भंडारदर्‍यामध्ये स्वातंत्र्यदिनी चोख बंदोबस्त

0
अकोले (प्रतिनिधी) – भंडारदरा धरण भरून वाहू लागल्यामुळे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी व सलग सुट्ट्यांमुळे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने राजूर पोलीस स्टेशनच्यावतीने ठिकठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून वाहतूक कोंडी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेता यावा. यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती स.पो.नि. भरत जाधव यांनी शेंडी ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ग्रामस्थांना दिली.

सदर बैठकीसाठी माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, पी. एस. आय. अशोक उजगरे, नितीन सोनवणे, रवींद्र वाकचौरे, प्रवीण थोरात, तळपे के. एल., विजय भांगरे, पत्रकार नितीन शहा, संजय महानोर, अनिल अवसरकर, सचिन नेवासकर, सुरेश अवसरकर, डॉ. सुधीर कोटकर, विष्णू पवार, मारुती मोरे, बिडवे , संतोष तुपसाखरे, रमेश गुडेप, पाडेकर, देवराम भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कालावधीत राजूर व घोटी येणार्‍या चेक पॉईंटवर नाकाबंदी लावण्यात येणार आहे. रस्त्यावर उतरून वाहने उभी करून धिंगाणा, मस्ती करणार्‍यांवर कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र फिरते तपासणी पथके नेमण्यात आले आहेत.

मद्यपान करून वाहन चालविणारे तसेच उद्धट वर्तणूक करणारे, अश्लीलता, शिविगाळ, शांतताभंग, छेडछाड , हाणामारी असे गैरकृत्य करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांना मदत म्हणून शेंडी महाविद्यालयाचे एनएसएसचे 50 विद्यार्थी, स्वयंसेवक, भंडारदरा, चिचोंडी, मूतखेल, मुरशेत या गावातील ग्रामसुरक्षा दल, जलसंपदा विभागाचे कर्मचारी, वनविभाग यांची मदत घेण्यात येणार आहे.

शेंडी, भंडारदरा येथे जाण्यासाठी एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा/वाकीफाटा शेंडी, मुरशेत, पांजरा, घाटघर. साम्रद , रतनवाडी, मुतखेल, भंडारदरा, रंधा धबधबा असा असेल असा पोलीस अधीक्षक अहमदनगर मु.पो.का.कलम 1991 कलम 33 (1) (ब) अन्वये आदेश जारी करण्यात आला आहे.

यावर्षी स.पो.नि.भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये भंडारदरा धरण शाखाधिकारी, वन्यजीव विभाग, महसूल विभाग, हॉटेल व्यावसायिक , ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश आहे. तर या कालावधीत फिरते आरोग्य पथक ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांनी नियम व शिस्तीचे पालन करून निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*