भाग्यरेषेमुळे लहान वयात आलियाची आर्थिक भरभराट

भाग्यरेषेमुळे लहान वयात 
आलियाची  आर्थिक भरभराट

अभिनेत्री आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबई येथे झाला. आलियाला घरातूनच चित्रपटसृष्टीची परंपरा लाभली. चित्रपट व्यवसायात आपले स्थान निर्माण करणार्‍या भट्ट परिवारातून ती येते. वडील महेश भट्ट हे सप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आई सोनी राजदान या अभिनेत्री. मोठी बहीण शाहीन आणि दोन सावत्र भावंडे पूजा आणि राहुल भट्ट दखिल चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. निर्माता मुकेश भट्ट हे तिचे काका.

आलियाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. शाळेच्या गायन समूहात तालीम करताना त्यांना प्रथम हे जाणवले, असे ती म्हणते. आलीयाने लवकरच शामक डावरच्या संस्थेत नृत्याचे धडे घेण्यास सुरूवात केली होती. त्यांना अभिनयाची पहिली संधी वडिल महेश भट्टे निर्मिती संघर्ष या चित्रपटात मिळाली होती. तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. चित्रपट निर्माते -दिग्दर्शक करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून ती पहिल्यांदा मुख्य भूमिकेत झळकली.

स्टुडंट ऑफ द इयरमधील भूमिकेला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने आलिया निराश झाली होती. अधिक चांगल्या भुमिका साकारण्यास मिळाव्या, अशी आशा बाळगून होती. तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर इम्तियाज अलीच्या हायवे या चित्रपटात आलियाला संधी मिळाली. एकाकी किशोरवयीन मुलीची भूमिका साकारली. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने साधारण कामगिरी केली. या भूमिकेने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला. याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकनही मिळाले होते. करण जोहरच्या यांच्या धर्मा प्रोडक्शन्ससोबत तिने यशस्वी चित्रपट दिले आहेत. अनेक व्यावसायिक यशस्वी चित्रपटात अभिनय केल्यानंतर आलिया आता बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे. तिने 2019 मध्ये इंटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स नावाची स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली. झोया अख्तरच्या गली बॉयमध्ये रणवीर सिंगसोबत तिची भूमिका गाजली. अभिनयात जीवंतपणा आणण्यासाठी तिने गावातील एका बोली भाषा शिकण्यासाठी मेहनत केली होती. गली बॉय चित्रपटाने कमाईचा विक्रम केला. 13 फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. आलियाने कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची पुरस्कार पटकावला.

आलिया ही भट्ट कुटुंबातून असली तरी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संघर्ष करावा लागला. सुरवातीच्या काही चित्रपटात तिच्या भूमिका यथातथाच होत्या. मात्र तिने प्रयत्न सोडले नाही. अभिनय कौशल्यात सुधारणा घडवल्या. आज तिने अभिनयासोबत चित्रपट निर्मितीक्षेत्रातही जम बसवला आहे.

प्रारंभीच्या अपयशानंतरही हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. यासाठी त्यांची मानसिक व शाररिक तंदुरुस्ती कामाला आली. ही शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती मिळाली त्याचे रहस्य तिच्या हाताच्या आकारामध्ये लपलेले आहे. शरीरयष्टी बारीक, छोटी उंची असली तर हाताचा आकार मोठा, रुंद व मजबूत आहे. तिच्या उजव्या हाताच्या पंजाचा आकार पुरुषाप्रमाणे आहे. त्यामुळे तिच्याकडे निर्णय क्षमता, कष्ट, न थकता प्रयत्न करण्याची मानसिकता आहे. ध्येयाने प्रेरित आहे. त्यातच करंगळी बाकीच्या बोटांपासून स्वतंत्र असल्याने स्वतंत्रपणे ठाम निर्णय घेण्याची ताकद आहे.

तिच्या हातावरील पहिले गुरुचे बोट मोठे आहे. जवळ जवळ ते मधल्या शनी बोटाच्या लांबी एवढे आहे. त्यामुळेे चटकन गोष्टी आत्मसात करण्याची ताकद, निर्णय क्षमता, स्वतःला प्रभावी स्थापित करण्याची व प्रयत्नवादी राहण्याची कला उपजत आहे. गुरु ग्रहाचे उत्तम गुणांचा मेळ झाला आहे. गुरु ग्रह शुभ आहे व गुरु ग्रहावरूनच हृदय रेषेचा उगम आहे. हृदय रेषा गोलाकार नाही. बर्‍यापैकी सरळ रेषेत आहे. त्यामुळे व्यावहारिक निर्णय घेण्याची क्षमता आहे. भावनपेक्षा स्वार्थीपणा जास्त आहे. त्यामुळे व्यावहारिक निर्णयांची जुळणी सोपी झाली आहे. बोटे टोकाला गोल आकाराचे आहेत. निमुळते किंवा टोकदार नाहीत. त्यामुळे समोरच्याशी बोलताना व्यवहार करताना येणार्‍या संवेदनांचे पृथकरण करूनच त्या येतात. त्यामुळे एखाद्याच्या बोलण्यावर चटकन विश्वास ठेवणे, वारंवार निर्णय बदलणे हे अंगी नाही. त्यामुळे व्यवसायात यश खात्रीने मिळत राहणार आहे.

थोडक्यात माणसांची पारख चटकन होते. बोटांवरील सर्व पेरे प्रमाणात व शुभ आहेत. अंगठा मजबूत आहे. अंगठ्याचे दुसरे पेर प्रमाणात असल्याने ठरल्याप्रमाणे कृती होते. कृतीत दिरंगाई किंवा आळस नाही. बुधाचे म्हणजेच करंगळीचे बोट लांब आहे.त्यामुळे व्यवहार व वक्तृत्वाची जोड आहे. बुधे ग्रह शुभ असल्याने व्यवहारात चतुराई आहे. जात्याच हजरजबाबी व हुशार आहे. मस्तक रेषा आयुष्य रेषेपासून स्वतंत्र आहे. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता व प्रचंड हुशारी आहे. मस्तक रेषा लांब असून हाताला आडवी जाताना अंगठ्यापासून थेट करंगळीच्या खाली हाताच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता अधिक व स्वतः विद्वान आहेत. आयुष्य रेषा शुक्र ग्रहाला पूर्ण घेरा घेणारी व हातावर उगमापासून समाप्तीपर्यंत सुदृढ आहे. शारीरिक तंदुरुस्ती काटक व निरोगी आहे. शुक्र ग्रह फुगीर व बलवान आहे. या शुक्र ग्रहाचे शुभ कारकत्व लाभल्याने स्वतः सौंदर्यवान दिसण्यासाठी कुठल्या प्रकारचा मेकपक असावा व कोणता वेश परिधान करावा याचे उपजत ज्ञान आहे. भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेपासून आहे. भाग्य रेषा बारीक चमकदार व ती एकच अखंड व शनीच्या क्षेत्रात सरळ जात असल्याने आर्थिक तंगी नाही. स्वकमाईचा आर्थिक लाभ वयाच्या 22 वर्षापासूनच मिळण्यास सुरवात झाली आहे. किशोरवयीन चेहेरा व बारीक अंगकाठीमुळे तारुण्याची झळाळी त्यांचेबरोबर कायम आहे. हे गुण शुक्र ग्रहांमुळे आलेले आहेत. रवी रेषा शुभत्व घेऊन आली आहे. ती शनीच्या सानिध्यात म्हणजेच मधल्या बोटाकडे सरकलेली आहे. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे शनी सानिध्यात आलेल्या व रवी ग्रहावर असलेली रवी रेषा मान सन्मानाबरोबरच आर्थिक उंचीचा आलेख वाढवणार आहे. आलीया यांना जितकी जास्त प्रसिद्धी मिळेल, तितके मोठे आर्थिक लाभ त्यांना होणार आहेत.

विवाह रेषा 28 व्या वर्षी हातावर आहेत. लवकरच अभिनेते रणबीर कपूरशी विवाह होणार असल्याच्या बातम्या आहेत. कामाप्रति निष्ठा, अविरत प्रयत्न व यश मिळविण्याची दुर्दम्य इच्छा ही त्यांचा हाताच्या आकारात दडलेली आहे. हात पुरुषासारखा मजबूत आहे. त्यामुळे कठोर परिश्रम घेण्याची मानसिकता आहे व त्याला हातावर स्वतंत्र असलेल्या करंगळीचे बोट व संपूर्ण हातावर वरच्या मंगळ ग्रहावर आडव्या गेलेल्या लांब मस्तक रेषेची आत्यंतिक हुशारी यांचा एकत्रित लाभ झाल्यामुळे आलियाने यशाचे शिखर गाठले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com