गोधेगाव-देवगड परिसरात मच्छिमारी नको : भास्करगिरी

0

गोधेगावच्या त्रिदिनात्मक सोहळ्याची सांगता

देवगडफाटा (वार्ताहर) – सदगुरू किसनगिरी बाबांची गोधेगाव ही जन्मभूमी प्रवरा तीरावर तपोभूमी व देवगड क्षेत्री कर्मभूमी असल्याने या परिसरातील या स्थानाचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी असून या पवित्र भूमीत प्राणीमात्राची हत्या व मच्छिमारी होऊ नये अशी अपेक्षा श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली.
नेवासा तालुक्यातील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची जन्मभूमी श्रीक्षेत्र गोधेगाव येथे किसनगिरी बाबांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित त्रिदिनात्मक सोहळ्याच्या सांगताप्रसंगी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. महाराज म्हणाले, सदगुरू किसनगिरी बाबांची गोधेगाव ही जन्मभूमी प्रवरा तीरावर तपोभूमी व देवगड क्षेत्री कर्मभूमी असल्याने या परिसरातील या स्थानाचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, गुरुवर्य किसनगिरी बाबांनी जीव, प्राणिमात्रावर प्रेम केले असल्याने या पवित्र भूमीत प्राणिमात्राची हत्या नको की मच्छीमारीही नको. प्रत्येक जीव हा पाण्याच्या प्रवाहात भगवंत चरणाजवळ आला असल्याने मच्छीमारीसारखे प्रकार परिसरात घडू नयेत.
मनुष्याने प्रथम आपल्या मुलाबाळात देव पाहवा व नंतरच देवकार्यात सहभागी व्हावे. धार्मिक वैभव वाढीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून योगदान दिले पाहिजे. भगवंताबद्दल व सद्गुरुंविषयी असलेला भक्तीभाव शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा. पुढच्या पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी भक्तीचा मळा आत्ताच फुलवा. सर्वांशी सुसंवाद ठेवून अंतःकरणामध्ये एकमेकाबद्दल प्रेम टिकवा. गाईच्या हत्येस कारणीभूत ठरून पापाचे भागीदार होऊ नका. गो-रक्षण करून गोपालन करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भास्करगिरी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून त्रिदिनात्मक सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळयासाठी योगदान देणार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोहळा व्यासपीठ प्रमुख नारायण महाराज ससे, विजय महाराज पवार, रामनाथ महाराज पवार, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, बदामराव पठाडे, सीताराम जाधव,
गोविंदराव शेळके, नवनाथ पठाडे, नामदेव अनुभूले, बबनराव धाडगे, दत्तात्रय गोलांडे, बाबासाहेब खोबरे, काशीनाथ दुशिंग, पंढरीनाथ जाधव, काशिनाथ पिंपळे, कचरू भागवत, ज्ञानदेव लोखंडे, रामभाऊ फोलाणे, पंढरीनाथ सोनवणे, भास्करराव घोलप, बहिरुनाथ शेलार, पांडुरंग हारदे, निवृती पाटील सुडके, पंढरीनाथ शेळके, गोपीचंद पल्हारे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मासेमारी नको ; भक्त परिवाराचे आवाहन – 
दरम्यान भास्करगिरी महाराजांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनंतर महान तपस्वी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी प्रवरानदी किनारी मुरमे-देवगड ते तपोभूमी या पट्ट्यात मोठे तप केले असल्याने या पवित्र क्षेत्रामध्ये मासेमारी करू नये असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड येथील भक्त परिवाराने केले आहे. देवगड (घाट) ते तपोभूमी असा हा सर्व प्रवरामाईचा परिसर सुमारे अडीच किलोमीटरचा येतो.

अनेक भाविक नौकाविहार करतात. जुने नवे गोधेगावकड़े तसेच तपोभूमीच्या दर्शनासाठी देखील होडी व मोटार नावेतून पैलतीरी जातात. याच पट्ट्यामध्ये बोटींना मासे पकड़ण्यासाठी लावलेले जाळे अड़थळा ठरते. जाळे अड़कून मोठा अपघात होण्याचीही भीती आहे. दरम्यान या परिसरात मासेमारी करणार्‍यांना नेवाशाचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांनी नोटिसा पाठविल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*