राहुरी, नेवासा, राजुरीत भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
राहुरीत बंदच्या निमित्ताने तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन देताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते.

राहुरीत काँग्रेस , राष्ट्रवादी व मनसेच्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- इंधन दरवाढ, शेती व शेतकर्‍यांचे होत असलेले हाल, बेरोजगारांचे लोंढे याबद्दलचा आक्रोश या बंदमधून व्यक्त होत आहे. हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे, देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका राहुरी तालुका काँग्रसचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदच्या आवाहनानुसार राहुरी तहसील कचेरीसमोर अंदोलकांना ते संबोधित करीत होते. राहुरीकरांनी बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी व्यापार्‍यासह सर्वांचे आभार मानले.
दररोज काही पैशांनी इंधन दरवाढ करून सत्ताधारी भाजपाने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले, पेट्रोल व डिझेलने 90 चा आकडा केव्हाच पार केला? हे सामन्यांना समजलेच नाही.अशा सरकारला आता धडा शिकवून घरी बसविण्यासाठी सर्वांना एकसंघ व्हावे लागेल, असे प्रतिपादन नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांनी केले.

कारखान्याचे माजी संचालक किशोर वने म्हणाले, या शासनाने सर्व घटकांची निराशा केली असून आता एकसंघ होऊन या सरकारला मतपेटीतून उत्तर द्यावे लागेल. काँग्रेस व राष्ट्रवादी भाऊ -भाऊ असून त्यामुळे या आंदोलनात जनसामान्यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी ही काँग्रेसच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी दिली.

राहुरी तहसीलदार अनिल दौंडे व पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
नगर-मनमाड महामार्गावरील एम.पी सोसायटीच्या प्रांगणातून सर्व आंदोलक घोषणा देत नविपेठ मार्गे तहसीलवर पोहचले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आप-आपल्या पक्षाचे झेंडे हातात व पट्टे गळ्यात घातले होते. शहरातील व्यवहार जवळपास बंद होते. राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेऊन बंद शांततेत पार पाडला.

आंदोलनात मनसेचे ज्ञानेश्‍वर गाडे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश करपे, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उद्यसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक नामदेवराव ढोकणे, अमृत धुमाळ, गणेश भांड, राष्ट्रवादीचे नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत ढोकणे, प्रकाश भुजाडी, अशोक आहेर, बाळासाहेब उंडे, नितिन तनपुरे, प्रमोद आढाव, इस्माईल सय्यद, भारत तारडे, शिवाजी सयाजी गाडे, रघुनाथ ढोकणे, दिलीप जठार, रवींद्र आढाव, अशोक कदम, दिलीप राका, बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, राजेश वराळे, विजय हरेल, राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख विजय कातोेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस किशोर जाधव, बाळासाहेब जाधव, रमेश म्हसे, राहुल म्हसे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ, धनंजय पानसंबळ, अनिकेत उंडे, दीपक पवार, अनिल कासार, राजेंद्र उंडे, महेश उदावंत, गोरक्षनाथ तारडे, रवींद्र म्हसे, वैभव पेरणे आदी उपस्थित होते.

भारत बंदला नेवासा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद; तहसीलवर मोर्चा

नेवासा येथे काँग्रेसच्यावतीने बैलगाडीसह काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक.

नेवासा (प्रतिनिधी)- पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने पुकारलेल्या भारत बंदला नेवासा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेवासा शहरात बंदला व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. भाजपा-शिवसेना वगळता इतर सर्व विरोधी पक्षीयांच्यावतीने या बंदला पाठींबा देण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी केले. मोर्चात क्रांतिकारी शेतकरी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, कम्युनिस्ट पक्ष, शिवप्रहार संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध घोषवाक्य फलक, पक्षाच्या झेंड्यांनी सजवलेल्या बैलगाड्यांमधून पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिकांचा मोर्चा पंचायत समितीच्या प्रांगणातून श्री खोलेश्‍वर गणपती चौक मार्गे श्रीनाथबाबा चौकातून तहसील कार्यालयासमोर आल्यावर मोर्चेकर्‍यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

मोर्चासमोर बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले की पेट्रोल, डिझेल, गॅस भाववाढीने शेतकरी, कामगार, गृहिणी, सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. जनतेच्या भावनांची दखल घेतली जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही भाववाढीचा निषेध करतो. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले, महागाईमुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. इंधनाचे दर त्वरित कमी करण्यात यावेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्यावतीने आम्ही सरकारचा निषेध करतो.

संजय सुखधान म्हणाले, काँग्रेसने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात भारत बंदची हाक दिली. या आंदोलनात भाजपा, शिवसेना वगळता सर्व विरोधी पक्ष सहभागी झाले. एकीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन ही भाववाढ केली जात आहे व नंतर एक-दोन रुपयांनी कमी करण्याचे नाटक केले जाते. महागाई सारख्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी राम कदम यांच्या सारख्यांना पुढे केले जाते. काँग्रेसच्या योजनांची फक्त नावे बदलण्यात आली. ‘अच्छे दिन’ ऐवजी महागाईमुळे जनतेचे बुरे दिन आले आहेत. यामुळेच भारत बंद पाळण्यात आला. महागाईमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. जनतेने या सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी असे आवाहन करून दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुखदान यांनी दिला.

गफूर बागवान, गणेश गव्हाणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ, जयप्रकाश रासने, अ‍ॅड. बापूसाहेब गायके, आण्णा पेचे, कम्युनिस्ट पक्षाचे अ‍ॅड. बन्सी सातपुते, शिवप्रहार संघटनेचे दीपक धनगे, काँगेस कमिटीचे अल्पसंख्याक आघाडीचे जाकिर शेख, संदीप क्षीरसागर, मुस्लिम आरक्षण कृती समितीचे इम्रान दारुवाले यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवून निषेध केला. तहसीलदार सुधीर पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांना निवेदन देण्यात आले.

देवळाली प्रवरेत कडकडीत बंद: सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

देवळाली प्रवरा येथे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कडकडीतपणे बंद पाळून सरकारच्या प्रतिकात्क पुतळ्याचे दहन करण्यात आले.

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- वाढती महागाई व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा येथे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. कडकडीतपणे बंद पाळून येथील बाजारतळावर शेतकरी पुतळ्यासमोर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य गणेशराव भांड म्हणाले, देशातील जनता गेल्या चार वर्षांपासून महागाईच्या आगीत होरपळत आहे. मात्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. महागाईच्या आगडोंबामुळे सामान्य जनतेला जीवन जगणेही मुश्किल झाले आहे. म्हणून राज्याचे विरोधी पक्षेनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष यात्रा सुरू असून वाढत्या महागाईविरोधात आवाज उठवत आहे. गेल्या चार वर्षांत या सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. जनता हैराण झाली असून या वाढत्या महागाई व पेट्रोल, डिझेल दरवाढी निषेधार्थ हा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत सदस्य अजित कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोकराव मुसमाडे, शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, उत्तमराव कडू, नगरसेवक शैलेंद्र कदम, अशोकराव खुरुद, विश्‍वास पाटील, अनंत कदम, गंगा गायकवाड, नानासाहेब कदम, सतीश वाळुंंज, अर्जून शेटे, शरद चव्हाण, अरुण ढुस, पप्पू बर्डे, सलीम शेख, योगेश सिनारे, अजित कृष्णराव कदम, मुस्ताक शेख, सुखदेव होले, बाबा चव्हाण, कुणाल पाटील, किशोर साळुंंके, बाबासाहेब संसारे, ऋषी राऊत, वैभव शेटे, बाबा वाळुंंज, सौरभ घोलप, अतुल कापसे, आदींसह काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

राजुरीत बंदला चांगला प्रतिसाद

राजुरी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील राजुरी ग्रामस्थांनी भारत बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद दिला. सदर बंदचे निवेदन देखील देण्यात आले. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढलेले दर तातडीने मागे घ्यावेत, पेट्रोल डिझेलवरील अधिभार कमी करावा, पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे या प्रमुख मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*