भारतीय सौंदर्यासाठीही लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी हा बीटाऊनमधील चर्चेचा विषय. त्यावर अनेक गॉसिपही झाले. त्यातून काही दंतकथांनीही जन्म घेतला. थोडक्यात भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक काळ चर्चेत असलेल्या अभिनेत्रींमध्ये रेखा यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी पठडीबाहेरच्या भूमिका साकारण्याचे धाडस दाखवले आणि खासगी आयुष्यातही अनेक धाडसी निर्णय घेत अनेकांना अचंबित केले. त्यांच्या अभिनयासोबत वैवाहिक आयुष्यही चर्चेत राहिले. मस्तक रेषेमुळे जीवनात यशाच्या पायर्‍या चढणार्‍या रेखा यांच्या वैवाहिक सुखाला विवाह रेषेला लागून असलेल्या स्पष्ट-अस्पष्ट बारीक रेषांनी बाधा आणली, असे दिसून येते.

रेखा म्हणजेच भानुरेखा गणेशन् यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. आजवर 180 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले. 2010 मध्ये सरकारने त्यांना नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले.

रेखा या दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवणारी जोडी पुष्पवल्ली आणि जेमिनी गणेशन यांची कन्या. रेखा यांनी बालकलाकार म्हणून इंटी गुट्टू आणि रंगुला रत्नम या तेलुगू चित्रपटांतून अभिनयात पाऊल टाकले. ‘सावन भादो’मधून त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. प्रारंभी अनेक चित्रपटांना यश मिळूनही सावळा रंग आणि वजनामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला. मात्र याच टिकेमुळे प्रेरित होऊन, त्यांनी आपल्या सौंदर्याला नवा आयाम दिला. अभिनयाचे तंत्र आणि हिंदी भाषेतील प्रभुत्व सुधारण्यासाठी अविरत प्रयत्न केले. नव्या बदलांसह पडद्यावर आलेल्या रेखा यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवला.

खुबसूरत ते क्रीश- विनोदी चित्रपट ‘खुबसूरत’मधील त्यांच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्यानंतर बसेरा, एक ही भूल, जीवन धारा आणि अगर तुम ना होते या चित्रपटांमधून भूमिका केल्या. उमराव जान चित्रपटातील भूमिकेमुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला. खून भरी मांग या चित्रपटापासून पडद्यावर अँग्री यंग वुमनचे नवे रूप प्रेक्षकांना दिसले. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा दुसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांनी पटकावला. पठडीबाहेरच्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याचे धाडसही त्यांनी दाखविले. त्यामुळे ’खिलाडियों का खिलाडी’सारख्या चित्रपटामध्ये लेडी अंडरवर्ल्ड डॉनची भूमिकाही त्यांनी जीवंत केली. या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पटकावला. झुबेदा आणि लज्जा या चित्रपटात भूमिकांसाठी त्यांचे कौतुक झाले. कोई मिल गया आणि क्रिश या चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेत दिसल्या. त्या 2012 मध्ये राज्यसभा सदस्या झाल्या. त्यांचे खाजगी जीवन आणि सार्वजनिक प्रतिमा हे वारंवार माध्यमांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय राहिले आहेत. मार्च 1990 मध्ये दिल्ली येथील उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी झालेला एकमेव विवाह सात महिन्यांनंतर संपुष्टात आला. मुकेश अग्रवाल यांचे आत्महत्या प्रकरण त्यावेळी गाजले. 1970 च्या दशकात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची मोठी चर्चा होती. रेखा खासगी जीवनावर चर्चा करण्यास नाखूष असतात, त्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक घटनांबाबत वेगवेगळ्या चर्चा झडत राहिल्या.

रेखा यांनी मुख्य प्रवाहातील चित्रपटांसोबत समांतर सिनेमातही अभिनयाची छाप सोडली. कलयुग, उमराव जान, विजेता, उत्सव आणि इजाजत हे चित्रपट त्याची उदाहरणे. सिंगापूर येथे आयोजित 2012 च्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात त्यांचा उल्लेख भारतीय सिनेमाची राणी म्हणून झाला. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या रेखा यांना हे बिरूदही शोभून दिसते.

प्रयत्नाची परिसीमा- रेखा यांना अभिनय कारकिर्द आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हाने आणि संघर्षाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी समोर आलेल्या सर्व अडचणींवर मात केली. रेखा यांच्या हातावरील मस्तक रेषेमुळे हे शक्य झाले. रेखा यांच्या हातावरील मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेली असून ती प्रयत्नाच्या परिसीमा गाठण्यासाठी मदत करते. अविरत निश्चयाने व ध्येयाने न डगमगता न थकता आपल्या इच्छित कार्यात यश मिळविते.

मस्तक रेषा जर चंद्र ग्रहावर खाली उतरली असती तर रेखा यांचे प्रयत्न अपुरे पडले असते. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे चंद्र हा कलाविष्काराचा कारक आहे. रेखा यांच्या हातावर चंद्राचे बळ कमी पडले. मात्र मस्तक रेषेमुळे त्यांची ध्येयपूर्ती झाली. कलाविष्काराची भर रेखा यांच्या हातातील लांबसडक व निमुळते होत जाणार्‍या बोटांनी भरून काढली आहे. निमुळती बोटे कलाविष्कारला साथ देतात. अभिनयाची जाण देतात. येथे रेखा यांच्या बोटांचे आणखी एक वैशिट्य दिसते, बोटांच्या दुसर्‍या पेर्‍यात सांधे आहेत. हे सांधे मोठे आहेत. बोटांच्या पेर्‍यामधील सांधे हे त्या व्यक्तीला स्थितप्रज्ञ बनवितात. प्रत्येक बाबींचा शांतपणे विचार करून निर्णयाची क्षमता येते. निर्णयात घाई गडबड होत नाही. व्यक्तीला ओळखण्यात चूक होत नाही. दुसर्‍या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात संभ्रम राहत नाही किंवा भूलथापांना बळी पडत नाही. निर्णय व्यवहार्य असतात. हातावरील चंद्र ग्रह स्वच्छ आहे. तो शुभदायी आहे. शिवाय चंद्र ग्रह शुक्र ग्रहापेक्षा मनगटाखाली जास्त उतरला आहे. चंद्र ग्रहाच्या जास्तीच्या आकाराने रेखा यांना अत्यंतिक प्रतिभावान बनविण्यात योगदान दिले आहे. एखादे वाक्य अथवा सिन समजावून सांगितला कि त्यांना तो परत सांगावा लागत नाही. ही बौद्धिक क्षमता चंद्र ग्रहांमुळे विकसित आहे.

भाग्यशाली रेखा- हातावर भाग्य रेषा आयुष्य रेषेच्या मनगटाकडे खाली उगम पावत असून अशी भाग्य रेषा भाग्यवंतांच्याच हातावर असते. या व्यक्तींना आर्थिक चणचण कधीच नसते. भाग्य रेषा शनी ग्रहाकडे जाताना आयुष्य रेषेपासून भाग्य रेषा जितकी दूर जाईल तेवढी धनवृद्धी होत असते. म्हणजे सर्वसाधारण वयाच्या 30 नंतर ऐश्वर्य प्राप्त होण्यात सुरुवात होते. आर्थिक ओघ हा चढत्या क्रमाने आयुष्यात कायम राहतो. रेखा भाग्यशाली असण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांची रवी रेषा सुद्धा खूप लांब आहे. ती वयाच्या 15 व्या वर्षापासून व शुभ झाली आहे. पुढे सरळ रवी ग्रहावर गेली आहे. रवी रेषेचा एक फाटा शनी-रवीच्या ग्रहांच्या बोटांच्या पेर्‍या मध्ये व दुसरा फाटा बुध-रवी ग्रहांच्या बोटांच्या पेर्‍यामध्ये गेलेला असल्यामुळे रेखा यांना जागतिक मानसन्मान व कीर्ती प्रदान झाली आहे.

विवाह रेषेत दोष

करंगळीच्या खाली विवाह रेषा आडवी एक ते दीड सेंटिमीटर लांबीची असते. ती रेखा यांच्या हातावर वयाच्या 24 वर्षी आहे. या वर्षी विवाहाचे योग होते. विवाह रेषेला लागून छोट्या छोट्या स्पष्ट-अस्पष्ट अशा बारीक रेषा आहेत. त्या वैवाहिक सुखाला मारक आहेत. त्यामुळेच रेखा यांना जीवनात वैवाहिक सौख्य प्राप्त झाले नाही. विवाह रेषा हातावर अशुभत्व घेऊन आली असेल तर वैवाहिक सुखात बाधा येत असते. वैवाहिक सुख हे नशिबातच असावे लागते. वैवाहिक सुख मिळवायचे असेल तर ते 10 पैकी 9 जणांना तडजोडीनेच प्राप्त होऊ शकते. अन्यथा जन्म कुंडली मिलन करून सुद्धा वैवाहिकसुख मिळण्याची खात्री नसते. याचाच अर्थ वैवाहिक सुख हे नशिबातच असावे लागते. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीस सर्व सुखे देत नाही. त्यात काहीतरी कमतरता असतेच. रेखा यांना परमेश्वराने वैवाहिक सुख सोडून बाकीचे सर्व सुख प्रदान केले, असे त्यांच्या हातावरील रेषांमधून दिसून येते.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.