भरारी पथकाकडून वीजचोरी उघडकीस : तीन लाख 57 हजारांचा दंड

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील तळेगाव परिसरात महावितरण वीज कंपनीच्या भरारी पथकाने वीज चोरणार्‍या 39 ग्राहकांवर कारवाई केली. या ग्राहकांना तीन लाख 57 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभाग 1 मधील तळेगाव परिसरात भरारी पथकाने ही कारवाई केली.
पथकामध्ये 3 अधिकारी व 5 कर्मचार्‍यांचा समावेश होता. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी तसेच संगमनेर उपविभागातील ज्या रोहित्रावर जास्तीत जास्त भार आहे किंवा घरगुती वापरासाठी ज्या ग्राहकांनी वीज कनेक्शन घेतलेेले आहे, परंतु वापर अधिक वीज बिले कमी अशा ठिकाणचा सर्व्हे करुन संबंधित विभागात भरारी पथकाने छापे टाकले.
त्यामध्ये 30 ग्राहकांनी आकडा टाकून विजेची चोरी केली. तर 9 ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. आतापर्यंत ज्या ग्राहकांनी चोरुन वीज वापरलेली आहे अशा सर्व ग्राहकांवर विद्युत कायदा कलम 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. यानंतर संबंधित ग्राहकांनी सात दिवसांच्या आत वीज चोरी व दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तळेगाव परिसरात भरारी पथकामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एस. मुळे, सहायक अभियंता डी. एस. आंबेडकर, श्रीमती एस. एस. सुतकर, गणेश केदार, एस. ए. बांडे, सहाय्यक अभियंता शेळके आदिंचा समावेस होता. चार महिन्यांत आतापर्यंत 1208 ग्राहकांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली असून संबंधित ग्राहकांकडून दंडापोटी 53 लाख चार हजार रुपयांची आकारणी करण्यात आली आहे.
पैकी 350 ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली आहे. दंडापोटी 22 लाख 55 हजार रुपये महावितरण कंपनीला जमा झाले आहे. ज्या ग्राहकांनी दंडाची रक्कम अदा केली नाही अशा 23 ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर उर्वरीत ग्राहकांवर कारवाई करण्याचे काम सुरूअसल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी यांनी दिली.

दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून मोहीम
संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव या तालुक्यात वीजचोरी पकडण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वीज चोरी करताना अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वीज चोरीमुळे अशा घटना वारंवार होऊ नयेत, त्याचबरोबर वीज कंपनीचे आर्थिक नुकसान होऊ नये यामुळे वीज वितरण कंपनीने ही मोहीम हाती घेतली आहे. 

LEAVE A REPLY

*