Type to search

Featured maharashtra नाशिक ब्लॉग

Blog : मचाण, पाणवठा अन् जंगलाची रेकी

Share

भंडारदरा । गौरव परदेशी

पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्याला वनकर्मचारी किंव्हा कोणी दिसू नयेत, यासाठी झाडांवर मचाणे बांधण्यात आल्या होत्या. भंडारदरा भाग एक आणि दोनमध्ये १८ पाणवठ्यांवर गणना करण्यात आली. आकाश निरभ्र असल्याने पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात प्राण्यांच्या हालचाली अचूक टिपता आल्या.

 

मचाणावरुन पाणवठ्याचे दृश्य

महाराष्ट्रात बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राणी व पक्ष्यांची गणना दरवर्षी वन विभागाकडून केली जाते. यावर्षीही 18 मे रोजी प्राणी व पक्षीगणना करण्यात आली. यासाठी वनविभागाकडून भंडारदरा वन परीक्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळी जंगलात नैसर्गिक पाणवठ्यावर झाडावर मचाण बांधून पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांची पक्ष्यांची गणना करण्यात आली. या गणनेसाठी वनसेवकांबरोबरच काही स्थानिकांनीही सहभाग घेतला होता.

प्राण्यांची मोजणी करण्यासाठी अठरा ठिकाणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भेकर, सांबर, रानडुक्कर, नीलगाय, माकड, तरस, वानर, रानमांजर, ससे, रानकोंबड्या, मोर पाणवठ्यावर पाणी पिताना आढळून आले. शनिवारी दुपारी तीन वाजता आम्ही भंडारदरा परिसरातील शेंडी येथील वनविश्राम गृह येथून रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात निघालो. भंडारदरा वनपरीक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे यांनी प्राणी गणनेच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

रतनगड येथील अतिप्राचीन शिवमंदिर

सोबतीला राउंड ऑफिसर रावसाहेब, वनरक्षक महेंद्र पाटील हे होते. प्रवासात वनपरीक्षेत्र अधिकारी पडवळे वाटेत येणार्‍या विविध स्थळांची माहिती देत होते, तसेच आजवरच्या प्राणी गणनेचे अनुभव सांगत होते. वाटेत छोटे पाडे व टूमदार घरे लक्ष वेधून घेत होती. ठिकठिकाणी स्थानिक लोकांनी पर्यटकांसाठी रेस्ट हाऊस व जेवणासाठी हॉटेल थाटलेले दिसत होते. पावसाळ्यातील चारही महिने येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आम्ही रतनगड गावात आलो. गावात अतिप्राचीन शिवमंदिर आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास आम्ही स्थानिक ग्रामस्थांसमवेत जंगलाची रेकी करण्यासाठी निघालो. गावापासून जंगलात तीन किलोमीटर आतमध्ये रतनगडाच्या पायथ्याशी पाण्याचे भले मोठे एकमेव तळे आहे. जे की, ऐन दुष्काळात ग्रामस्थांची व पशू-पक्ष्यांची तहान भागवत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. आजूबाजूला विस्तीर्ण झाडे-झुडपे पसरलेली होती.

एखाद्या चित्रपटाला शोभेल असे येथील दृश्य होते. पाणवठ्याजवळ तीन मचाणी बांधण्यात आल्या होत्या. प्रत्येक मचाणीवरून किती परिसर दृष्टिक्षेपात येतो, याचा आम्ही साधारण अंदाज घेत होतो. सहसा वन्यजीव ये-जा करण्याठी पायवाटेचाच उपयोग करतात, माची बांधतानाच कोणत्या दिशेला उतार व पायवाट आहे, याचा विचार करूनच माचीचे स्पॉट निवडण्यात येतात, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकार्‍यांनी दिली. रेकी करताना पाणवठ्याच्या कडेला बिबट्याच्या पायांच्या पंजांचे ताजे ठसे दिसून आले. ठश्यावरून मादी बिबट व तिचे पिल्लू असल्याचा अंदाज आला. यावरून जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले.

बिबट्याचे ठसे

पायवाटेत नीलगायचे ठसे देखील आढळून आले. दरम्यान सूर्य पश्चिमेला झुकत होता, तसतसे जंगलातील हालचाल वाढू लागली होती. मनात वेगळ्या प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती. एकदा का मचाणीवर चढले की, सूर्योदायाशिवाय खाली येण्याची मुभा नव्हती. त्यामुळे पूर्वतयारीसाठी- पाण्याच्या बाटल्या व आवश्यक सामान घेण्यासाठी आम्ही गावात परतलो.

