भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस

0

मुळा दुथडी, कोतुळेश्‍वर मंदिराला पाण्याचा वेढा

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)- मंगळवारी रात्रीपासून भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने आज उद्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 45 टक्क्यांवर जाणार आहे. वातावरणात गारवा वाढल्याने धुणी पेटल्या आहेत. हरिश्‍चंद्रगड व घाटमाथ्यावर पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. कोतूळ येथील कोतुळेश्‍वर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी या भागातून पावसाने दडी मारल्याने काहीशी चिंतेचे वातावरण होते. पण मंगळवार रात्रीपासून पावसाच्या सरी जोरदार कोसळत आहेत. घाटमाथ्यावरील धबधबे सक्रिय झाले असून ओढे-नाले भरभरून धरणाच्या दिशेने खळखळू लागले आहेत. दिवसभरात 114 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 4722 दलघफू झाला आहे. वाकीतून 336 क्युसेकने ओव्हरफ्लो सुरू असल्याने निळवंडेतीलही पाणीसाठा वाढू लागला आहे. या धरणातील पाणीसाठा 848 दलघफू झाला आहे. भंडारदरा परिसरातील सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे व्यावसायिकही खूश आहेत. इकडे भातआवणीलाही वेग आला आहे. हरिश्‍चंद्र गड, आंबित, पाचनईत जोरदार सरी कोसळत असल्याने मुळा नदीचा विसर्ग वाढला आहे. कोतूळ येथील कोतूळेश्‍वर मंदिराला पाण्याचा वेढा पडला असून मूर्तीही पाण्यात आहे. पाणी वाढल्याने मुळा धरणातही आवक वाढु लागली आहे.

LEAVE A REPLY

*