Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भंडारदरात धो धो पाऊस मुळेला पूर, प्रचंड आवक

Share

भंडारदरा 40 टक्के भरण्याच्या मार्गावर, मुळा 25 टक्के भरले

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)- पाणलोटात पुन्हा एकदा पुनर्वसू नक्षत्राच्या सरींचे तांडव नृत्य सुरू असल्याने भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. काल अवघ्या बारा तासांत 570 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 4044 दलघफू झाला होता. पावसाचा जोर असाच टिकला तर आज किंवा उद्या हे धरण 40 टक्के भरणार आहे.

बलठण, टिटवी, पाडोशी धरणे भरली

दरम्यान, मुळा पाणलोट क्षेत्रात काल संततधार पाऊस झाल्याने मुळा नदीला पूर आला होता. 18 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुळा धरणाकडे सुरू होता. यावेळी कोतूळ येथील श्रीक्षेत्र कोतुळेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले होते. अंबित, पाचनई ,कुमशेत या भागात तर धुव्वाधार पाऊस कोसळला. मुळा नदीला या वर्षीचा हा विक्रमी पूर आला. यामुळे मुळा धरणाकडे आज विक्रमी आवक सुरू होती. मुळा धरणाचा साठा 6224 दलघफूपर्यंत गेला आहे. मुळा नदीला आलेला पूर पाण्यासाठी आज दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती.भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत धो धो पाऊस कोसळत आहे. या पावसाची नोंद 11 इंच (342 मिमी) झाली आहे. त्यामुळे या भागातील धबधबे आक्राळविक्राळ रूपय धारण करू लागले आहेत. ओढ्या-नाल्यांना पूर आला असून हे पाणी धरणात विसावत असल्याने धरणाचे पोट हळूहळू फुगू लागले आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 4044 दलघफू झाला होता. काल दिवसभरात भंडारदरात 70 मिमी पाऊस नोंदवला गेला. वाकीतूनही 789 क्युसकने विसर्ग सुरू असल्याने निळवंडे धरणातही पाण्याची आवक चांगली होत आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 1406 दलघफू झाला होता. भात खाचरे तुडुंब असून भात आवणीला वेग आला आहे.

डिंभेत 30 टक्के पाणीसाठा

कुकडी ः अन्य धरणांतही आवक

अहमदनगर (प्रतिनिधी)– आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर पोहचला आहे. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, येडगाव आणि आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण अशी पाच धरणे मिळून कुकडी प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पातील डिंभे धरणाची 13500 दलघफू साठवण क्षमता असलेल्या या धरणात 24 तासांत 433 दलघफू नवीन पाणी दाखल झाल्याने काल सकाळी पाणीसाठा 3860 दलघफू झाला होता. अन्य धरणांतही हळूहळू पाणीसाठा वाढत आहे.
3000 दलघफू साठवण क्षमता असलेल्या येडगाव क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने साठा 567 दलघफू झाला होता. माणिकडोहचा साठा 1811 दलघफूपर्यंत पोहला. वडजमध्ये 383 तर पिंपळगावचा साठा 1100पर्यंत गेला. कुकडी प्रकल्पातील दिवसागणिक साठा वाढत असल्याने शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला दिलासा मिळाला आहे.

दारणा, गंगापूर पाणलोटात ‘पुनर्वसू’चे तांडव

दारणा 58 टक्के, भावली 65 टक्के तर गंगापूर 48 टक्क्यांवर पोहचले, गोदावरीचा विसर्ग वाढला

अस्तगाव (वार्ताहर)- दारणाच्या तसेच गंगापूर, भावली या धरणांच्या लाभक्षेत्रात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धुव्वाधार पाऊस बरसला. त्यामुळे धरणांच्या पाणलोटात पाण्याची आवक वाढल्याने काल सायंकाळपर्यंत दारणा 58 टक्क्यांवर, भावली 65 टक्क्यांवर, तर गंगापूर धरण 48 टक्क्यांवर पोहचले होते. नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातही पाण्याची आवक वाढल्याने या बंधार्‍यात गोदावरीचा 500 क्युसेकचा विसर्ग काल सायंकाळी 3155 क्युसेकवर पोहचला होता.
काल गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणा व भावलीच्या पाणलोटात धुव्वाधार पाऊस पडला. त्यामुळे सह्यद्रीचा घाटमाथा पावसाने झोडपून काढला आहे. भावलीत तब्बल 206 मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरीत 172 मिमी पावसाची नोंद झाली.

घोटी येथे 61 मिमी तर दारणाच्या भिंतीजवळ 36 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात या कालावधीत 266 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. तर भावलीत 138 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे हळूहळू या धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. काल गुरुवारी दिवसभरातील 12 तासांत भावलीला 66 मिमी, दाराणाच्या पाणलोटात 10 मिमी ची नोंद झाली. या कालावधीत दारणात 211 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. तर भावलीत 41 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे दारणाचा सकाळी 6 ला 54.47 टक्के असलेला साठा सायंकाळी 6 वाजता 57.42 टक्के इतका झाला होता. तर भावलीचा सकाळी 6 वाजता असलेला 62.13 टक्के साठा 65 टक्क्यांवर पोहचला होता. सात टीएमसीच्या दारणात त्यामुळे चार टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 1434 क्षमतेच्या भावलीत 932 दलघफू पाणी साठा झाला आहे.

गंगापूरच्या पाणलोटातही काल सकाळी संपलेल्या 24 तासांत जोरदार पाउस झाला. गंगापूरला 55 मिमी, त्रंबकला 127 मिमी, अंबोलीला 85 मिमी, काश्यपीला 11 मिमी, गौतमीला 48 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे गंगापूरात 126 दलघफू नविन पाणी दाखल झाले. तर काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंतही पावसाचे गंगापूरच्या पाणलोटातील त्रंबक येथे 145 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 85 , गौतमीला 33, गंगापूरला 30, काश्यपीला 21 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे 12 तासांत गंगापुरात 305 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे गंगापूरचा पाणीसाठा सायंकाळी 6 वाजता 47.67 टक्के इतका झाला होता. 5630 क्षमतेच्या या धरणात 2684 दलघफू पाणीसाठा झाला आहे.

नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाल्याने या बंधार्‍यात नवीन पाण्याची आवक झाल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सुरु असलेला 500 क्युसेकचा विसर्ग काल सकाळी 9 वाजता 1614 करण्यात आला. त्यानंतर पाण्याची पातळी वाढत गेल्याने दुपारी 3 वाजता 3155 क्युसेक पर्यंत हा विसर्ग वाढविण्यात आला. काल रात्री उशीरापर्यंत हा विसर्ग 3155 वर टिकून होता. त्यामुळे गोदावरीतील पाण्याचा खळखळाट सुरुच आहे.

अन्य धरणांचे साठा असे- काश्यपी 29.21 टक्के, गौतमी 28.44 टक्के, आळंदी 21.27 टक्के, मुकणे 14.52 टक्के, वालदेवी 40.75 टक्के, कडवा 32.70 टक्के, असे साठे आहेत. नांदुमधमेश्‍वर बंधार्‍यात 94.55 टक्के पाणी आहे.

मुळेचा विसर्ग 30 हजार क्युसेक
पाणलोटात धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने सकाळी 11 वाजता मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग तब्बल 30 हजारा क्युसेक होता. या हंगामातील हा विक्रमी विसर्ग आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!