भावीनिमगाव ग्रामसभेत गदारोळ

0

आरोग्य केंद्र व राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याचा ठराव

भावीनिमगाव (वार्ताहर) – शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील ग्रामसभेत ग्रामपंचायत अंतर्गत वाडी वस्तीवर रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सोयी सुविधा पुरवत नसल्याने नागरिकांनी सभेत आपली नाराजी व्यक्त करत चर्चा घडवून गदारोळ घातला. सुविधा देणार नसाल तर, करही वसूल करू नका असा उपरोधिक सल्ला यावेळी दिला.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये करण्यात आला.
ग्रामसभेच्या प्रारंभी महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत वंदन केले. चर्चेच्या सुरुवातीलाच वाडी वस्तीवरील रस्त्यांची झालेली मोठी दुरवस्था, त्यांची दुरुस्ती या समस्येवर ग्रामसभेत वादळी चर्चा झाली.
मात्र रस्तेदुरुस्ती हे ग्रामपंचायतचे काम नसून आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्या निधीतून ही कामे गावाने हक्काने करून घ्यावयाची असतात, असे सांगत रस्ता दुरुस्तीला ग्रामपंचायतने नकार दर्शवला. त्यावर घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामपंचायतीने वसूल करू नये, आमचे रस्ते आम्ही स्वतः दुरुस्त करू असे माधव काळे, राम मुंगसे यांनी सांगत संताप व्यक्त केला. त्यावर कोणता रस्ता करावयाचा आहे? यावर चर्चा झाली.
यानंतर सर्वच वाड्यावस्त्यांवरील नागरिकांनी आमचा रस्ता, आमचा रस्ता असा एकच गदारोळ केला. यामुळे रस्ता दुरुस्ती हा विषय ग्रामसभेत कुठल्याही ठोस निर्णयाविना चर्चिला गेला. येथील खळवाडीला मोठी लोकवस्ती झाली असून येथील नागरिकांना काँक्रिट रस्ते, झोपडवस्ती, नळपाणी व वीज पुरवठा या सुविधा प्राधान्यक्रम देत पुरवल्या असून
येथील नागरिकांकडून मात्र कुठलीही घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायत वसूल करत नसून ग्रामपंचायत फक्त मताचे राजकारण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. गावात नुकताच देवीचा नवरात्र उत्सव साजरा झाला. त्या काळात संपूर्ण गाव भक्तिमय झाले असताना दलित वस्तीत गोमांसाची जोरात विक्री चालू होती. या प्रकारामुळे गो-हत्येस लोक प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आत्माराम शेळके यांनी केला. यावर ग्रामपंचायतीने याकडे जातीने लक्ष देऊन गावात गोमांस बंदी करावी अशी मागणी केली.
शहरटाकळी पाणी योजना बंद असल्याने गावाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नसून ग्रामपंचायत आरोग्याच्या या महत्वाच्या विषयावर काहीच उपाययोजना करत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ग्रामसेवक श्री. जोशी यांनी पाणी योजनेची व सार्वजनिक बोअरवेलच्या वीजबिलाची मोठी थकबाकी असल्याचे सांगितले.
यानंतर नंदराम दळे, संजय काळे, शंकर मरकड, भागवत चव्हाण यांनी गावच्या लोकसंख्येच्या आधारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असावी अशी सूचना केली. त्यावर ग्रामस्थांनी एकमत दर्शवल्याने दोन्ही ठराव ग्रामसभेने संमत केले.
ग्रामसभेत वैयक्तिक शौचालये नसलेल्या कुटुंबाची व कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांची यादी वाचून दाखविण्यात आली. कृष्णा व्यवहारे, चंदू थोरात, ताराचंद जाधव, संजय शेळके, राजेंद्र जरे, पांडुरंग काळे, भास्कर पंडित, बाळासाहेब शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

 

LEAVE A REPLY

*