Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भंडारदरा धरणात यंदा तब्बल 25000 दलघफू पाण्याची आवक

Share

अहमदनगर, भंडारदरा (प्रतिनिधी) – उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात यंदा पाच महिने पाऊस झाला. त्यात तब्बल 25227 दलघफू पाण्याची आवक झाली. परिणामी नोव्हेंबरच्या मध्यावर 11039 क्षमतेचे धरण तुडूंब आहे. त्यामुळे यंदा रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी मुबलक पाणी मिळणार आहे.

गतवर्षी धरण भरेल एवढाच पाऊस झाला. पण त्यापूर्वी धरणात 4800 दलघफू पाणी शिल्लक होते. धरणात 11039 पाणीसाठा झाला होता. निळवंडेही भरले नव्हते. त्यामुळे लाभक्षेत्रात ओव्हरफ्लोचे पाणी मिळाले नव्हते. त्यातही जायकवाडी धरणासाठी 6 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. यंदा पाणलोटात पावसाचेही उशीरा पाऊस सुरू झाला. 28 जून 2019 रोजी धरणात अवघे 276 दलघफू पाणी होते. जुलै, आँगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले होते. त्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात आले. ते पाणी निळवंडेत येत होते. सप्टेंबरात हे दोन्ही धरण ओव्हरफ्लो झाली होती.

पाणलोटात धो-धो पाऊस झाल्याने यंदा तब्बल 14334 दलघफू पाण्याचा ओव्हरफ्लो मिळाला. परिणामी प्रवरा नदीत दोनदा पूर आला होता. तसेच कालवेही भरभरून वाहत होते. लाभक्षेत्रातही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिके सडली. परिणामी कालव्याचे पाणी बंद करण्यास पाटबंधारे विभागाला सांगण्यात आले.

आवर्तनाची चिंता नाही..
भंडारदरा, निळवंडे धरणात नोव्हेंबरच्या मध्यावर 100 टक्के पाणी आहे. पाणलोट आणि लाभक्षेत्रात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाल्याने लाभक्षेत्रातूनही आवर्तनाची मागणी झाली नाही. ऑक्टोबरमध्ये खरीपासाठी एक आवर्तन दिले जाते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठीही पाणी सोडण्यात येते. हे पाणी ओव्हरफ्लोच्या पाण्यातून मिळाल्याने त्या पाण्याची बचत झाली. मुबलक पाणी असल्याने यंदा रब्बी आणि उन्हाळी आवर्तनाचे नियोजन होऊ शकते.

19359 दलघफू पाणी उपलब्ध
यंदा वरुणराजाने कृपा केल्याने भंडारदरा धरणात 11039 आणि निळवंडेत 8320 दलघफू असे एकूण 19359 दलघफू पाणी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे. निळवंडेचे कालवे अद्यापही पूर्ण न झाल्याने त्याचा लाभ भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. त्यामुळे यंदा शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही.

कांदा रोपांच्या भावात उसळी
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला कधी नव्हे असा भाव मिळत असल्याने, आणि पाणी भरपूर असल्याने शेतकरी कांद्याची लागवड करण्याच्या विचारात आहेत. मध्यंतरीच्या पावसात कांद्याच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कांदा रोपांची टंचाई आहे. रोपांचे नुकसान झालेले असताना काही शेतकर्‍यांनी बियाणे मिळवून रोपे तयार करीत आहेत. पण सध्या कांदा रोपे फारशी मिळत नसल्याने कांद्याचे रोप एकरी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत गेले आहे. काही शेतकर्‍यांनीतर नातेवाईकांकडे रोपांची चौकशी केली. पण नगर जिल्ह्यात रोपं शिल्लक नसल्याने शिरूर व अन्य भागातून आणून लागवड करीत आहेत.

उसाला पुन्हा शेतकर्‍यांची पसंती
भंडारदरा, निळवंडे धरण तुडुंब आहेत. तसेच प्रवरा नदीतील अनेक बंधार्‍यांत पाणी आहे. त्यामुळे पाण्याची शास्वती असल्याने काहीसा दूर गेलेला शेतकरी आता पुन्हा ऊस लागवडीकडे वळाला आहे. मागीलवर्षी हुमणीअळीच्या आक्रमण आणि पाणी टंचाईमुळे उसाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यंदा गळितासाठी ऊस कमी आहे. पण यंदा शेतकरी उसाला पसंती देत आहे. परिणामी ऊस बेण्याच्या भावात तेजी आहे. बेण्याच्या उसाच्या वाढीनुसार 4 ते 5 हजार रुपये गुंठा भाव सुरू आहे. हाच भाव गेल्यावर्षी 3 ते साडेतीन हजार रुपये होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!