गुरुवारी भंगार बाजारावर पुन्हा हातोडा

0

विनापरवानगी व बेकायदा वसलेल्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारावर गेल्या जानेवारी महिन्यात मोठी कारवाई झाली होती.

परंतु त्यानंतर या व्यावसायिकांनी पुन्हा व्यावसाय थाटल्यानंतर येत्या गुरुवारी (दि.12) या भंगार बाजारावर महापालिकेचा हातोडा पडणार आहे. यासंदर्भात महापालिकेकडून आणि शहर पोलिसांकडून तयारी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस दलाने या भागात संचलन केले. दरम्यान, आता केल्या जाणार्‍या कारवाईत भंगार माल जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.

अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील व इतर ठिकाणचे भंगार विकत घेऊन नंतर हेच भंगार मटेरियल बेकायदेशीररीत्या साठवून विक्री करण्याचे काम अंबड-सातपूर लिंकरोडवर पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात महापालिका व शहर पोलीस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत साडेसातशेच्या वर भंगार दुकानांवर कारवाई केली होती. तीन दिवस चाललेल्या कारवाईत मोठमोठे शेड, घरे तोडण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून भंगार बाजाराची ओळख निर्माण झाली होती.

हा बेकायदेशीररीत्या वसलेला भंगार बाजार हटवण्यासाठी नगरसेवक दिलीप दातीर यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर यात न्यायालयाने भंगार बाजार हटवण्याचे आदेश दिले होते. अखेर महापालिकेने शहराच्या इतिहासात अतिक्रमण काढण्याची सर्वात मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर सात महिन्यांत पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार बाजार सुरू झाला आहे.

यासंदर्भात पुन्हा एकदा स्थानिक नगरसेवकांनी हा भंगार बाजार हटवण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता पुन्हा एकदा भंगार बाजार हटवण्याच्या कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे.

भंगार बाजारावर कारवाई करण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाकडून पुन्हा एकदा सेक्टर तयार करून 7 स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहेत. सेक्टरमध्ये काम करणार्‍या पथकाचे नेतृत्व कार्य. अभियंता व विभागीय अधिकारी करणार आहेत. एका पथकात 3 जेसीबी, 6 डंपर व 2 क्रेन अशी साधने वापरली जाणार आहेत. पूर्वी असलेला पोलीस बंदोबस्त आतादेखील राहणार आहे.

यावेळी मात्र दुकानात असलेला भंगार माल जप्त केला जाणार असून हे सर्व भंगार सातपूर क्लब हाऊस येथील मोकळ्या जागेत नेऊन टाकले जाणार आहे. या एकूणच कारवाईकरिता पोलीस व महापालिका यांचे संयुक्त 700 च्या वर अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून याच पार्श्वभूमीवर आज शहर पोलिसांनी या भागात संचलन करीत पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

*