अमावास्येचे तथ्य

अमावास्येचे तथ्य

सद्गुरु - अमावास्या म्हणजे इंग्रजीत ज्याला मून डे किंवा न्यू मून डे म्हणतात तो दिवस. जेंव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती काही काळासाठी दृष्टीआड होते, तेव्हा त्यांच्या नसण्यामधून त्या गोष्टीचं किंवा व्यक्तीचं अस्तित्व जास्त प्रकर्षानं जाणवतं. त्याचप्रमाणे चंद्राच्या न दिसण्यातून ह्या दिवशी त्याचं अस्तित्व उलट जास्त ताकदीने जाणवतं. इतर कुठल्याही दिवशी - अगदी पौर्णिमे दिवशी सुद्धा - चंद्र हजर असतोच, तरी अमावास्येला त्याची उपस्थिती आणि त्याचा गुण जरा जास्तच आपल्याला अनुभवास येतो.

तुम्ही जर स्व-कल्याण आणि सर्वसंपन्नतेचे इच्छुक असाल, तर पौर्णिमा तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तुम्ही जर मुक्तीची कामना करत असाल तर अमावास्या तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानुसार, जीवनाच्या ह्या दोन मितींसाठी अभ्यास आणि साधना देखील वेगवेगळ्या आहेत. अमावास्येला पृथ्वी विचारमग्न, धीरगंभीर अशा अवस्थेत असते. सर्व पंचभुते एक प्रकारे समन्वय साधत असतात, आणि त्यामुळे पृथ्वीवरील एकूण जीवनक्रिया मंदावतात. ही प्रचंड सुगंधी असते, कारण संपूर्ण जीवनाची एकात्मता या दिवशी जास्त चांगल्या पद्धतीने साधली जाते.

जेव्हा सर्वकाही उत्तम चाललेलं असतं, तेव्हा तुम्हाला शरीरामध्ये काय होत आहे याची कल्पनाच नसते, शरीर आणि तुम्ही एकच असता. पण जेव्हा हे सारं मंदावतं तेव्हा तुम्हाला शरीराची स्पष्टपणे जाणीव होते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला छोटासा जरी आजार होतो, तेव्हा लगेच शरीर ही एक अडचण होऊन बसते आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. फक्त जेव्हा शरीर असे आजारी होते तेव्हाच तुम्हाला जाणवतं हे मी नव्हे. हे फक्त माझं शरीर आहे जे आता मला त्रास देत आहे. अगदी स्पष्टपणे, तुम्ही आणि तुमचे शरीर यामध्ये अंतर निर्माण होतं. हेच अमावास्येचंही महत्व आहे. या दिवशी, पंचभूते एक प्रकारे सम्मिलीत होत असल्यामुळे एक प्रकारे सर्वकाही मंदावतं. ह्या दिवशी कुणीही मी काय आहे आणि काय नाहीये हे सहजपणे जाणू शकतात, आणि तिथूनच असत्याकडून सत्याचा प्रवास सुरू होतो. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत, दरमहिन्याला नैसर्गिकरित्या ही संधी निर्माण केली जाते. अगदी जे संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, दर अमावास्येपासून पुढे ही संधी नैसर्गिकरित्याच मिळत राहते. जे सृष्टीच्या स्रोतात विलीन होण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी तर अमावास्या अप्रतिम!

तुम्ही हे ऐकलं असेल की जे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित असतात, त्यांचं असंतुलन अमावास्येला आणि पौर्णिमेला जास्त वाढतं. हे अशामुळं होतं की चंद्राचा आपल्या ग्रहावर परिणाम होत असतो. चंद्र सर्वकाही वर ओढून घेत असतो. सर्व महासागर वर उसळण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे तुमचं स्वतःचं रक्त देखील चंद्राच्या या परिणामाला प्रतिसाद देत असतं. त्यामुळे तुम्ही जर मानसिकदृष्ट्या असंतुलित असाल, तर त्या दिवशी तुमच्या मेंदूत वाढलेल्या अत्याधिक रक्ताभिसरणामुळे, तुम्ही जरा जास्तच असंतुलित व्हाल. जर तुम्ही आनंदी असाल, तर तुम्ही जास्त आनंदी व्हाल. जर दुःखी असाल तर अधिकच दुःखी व्हाल. जो काही तुमचा प्रबळ गुण असेल तो त्या दिवशी जरा जास्तच सक्रीय होतो कारण रक्त वरच्या दिशेनं ओढलं जात असतं. सर्व ऊर्जा एका अर्थाने वरच्या दिशेने प्रवाहित होतात. जो अध्यात्म साधक आपल्या ऊर्जा वरच्या दिशेने गतिमान करण्यासाठी हर तर्‍हेने प्रयत्न करत असतो, त्याच्यासाठी तर हे दोन दिवस म्हणजे निसर्गाने दिलेलं वरदानच आहेत.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com