बैलपोळा सर्जा राजाचा सण

jalgaon-digital
4 Min Read

पोळा हा सण खेडेगावात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. केवळ खेड्यातच नाही, तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी शेतीवर अवलंबून असणार्‍या प्राण्यांचे खूप महत्त्व आहे.

शेती ही बैलांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या निमित्ताने हा सण साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण. तसेच तो विदर्भात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण व आंंध्र भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो. ज्या कुटुंबाकडे शेती नाही ते बैलपोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात. बैलपोळा सण साजरा करताना सणाच्या निमित्ताने तरी एक दिवस बैलाची पूजा करून नांगरापासून त्याला दूर ठेवले जाते.

पोळ्याच्या दिवशी बैलाला शेतीचे कोणतेही काम करू देत नाहीत. यादिवशी बैलांना उटणे लावून, मालिश करून स्नान करतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवले जाते, त्यांना रंगीबिरंगी वस्त्रांनी दागदागिन्यांनी सजविण्यात येते. बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन, त्यांना आंघोळ घातली जाते. नंतर त्यांना चारा देऊन घरी आणतात. बैलाच्या खांद्याला तुपाने किंवा हळदीने शेकतात. त्याला खांदा शेकणे असे म्हणतात. तसेच त्याच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलेली झूल चढवतात आणि सर्व अंगावर ठिपके देऊन शिंगाना बाशिंग बांधतात. घुंगरांच्या माळा घातल्या जातात.

नवीन कसारा, पायात चांंदीचे तोडे घातले जातात, बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. बैलाची निगा राखणार्‍या घरगड्यास नवीन कपडे घेतले जातात आणि मग गावात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. शेतकर्‍यांसाठी सदैव कष्ट करणार्‍या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक पोळ्याला खूप महत्त्व देतात. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.

विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात. कारण विदर्भातील शेती बहुधा बैलावर अवलंबून आहे. त्यामुळे पारंपारिक दृष्टीने बैल पोळा हा सण बैलांनी शेतीमध्ये केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. बैल पोळा हा बैलांचा सन्मानाचा उत्सव आहे. प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात.

तेलंगणाच्या उत्तरेकडे भागातील लोक बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या असे म्हणतात. या सणाला काही ठिकाणी बेंदूर सुद्धा म्हटले जाते. हा उत्सव मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये मुख्यतः साजरा केला जातो. असे उत्सव भारतातील इतर ठिकाणी सुद्धा साजरे केले जातात. दक्षिणेस यास पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हणतात. बैलपोळा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा असतो. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पिठवळ्याची पूजा करतात. तसेच या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. शेतकरीही आपल्या शेतातील राबवणार्‍या बैलांना वेगवेगळ्या पदार्थांचे पक्वान्न खाऊ घालतात. तसेच त्यांची चांगल्या पद्धतीने आंघोळ करून सजावटही करतात व त्यांची संध्याकाळी पूजा करतात.

बैलपोळा हा शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने व उत्साहाने दरवर्षी साजरा करीत असतो. बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात. बैल म्हणजे शेतकर्‍यांचा मित्रच आहे. आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात, पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की, नांगरणी, वखरणी, वाहतूक बैलांच्या साहाय्याने केली जात असे. पूर्वीच्या काळी मोटर, गाड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचा उपयोग होत होता. बैलांंचे आभार मानण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो.

बैलपोळाविषयी एक कथा आहे. जेव्हा प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर आले होते, तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचे प्राण घेण्याचे प्रयत्न करत होता. कंसाने एकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असूर पाठवले होते. एकदा मामा कंसाने पोलासूर नावाचा राक्षस कृष्ण भगवानचा वध करण्यासाठी पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध करून सर्वांना चकित केले होते. दिवस श्रावण अमावास्येचा होता म्हणून या दिवसाला पोळा म्हणूं लागले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *