भंडारदर्‍याच्या पाण्यावर पहिला हक्क धरणग्रस्तांचा

0

जलपूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी मधुकरराव पिचड यांचे प्रतिपादन

अकोले (प्रतिनिधी) – धरणग्रस्तांच्या त्यागामुळे भंडारदरा धरण झाले असून धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार, हक्क आपला आहे. भंडारदरा धरण ही वहिवाट आहे. आपली वहिवाट आपण सोडायची नाही. कारण वहिवाट सोडली तर कोणीपण घुसतो व आपल्या हक्कावर गदा आणू पाहतो, असे प्रतिपादन भंडारदरा धरण जलपूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.
उत्तर अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, तालुक्याचे विद्यमान आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते काल सोमवारी भंडारदरा धरणात साडी, चोळी अर्पण करून विधीवत जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर आश्रम शाळा शेंडी येथे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पिचड म्हणाले, की भाजप सरकार हे कुठलेही ध्येय धोरण नसलेले सरकार आहे. आम्ही राईट टू एज्युकेशन सारख्या योजना राबविल्या व शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून वस्तीशाळांची निर्मिती केली मात्र भजप सरकारने तालुक्यातील 124 शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन आदिवासींची मुले शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कारभार सुरु केलाय. धरणातील पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील आमदारांची असलेली कमिटी रद्द करून डॉडसन सारख्या सदस्य असणारी कमिटी स्थापन केली.
आमदार वैभव पिचड म्हणाले की एकीकडे धरण भरण्याच्या आनंद होतो. मात्र हे धरण भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील आदिवासी बांधवांना 300 मिमी पाऊस अंगावर घ्यावा लागतो. दोन महिने प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात याचे दुख वाटते. आज रक्षाबंधन व जलपूजन योगायोग जुळून आला आहे. साडीचोळी अर्पण करून समृद्धी भरभराटीसाठी प्रवरा मातेला प्रार्थना करतो. आदिवासीचे हक्क कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये असे आरक्षणासंबंधी ते म्हणाले.
जलपूजन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, जि प अर्थ बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, अ. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, मंगलदास भवारी, मीनानाथ पांडे, वनक्षेत्रपाल पडवळे, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, अरुण माळवे, धरण शाखाधिकारी राजेंद्र कांबळे, लकी जाधव, भरत घाणे, जयराम इदे, सुनील सारोक्ते, संपत झडे, पांडुरंग खाडे, धोंडिबा सोगाळ, संतू बांडे, दिलीप रगडे, भरत घोरपडे, भगवान झडे, माधव गभाले, विठ्ठल पटेकर आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांचे हक्क काढून डॉडसन ला बाप केला. अंब्रेला फॉल, रंधा धबधबा बंद करून पर्यटनावर गदा आणून आदिवासी तरुणांना रोजगार कसा मिळणार? तरुणांना तंबू लावू द्या, रोजगार मिळू द्या, त्यांना कोणी रोखलं तर त्याला धरणात बुडवू, असा सज्जड दम देखील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला. 

LEAVE A REPLY

*