भंडारदरा तांत्रिकदृष्या भरले!, निळवंडेही लवकरच ओव्हरफ्लो

0
अकोले, भंडारदरा (प्रतिनिधी)- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान लाभलेल्या भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाच्या सरी जोरदार कोसळत असल्याकारणाने काल रविवारी दि. 12 रोजी दुपारी 1 वाजता तांत्रिकदृष्या भरले असल्याची माहिती जलसंपदा विभाग अहमदनगर कार्यकारी अभियंता किरण देशमुख दिली. भंडारदरा भरल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

वरूणराजाने जुलैमध्ये पाणलोटात मेहरबानी केली. त्यातल्या त्यात तिसर्‍या आठवड्यात या भागात धो धो पाऊस झाल्याने भंडारदरा धरणात विक्रमी पाण्याची आवक झाली. होणारी आवक लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने पाणीसाठा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेऊन येणारे पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येऊ लागले. 22 जुलैला तर भंडारदरातून 11636 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता. गत तीन-चार दिवसांपासून पाणलोटात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. काल गत बारा तासांत धरणात 184 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यात 39 दलघफू पाणी वापरले गेले.

145 दलघफू पाणी धरणात जमा झाले. धरणातून टनेलद्वारे 819 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आब्रेला फॉलद्वारे पाणी सोडण्यात येत होते. ते सायंकाळी 5 वाजता बंद करण्यात आले. वाकीतून 1022 क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.अन्य ओढे-नालेही भरभरून वाहत असल्याने तेही सुमारे दीड हजार क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सामावत आहे. परिणामी निळवंडे धरणातील पाणीसाठाही वाढला. कालअखेर हेही धरण 80 टक्के भरले होते. पावसाचा जोर असाच टिकून राहिला तर भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरण्यात येऊन निळवंडे धरणही लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. काल सायंकाळअखेर या धरणात 6550 दलघफू पाणी होते. यातून 1550 क्युसेकने आवर्तन सुरू आहे. काल दिवसभर भंडारदरा परिसरात पहिल्याच दिवशी श्रावणसरी कोसळत होत्या. दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 31 मिमी झाली आहे.

मागील तीस वर्षात धरण पंचवीस वेळेस भरले असुन पैकी दोन वेळेस जुलै महिन्यात देखील भरले आहे. 15 ऑगस्टपर्यंत धरण भरण्याची परंपरा कायम राखत यंदा देखील धरण 15 ऑगस्ट पूर्वीच भरले आहे.यंदा तर जलसंपदा विभागाकडून 21 जुलै रोजीच ओहरफ्लो गेट देखील खबरदारी म्हणून उघडले होते.15 ऑगस्ट पर्यंत 10500 दलघफुटावर पाणीसाठा स्थीर ठेवून येणार्‍या आवकेनुसार विसर्ग कमीअधिक प्रमाणात नदीपात्रात सोडण्यात येईल असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.आज धरणात 10500 दलघफुटावर पाणीसाठा स्थिर ठेवून 999 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून प्रवरेची उपनदी कृष्णावंती द्वारे 1022 क्युसेक्स विसर्ग सुरु असल्याने निळवंडेत 6509 पाणीसाठा झाला आहे.तर गत 24 तासांत भंडारदरा 69, वाकी 56,पांजरे 73, रतनवाडी 107 तर घाटघर 102 मिमी इतकी नोंद झाली आहे.प्रवरा व कृष्णावंती नदीपात्रात समाधानकारक विसर्ग सुरू असल्याकारणाने निळवंडे धरण देखील लवकरच भरेल.

भंडारदरा धरण मागील तीस वर्षात 1987,1989,1995,2000 व 2015 या वर्षांत भरले नाही.तर अंब्रेलाफॉल व ओव्हरप्लो गेट यांचे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत असून वाहनांच्या लांबचलांब रिघ लागत आहे. राजुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.पी.वाय.कादरी यांच्यासह अशोक उजगरे,नितीन सोनवणे,किशोर तळपे,प्रवीण थोरात,रवींद्र वाकचौरे,संगमनेर वाहतूक पोलीस,होमगार्ड आदी चोख बंदोबस्त बजावत आहेत.
जलसंपदा विभागाचे शाखाधिकारी राजेंद्र कांबळे, वसंत भालेराव, तुकाराम वसईकर, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब लोहगावकर, तुकाराम घोरपडे, नामदेव भोईर, अर्जुन धनगर, सुरेश हंबीर, दत्तात्रय पाबळकर, मंगळा मधे हे पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहेत.

कुकडी : डिंभे 88 टक्के भरले
कुकडी पाणलोटात अधून मधून होणार्‍या पावसामुळे या प्रकल्पातील सर्वात मोठे असलेल्या डिंभे धरण 88 टक्के भरले आहे. 12250 दलघफू क्षमतेच्या या धरणात 10960 दलघफू पाणीसाठा झाला आहे. त्या तुलनेत अन्य धरणात कमी पाणीसाठा आहे. येडगावमध्ये 1559, माणिकडोड 4626, वडज 691, पिळगाव जोगात 105 दलघफू पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा 17941 (58.75 टक्के) आहे. मागीलवर्षी याच काळात या प्रकल्पात 21896 (71.70 टक्के) पाणीसाठा होता.

 

LEAVE A REPLY

*