Type to search

ब्लॉग सार्वमत

blog : फुलसौंदर आणि पत्ररूपी दगड…

Share

नावात काना, मात्रा, उकार, वेलांटी नसलेल्या अहमदनगर या नगरीचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर जरा वेगळेच बालंट आले आहे. अर्थात हे बालंट आहे की अन्य काही, हे तपासयंत्रणा आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. मात्र यातून अनेक घडामोड़ी घडल्या आणि त्या नगरसाठी आश्चर्यकारक ठरल्या. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या पत्ररूपी दगडाने अनेकांना घायाळ केले.

आदिवासी महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात फुलसौंदर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा किती खरा आणि किती खोटा, याचा निवाडा योग्य ठिकाणी होईलच, पण यामुळे फुलसौंदर यांना मात्र मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळालेली प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.

फुलसौंदर यांचा पक्ष जरी शिवसेना असला, तरी त्यांचा स्वभाव तेवढा आक्रमक निश्चितच नाही. आपल्या भागात धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सतत चर्चेत असतात. याच स्वभावामुळे त्यांना शिवसेनेने शहराचे अत्यंत महत्त्वाचे असे, महापौरपद बहाल केले होते. त्यामुळेच त्यांची नगरीचे पहिले महापौर म्हणून इतिहासात नोंद शकली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात शहरात मोठी चूरस आहे. राष्ट्रवादीचे शहरातील सर्वेसर्वा असलेले आ. जगताप पितापुत्र ज्या भागात राहतात, त्या भागाच्या जवळच फुलसौंदर राहतात. त्यामुळे राष्ट्रवादीशी पंगा घेणे आणि तो टिकविणे तसे अवघड होते. त्या भागातील अनेकांनी शिवसेना सोडून आ. जगताप कुटुंबाला जवळ केले आहे. अशा स्थितीतही फुलसौंदर यांनी आपले राजकारण आणि शिवसेना त्या भागात जिवंत ठेवली. त्याला त्यांचा स्वभाव कारणीभूत ठरला.

फुलसौंदर यांना मानणारा वर्ग त्या भागात मोठा आहे. त्यामुळे फुलसौंदर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नागरिकांपासून विविध संस्था, संघटना पुढे आल्या. त्यांच्यावरील गुन्हा खोटा असून त्यांना योग्य न्याय द्यावा, असे पत्र जैन समाजात मानाची समजल्या जाणार्‍या महावीर इंटरनॅशनल या संघटनेने दिले आहे.

एवढेच नव्हे, तर फुलसौंदर महापौर असताना धोरणात्मक व इतर बाबीच्या निर्णयावरून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍या उभी करणार्‍या महापालिका कर्मचारी संघटनेने देखील फुलसौंदर यांच्यावर हा अन्याय असल्याचे पत्र पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या शिवाय ज्येष्ठ नागरिक संघटनेनेही अशाच आशयाचे पत्र दिले आहे.

फुलसौंदर ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्त्व करतात, त्या शिवसेनेने पत्र देणे अपेक्षितच होते. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी दिलेले पत्र चर्चेचा विषय ठरले. एखाद्यावर चुकीचे आरोप करून त्यांचे करिअर संपुष्टात आणण्याचे काम शिवसेना करते, असा आरोप राष्ट्रवादीकडून सातत्याने होतो.

केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडात आ. संग्राम जगताप यांना आरोपी बनविण्यामागे शिवसेनेचेच कटकारस्थान आहे, असेही सतत राष्ट्रवादीकडून सांगितले जाते. असे असताना एखाद्यावर चुकीचा आरोप केल्यानंतर त्याची काय परिस्थिती होते, याची जाणीव असल्याने आ. संग्राम जगताप यांनी पक्ष न पाहता फुलसौंदर यांच्या बाजुने उडी घेत त्यांच्यावरील आरोपाचे खंडन करत तसे पत्र पोलीस अधीक्षकांना दिले.

‘आपण जे भोगले ते इतरांना भोगायची वेळ येऊ नये’ ही भावना त्यामागे असल्याचे आ. जगताप सांगतात. असे असले तरी त्यांच्या या पत्ररूपी दगडाने अनेक पक्षी गहाळ झाले आहेत. सर्वात अगोदर त्यांचा शहरातील कट्टर विरोधक असलेला शिवसेना पक्ष संपुर्णतः गहाळ झाला.

एखाद्या गोष्टीचे भांडवल करून त्यावरून आंदोलन व इतर मार्गाने वातावरण निर्मिती करण्यात शिवसेनेचा हातखंडा असतो. या प्रकरणातही तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय याला जातीय रंग मिळण्याचीही भिती होती. या सर्व बाबींवर आ. जगताप यांच्या पत्राने पाणी फेरले गेल्याचे दुःख अजूनही शिवसेनेत अनेकांना आहे.

चुकीच्या गुन्ह्यात अडकवून राजकारण करता येत नसते, असा संदेशही या पत्रामुळे गेला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. जगताप यांचा हा पत्ररूपी दगड त्यामुळेच अनेकांना घायाळ करणारा ठरला.

-सुहास देशपांडे
9850784184

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!