मी नाराज असल्याची बातमी चुकीची, माझ्या मनधरणीची गरज नाही : एकनाथ खडसे

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई :

मी पक्षावर नाराज नाही माझ्या मतदारसंघातील कामे तातडीने मंजूर करण्यात यावी यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतली असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली मनधरणी करण्यासाठी पक्षात काही नेत्यांची नेमणूक केल्याचाही इन्कार केला आहे. १२ तारखेला गोपीनाथ गडावर होणा-या स्वाभिमान मेळाव्याला मुख्यमंत्र्यानीही यावे असे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचे खडसे यानी सांगितले. ते म्हणाले की, औरंगाबाद येथे मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जमीन दिली होती मात्र या ठिकाणी गेल्या पाच वर्षात स्मारक झाले नाही त्यासाठी देखील सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्य केल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आज खडसे यांनी दुपारी पंकजा मुंडे यांची त्यांच्या रॉयलस्टोन या बंगल्यावर जावून भेट घेतली. यावेळी पक्षाच्या पराभवाबाबत चर्चा झाल्याचे मान्य करत खडसे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षांचा अनपेक्षीत पराभव कसा झाला यावर ओबीसी माजी आमदार आणि सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्याबाबत पक्षांच्या नेत्यांना जाणिव देखील करून देण्यात आली आहे. खडसे म्हणाले की, १२ डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त पंकजा मुंढे यांनी स्वाभीमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, औरंगाबाद मधे गोपिनाथ मुंढे यांचे स्मारक व्हावे या साठी गेल्या ५ वर्षात काही प्रयत्न झाले नाहीत, मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटुन मुंडे यांच्या स्मारकाविषयी ३० -३५ कोटी रूपयांच्या निधीची घोषणा करण्याची विनंती आपण केल्याचे खडसे यांनी सांगितले.

ते म्हणाले की “उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच आवश्यकता असेल तर तिथला दौरा असेल त्यावेळी जागेला भेट देऊ असेही ते म्हणाले आहेत,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचे सांगितले, कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिनही पक्षातील नेत्यांशी आपली जवळीक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आल्यास आपल्याला फायदा होईल असे त्यांना वाटत असावे. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

२०१४ मधे विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती, तब्बल पाच वर्षानंतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याने खडसेंच्या या भेटीगाठींबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात होते. विशेष म्हणजे खडसे दिल्लीत भाजप नेत्यांना भेटायला आले होते. त्यांनी दिल्लीत पोहोचल्यावर तसे सांगितलेही होते. पण भाजप नेत्यांऐवजी पवारांचीच भेट घेऊन ते परतत असल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *