विखे-थोरातांनी ‘समन्यायी’कायदा रद्द करून दाखवावा – मुरकुटे

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

समन्यायी पाणी वाटप कायदा करण्याचे पाप ज्यांनी केले तेच सदर कायदा रद्द करावा, अशी मागणी करत आहेत. हा कायदा ज्यांनी केला त्या मंत्री राधाकृष्ण विखे व तत्कालीन मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सदरचा कायदा रद्द करून दाखवावा, असे केल्यास आपण त्यांच्याकडे आयुष्यभर पाणी भरू, असे प्रतिपादन अशोक साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोक कारखान्याच्या सन 2023-24 गळीत हंगामाचा शुभारंभ श्री. मुरकुटे यांच्याहस्ते व बीआरएसचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमास गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, हेमंत ओगले, कामगार नेते अविनाश आपटे, दिलीप नागरे, संजय छल्लारे, तेजस बोरावके, राजन चुग, मुख्तारभाई शहा, शेखर दुबैय्या, पुरुषोत्तम झंवर, बाळासाहेब खाबीया, प्रविण गुलाटी, संजय कासलीवाल, अशोक उपाध्ये, आशिष धनवटे, रज्जाक पठाण, अनिल कुलकर्णी, सचिन बडधे, रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, ज्ञानदेव साळुंके, दिगंबर शिंदे, सोपान राऊत, सिध्दार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, सुनीता गायकवाड, अ‍ॅड.सुभाष चौधरी, श्रीमती जानकाबाई उंडे, भाऊसाहेब हाळनोर, नानासाहेब गव्हाणे, नाना पाटील, रमेश वारुळे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.मुरकुटे म्हणाले की, 2003 साली समन्यायी पाणी वाटपाचे विधेयक विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी तर विधानपरिषदेत तत्कालीन राज्यमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सदर कायदा सन 2005 साली संमत झाला. मधले दोन वर्ष यासंदर्भात तत्कालीन आमदारांनी कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे हे सर्वजण समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाचे धनी आहेत. ज्यांनी पाप केले तेच आता हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करत आहेत. आपण आमदार असतो तर हा कायदा होऊ दिला नसता, असे श्री.मुरकुटे म्हणाले.

याप्रसंगी माजी आ.आण्णासाहेब माने, हेमंत उगले, अविनाश आपटे, अशोक थोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांनी केले. प्रारंभी संचालक प्रफुल्ल दांगट व योगिता दांगट तसेच केनयार्ड सुपरवायजर भिकचंद मुठे व मिराबाई मुठे यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच श्रीरामपूर जिल्हा व्हावा असे दोन ठराव यावेळी करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाने आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे म्हणजे त्याचा गरजवंतांना लाभ मिळेल. श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी प्रसंगी आंदोलन करु. तसेच जेवढे काही प्रयत्न करायचे ते करु असे आश्वासन श्री.मुरकुटे यांनी यावेळी दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *