बुधाकडून पवारांना चाणाक्षपणाची देणगी

भविष्य आपल्या हाती
बुधाकडून पवारांना चाणाक्षपणाची देणगी

शरद पवार हे महाराष्ट्रातल्या जनमानसात अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव. अभ्यासू व धुरंधर राजकारणी म्हणून त्यांची देशात ओळख आहे. त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविले. भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री ही पदे भूषवली आहेत. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राज्याच्या राजकारणाला वळण देणारी महाविकास आघाडीची संकल्पनाही त्यांचीच. महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय घराण्याचे प्रमुख आणि राजकारणातील एक प्रमुख चेहरा आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

2017 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. जनमानसाचा आवाका असलेल्या भारतातील बोटावर मोजण्याइतक्या अनुभवी व सक्रिय राजकीय व्यक्तिंमध्ये ते पहिला पंक्तीतील नेते. मराठी माणसाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न जागवणारे नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले. राष्ट्रीय राजकारण त्यांचा वावर आजही आश्वासक ठरतो. पवार साहेब पंतप्रधान का होऊ शकले नाही किंवा त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व का येऊ शकले नाही व ते महाराष्ट्राच्या राजकारणातच का अडकले याचा हस्तसामुद्रिकदृष्ट्या आढावा त्यांच्या उजव्या हातावरील रेषा, ग्रह, बोटे व हाताचा व अंगठ्याच्या आकारावरून पाहणार आहोत.

उजवा हात

आयुष्य रेषा व मंगळ रेषा - पवार साहेब यांची आयुष्य रेषा वय वर्ष 60 पर्यंत उत्तम आहे. साठीनंतर शारीरिक क्षमता कमी झाली तरी, आयुष्य रेषेच्या सोबत वय वर्ष 25 पासून उगम पावणारी व मणीबंधा पर्यंत जाणारी मंगळ रेषा आहे. या मंगळ रेषेने त्यांना कायम उत्साहित, उर्जावान व कार्यक्षम ठेवले आहे. ही मंगळ रेषा आयुष्य रेषेच्याही पुढे जाऊन थांबली आहे. हातावरील आयुष्य रेषेस वय वर्ष 90 ला छेद देणारी, शुक्र ग्रहावरून एक रेषा उगम पावते आहे. या छेद देणार्‍या रेषे दरम्यान थकवा वाढणार आहे व याच दरम्यान मंगळ रेषेची ताकद ही कमजोर होत आहे. यावरून पवार साहेब वय वर्ष 90 वर्षांपर्यंत सक्रिय राजकारणात राहतील. वय वर्ष 60 व्या वर्षी सुद्धा आयुष्य रेषेला छेद देणारी व शुक्र ग्रहावरून उगम पाऊन बुध ग्रहावर जाणारी आडवी रेषा आहे. मुखाची शस्त्रक्रिया झाली तो हा काळ. वयाच्या 64 वर्षी आयुष्य रेषेला छेद देणारी शुक्र व बुध ग्रहापर्यंत आडवी जाणार्‍या रेषेने शारीरिक त्रास दिला असला तरी या रेषेने अति शुभ शुक्र व बुध युतीचा योग घडवून आणला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी सुद्धा शुक्र ग्रहावरून मणी बंधापासून उगम पावणारी व करंगळीच्या खाली म्हणजेच बुध ग्रहाच्या सानिध्यात असलेल्या हृदय रेषेत जाऊन थांबली आहे.

शुक्र ग्रहावरून उगम पावणार्‍या बुध ग्रहावर जाणार्‍या या दोन आडव्या रेषा अनुक्रमे साठाव्या व नव्वदाव्या वर्षी शारीरिक क्षमतेत त्रासदायक असल्या तरी बुध शुक्राच्या योगाने झालेल्या अति शुभ युतीमुळे शुक्र ग्रहने गडगंज ऐश्वर्य दिले व ऐश्वर्य मिळण्यात बुध ग्रहाची हुशारी व चाणाक्षपणा कामास आला. या शुक्र ग्रहावरून बुध ग्रहाकडे जाणार्‍या रेषेने त्यांच्या उपजत बुध - शुक्र शुभ योगाच्या युतीने चातुर्य, व्यावसिकता व ऐश्वर्य, संपन्नता दिली आहे. बुध शुक्र ग्रहाच्या युतीचा योग् हा करोडो लोकांत एखाद्याच्याच हातावर असू शकतो.

भाग्य रेषा - पवार साहेब यांच्या हातावरील भाग्य रेषा आयुष्य रेषेतून वय वर्ष 50 च्या दरम्यान उगम पावत असून ती थेट मधल्या बोटाच्या खाली शनी ग्रहावर गेली आहे. हातावर आणखी एक भाग्य रेषा मस्तक रेषेखाली वय वर्ष 20 पासून उगम पावत आहे व वय वर्ष 42 च्या दरम्यान मस्तक रेषेतून उगम पावणारी आणखी एका भाग्य रेषेत विलीन होत आहे. मस्तक रेषेतून उगम पावणारी भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावणार्‍या भाग्य रेषेत विलीन होऊन दुसर्‍या भाग्य रेषेच्या सोबतीने शनी ग्रहावर जाऊन पोहोचली आहे. मस्तक रेषेतून उगम पावणारी भाग्य रेषा वय वर्ष 35 पासून पुढे त्यांच्या बौद्धिक कौशल्यावर आर्थिक संपन्नेत वृद्धी करीत आहे. मोठ्या घराण्यात जन्म झाल्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्यात आर्थिक कारणासाठी झगडावे लागले नाही. त्यामुळेच आयुष्यातील पूर्ण वेळ समाजकारण व राजकारणासाठी देणे शक्य झाले.

रवी रेषा - बुध शुक्र ग्रहाच्या आडव्या रेषेतून एक रवी रेषा उगम पाऊन ती मस्तक रेषेत विलीन झाली आहे. ही रवी रेषा मस्तक रेषेत विलीन झाल्याने हुशारीने मान सन्मान व प्रतिष्ठेत वय वर्ष 35 पर्यंत मोठी वाढ केली आहे. हातावरील दुसरी रवी रेषा वय वर्ष 33 पासून उगम पाऊन ती थेट रवी ग्रहावर जाऊन थांबली आहे. त्यातील एक तिसर्‍या व चौथ्या बोटांच्यामधे म्हणजेच रवी व बुध बोटांच्या मधे गेल्याने ही रवी रेषा आंतरराष्ट्रीय मान सन्मान व ख्याती देऊन गेली व ती राजकारणात नव्हे तर क्रिकेट विश्वात ख्याती दिली. रवी ग्रहावरील आलेल्या मोठ्या आडव्या रेषेने पंतप्रधानपद मिळाले नाही. रवी ग्रहावरील रवी रेषेस तीन छेद देणार्‍या रेषा आहेत या रेषेपैकी हृदय रेषेजवळची खालून पहिली रेषा व तिचा उगम खालच्या मंगळ ग्रहावरून होत असून तिने संपूर्ण हाताला करंगळीच्या म्हणजेच बुध बोटाच्या पेर्‍यापर्यंत आडवी गेल्याने त्यांचे पंतप्रधान पद हुकले. रवी ग्रहावर या मोठ्या आडव्या रेषेपैकी आणखी दोन आडव्या रेषा आहेत. त्यामुळे जीवनात राजकीय आरोपांचा सामना करावा लागला.

शनी ग्रहावरील रवी रेषेतून भाग्य रेषेत गेलेली आडवी रेषा - शनी ग्रहावरील रवी रेषेतून भाग्य रेषेत गेलेली आडवी रेषा या शनी ग्रहावरील छोट्या आडव्या रेषेने सुद्धा भारताचे पंतप्रधान होण्यापासून पवार साहेबांना रोखले आहे. म्हणजेच रवी व शनी ग्रहावरील आडव्या रेषेंनी जीवनात अडथळे निर्माण केले. तळहातावरील दोन आडव्या रेषेंनी अडथळा आणला. नमूद केलेली रवी रेषेला आडवी जाणारी खालच्या मंगळ ग्रहावरून उगम पाऊन रवी रेषेला छेद देणारी मोठी रेषा वय वर्ष 20 व दुसरी तळ हातावरील आडवी रेषा खालच्या मंगळ ग्रहावरून उगम पाऊन दोन तुकड्यांची रेषा हृदय रेषेत करंगळीच्या खाली जाऊन थांबली आहे. या दोन तळ हातावरील आडव्या रेषांनी व रवी ग्रहावरील रवी रेषेवर दोन आडव्या रेषा व रवी रेषेतून शनी ग्रहावर भाग्य रेषेत आडवी जाऊन थांबलेल्या रेषांनी त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला लगाम लावला व त्यांची घोडदौड मंद करण्यात या आडव्या रेषा कारणीभूत ठरल्या.

चंद्र ग्रहावरील उभी रेषा - प्रतिभा रेषा - हातावर मनगटाकडून उगम पाऊन चंद्र ग्रहावरून मस्तक रेषेला येऊन मिळणारी एक प्रभाव रेषा आहे. ही प्रभाव रेषा मस्तक रेषेच्या छोट्या फाट्यात जाऊन विलीन होत आहे. ही रेषा म्हणजे प्रतिभा रेषा होय. मस्तक रेषेला शेवटी दोन फाटे आहेत. त्यामुळे उपजत विद्वत्ता आहे. कोणताही विषय सहजी समजण्याची आणि उलगडण्याची आकलन शक्ती अफाट आहे. चंद्र ग्रहावरची प्रतिभा रेषा त्यांच्या अंतरमनाला कायम जागृत ठेवते व स्मरणशक्ति संगणकासारखी काम करते. या प्रभाव रेषेनेच त्यांना कायम जागृत ठेवले आहे. कुठलाही प्रश्न असो त्याचा संदर्भ व महाराष्ट्रातील लहान सहान गावोगावच्या समस्या व त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्मरणात कायम राहतात. हीच प्रतिभा रेषा पवार साहेब यांना अंतर्मनाची चाहूल कायम देते व ही अंतर्ज्ञान देणारी त्यांना मिळालेले एक वरदान आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com