भंडारदराच्या स्पील-वेची गळती तात्पुरती थांबविली

0
भंडारदरा (वार्ताहर)- भंडारदरा धरणाच्या स्पील-वे गेटपासून होणारी पाण्याची गळती तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात भंडारदरा जलसंपदा विभागाला यश आले आहे.
नाशिक यांत्रिकी विभाकाकडून कुठल्याही प्रकारची मदत न घेता स्थानिक कर्मचार्‍यांच्या मदतीने होत असलेली गळती थांबविली असल्याची माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे.
याबाबतचे वृत्त ‘आता भंडारदरा धरणाच्या स्पील-वे तून गळती’ या मथळ्याखाली सर्वप्रथम दैनिक सार्वमतने प्रसिद्ध केले होते. स्पील-वे गेटपासून 24 तासांत किमान 15 क्युसेकने गळती होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर जलसंपदा विभाग खडबडून जागा झाला.
सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यासह यांत्रिकी विभाग, नाशिक यांनी गळती होत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. मात्र धरण काठोकाठ भरलेले असल्याकारणाने कालबाह्य झालेले रबरसील बदलणेे  शक्य नाही. अथवा पाणबुड्याच्या साह्याने काम करणे शक्य होईल असे ठरविण्यात आले.
मात्र भंडारदरा जलसंपदा विभागाच्या चंदर उघडे, तुकाराम घोरपडे, मल्हारी सोनवणे, सुरेश हंबीर या स्थानिक कर्मचार्‍यांनी आम्ही काही प्रयत्न करु का? अशी विनंती केली व अधिकार्‍यांची परवानगी मिळाल्यानंतर हे कर्मचारी बोटीच्या साह्याने गळती सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले.
पाण्यात बुडी मारुन पाहिले असता घर्षणाने रबरसीलला गाळा पडल्याचे त्यांना आढळले. गाळा पडलेल्या ठिकाणी प्लॅस्टिक, बारदान व कापडी कपडे घालून तात्पुरत्या स्वरूपात होत असलेली गळती थांबविण्यात कर्मचार्‍यांना यश आले. पाणीपातळी कमी होताच घर्षणाने गॅप पडलेले व कालबाह्य झालेले रबरसील बदलणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
ही बाब तातडीने निदर्शनास आणून दिल्याबद्दल सार्वमतला धन्यवाद देत भंडारदरा जलसंपदा विभागाच्या कर्मचार्‍यांचे कौतुक केले. स्पीलवेची गळती तात्पुरत्या स्वरूपात का होईना जलसंपदा विभागाला शक्य झाले असून 150 व 200 च्या व्हॉल्व्हमधून सुरु असलेली गळती केव्हा थांबणार का? यांत्रिकी विभागाची पाहणी व निधी यांच्याच फेर्‍यात अडकून राहणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

LEAVE A REPLY

*