निवडक ग्रामस्थासोबत आम्ही जंगलाच्या वाटेने निघालो. चंद्र डोंगराच्या पलीकडे असल्याने पलीकडच्या पायवाटेवर किर्रर्र अंधार पसरला होता. अर्धा तास सलग चालल्यावर आम्ही मचाणीजवळ पोहोचलो. ठरल्याप्रमाणे जो तो मचाणीवर जाऊन बसला होता. मनात अनेक प्रकारचे प्रश्न येत होते. धाकधूक वाढत होती. गार वारा सुटलेला असतानाही घाम फुटत होता. सोबतीला फक्त एक बॅटरी होती. काय तो फक्त तीचाच तेवढा प्रकाश दिसत होता. अशा या भयंकर अंधारात मधेच टिटवी पक्ष्याच्या आवाजाने अंगाचा थरकाप उडत होता. रात्रीचे अकरा वाजले तरी काहीही दिसेना. आपल्याला काही दिसेल की नाही, शंकेची पाल चुकचूक करत होती.

चंद्र डोक्यावर आला होता. त्याच्या लख्ख प्रकाशाने सारे जंगल न्हाऊन निघाले होते. सारे काही स्पष्ट दिसू लागले. साधारण रात्री बाराच्या दरम्यान झुडुपात बारीक हालचाल सुरू झाली. वरून कुठलातरी प्राणी खाली उतरत येतोय, हे जाणवले. मी स्व:ताला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. माझे कान आवाजाचा दिशेने वेध घेत होते व डोळे त्या प्राण्याला पाहण्यासाठी आतुरलेले होते. काही क्षणात बलाढ्य नीलगाय हळूच चाचपडत जंगलाबाहेर आली. तिचे शिंग चंद्राच्या प्रकाशात अधिकच उठून दिसत होते. पाणवठ्यावर येऊन ती तृष्णा भागवीत होती.

असे दृश्य पाहण्याची आयुष्यातली पहिलीच वेळ. याची देही याची डोळा असला काहीसा तो प्रसंग होता. संयमाचे मोल काय असते, ते यावेळी कळाले. जस-जशी रात्र वर चढत होती, तस-तस निसर्ग आपली सुंदर किमया रेखाटत होता. विविध पक्ष्यांचे आवाज मधूनच एखाद्या प्राण्याचा चित्कार लक्ष वेधून घेत होता.

अशात झोप, जेवण, तहान ह्या सार्‍यांचा विसर पडला होता. समाधी अवस्थेचा अनुभव यावेळी येत होता. अधून-मधून रानडुक्कर पाणवठ्यावर येऊन चिखलाने अंग माखवत होते. हे सारे अद्भूत दृश्य माझ्यासाठी नवीन होते. या सार्‍यात रात्र कधी उलटून गेली ते कळलेच नाही. पहाट होताच पक्ष्यांचा आवाज कानी पडण्यास सुरुवात झाली. जंगलातील पाणवठ्याशेजारी रात्रभर जागरण करूनही मला कंटाळलेले वाटत नव्हते.

रविवारी सकाळी गणना करून आल्यावर मी वनाधिकार्‍यांबरोबर माझा अनुभव शेअर केला. प्रत्येक प्राणी पाणवठ्यावर कधी आला, त्याचा प्रकार याच्या नोंदी आम्ही टिपल्या होत्या. इतरांना कोणते प्राणी दिसले, याची चर्चा सुरू होती. आमच्यापैकी काहींना रानडुक्कर बघण्यातच समाधान मानावे लागले होते. काहींना भेकर, सांबर, ससे, शेकरू आणि पक्ष्यांनी दर्शन दिले. पाणवठ्याच्या दिशेने जाताना वाटेत बिबट्याचे ठसे मिळाले. मात्र रात्रभर पाणवठ्यावर बिबट्याने दर्शन दिले नाही. प्राणी बघण्याबरोबरच जंगलात रात्रभर थांबण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.

निळे आकाश.. हिरवा डोंगर.. शांत जलाशयाचा रम्य परिसर.. छोटी झुडपे.. आणि त्यात उमटलेले प्रतिबिंब …! रतनगडाच्या पायथ्याजवळील ‘गणपतीचे पाणी’ नावाच्या पाणवठ्याचे विलोभनीय चित्र. जणू निसर्गाचा कुंचल्यातून साकारलेला अप्रतिम कलाविष्कार!

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!