चांगदेव महाराज मंदिरात पोलीस अधिकारी व वकिलांचे भजन

0
पुणतांबा (वार्ताहर)- दररोजचा दिनक्रम अत्यंत व्यत्य असतांना देखील परमार्थासाठी काही वेळ काढणे पोलीस अधिकारी व वकील मंडळींना अवघडच असते. असे असले तरी काल दुपारी एक वाजता रायगड येथील पोलीस अधिकारी व वकील मंडळींनी भजन साहित्य बरोबर आणून चांगदेव महाराज मंदिरात महायोगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या सभामंडपातच अर्धा तास भजन करून मंदिरात आलेल्या भाविकांना सुखद धक्का दिला.
रायगड अलिबाग येथील एन्जॉय ग्रुपमधील पंधरा सदस्य दुपारी शिडीचे दर्शन झाल्यानंतर पुणतांबा येथे महान तपस्वी चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांच्या समवेत राहात्याला काही काळ पोलीस निरीक्षक असलेले सुरेश वराडे, अ‍ॅड. अनंत पाटील, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, अ‍ॅड. प्रसाद पाटील, तबलावादक जगदीश पाटील, गायक समर्थ बुवा पाटील, विजय पाटील, लक्ष्मीकांत कार्लेकर, महेश पाटील, विकास पाटील, महेश माळी, किशोर थळे सहभागी होते.
दर्शन झाल्यानंतर त्यांनी देवस्थानचे व्यवस्थापक महेश मुरूदगण यांच्याकडे मंदिरांच्या सभामंडपात भजन करण्याची इच्छा व्यक्त केली. श्री. मुरुदगण यांनी तातडीने साउंड सिस्टीम उपलब्ध करून दिल्यानंतर सर्वांनी मनोभावे भजनाचा आनंद घेतला. श्री. मुरुदगण यांनी चांगदेव महाराज देवस्थानच्यावतीने सर्वाचे स्वागत करून अल्पोपहाराची व्यवस्था केली. भजन झाल्यानंतर श्री. वराडे यांनी मंदिर परिसरात भाविकांसाठी देवस्थानमार्फत तसेच शासनाच्या तीर्थस्थळ योजनेअंतर्गत विविध चांगल्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान वक्त केले.
तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुणतांबा येथे आल्यामुळे वेगळा आनंद व समाधान मिळाल्याबद्दल संर्वांनी एकमुखाने प्रशंसा केली. त्यानंतर मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर कार्तिकी स्वामी मंदिराकडे दर्शनासाठी त्यांनी प्रयाण केले.

 

LEAVE A REPLY

*